राधाच्या धाडसाची किंमत तिच्या कुत्र्यांना मोजावी लागली. एकाला लंगडा केला, दुसऱ्याला विष घातलं, तिसरा बेपत्ता झाला आणि चौथ्याला तिच्या डोळ्यांदेखत मारून टाकलं. "माझ्यावर अत्याचार केला त्यासाठी गावातले चार मोठे लोक जेलमध्ये आहेत," ती म्हणते. "मी बलात्काराचा खटला मिटवला नाही म्हणून ते माझा रागराग करतात."
त्या चार पुरुषांनी राधावर (नाव बदललं आहे) बलात्कार केला त्या घटनेला आता सहा वर्षं झालीत. ती आपल्या गावाहून - शहरापासून सुमारे १०० किमी दूर – बीडला चालली होती तेव्हा एका खासगी गाडीच्या चालकाने तिला लिफ्ट देण्याच्या नावाखाली तिचं अपहरण केलं. नंतर त्याने त्याच गावातल्या आपल्या तीन मित्रांसोबत तिच्यावर बलात्कार केला.
"त्यानंतर बरेच आठवडे मी धक्क्यात होते," ४० वर्षीय राधा सांगते. "मी त्यांना कायद्याने शिक्षा द्यायचं ठरवलं, आणि पोलिसात तक्रार केली."
तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा राधा बीड शहरात राहत होती, नवरा आणि मुलांसोबत. "माझा नवरा तिथे एका फायनान्स एजन्सीत कामाला होता. मी अधनंमधनं गावाकडे जाऊन शेतीकडे लक्ष द्यायची," ती म्हणते.
तक्रार दाखल केल्यावर राधावर खटला मागे घेण्यासाठी खूप दबाव आला. गुन्हेगार आणि त्यांच्या नातेवाईकांची ग्राम पंचायत आणि गावातील बड्या प्रस्थांशी सोयरीक असल्याचं ती सांगते. "माझ्यावर दबाव आणत होते. पण मी गावापासून लांबवर राहत होते. शहरात लोक पाठीशी होते. मला थोडं सुरक्षित वाटत होतं, जरा धीर येत होता."
मात्र, मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा उद्रेक झाला आणि जणू तिचं सुरक्षा कवच गळून पडलं. देशव्यापी टाळेबंदी जाहीर होताच तिचा नवरा मनोज (नाव बदललं आहे) आपली नोकरी गमावून बसला. "त्यांना १०,००० पगार होता," राधा सांगते. "आम्ही एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहत होतो, पण मनोजची नोकरी गेल्यावर आम्ही भाडं देऊ शकत नव्हतो. जगणं मुश्किल झालं होतं."
दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसल्याने राधा, मनोज आणि त्यांची मुलं मुकाट्यानं गावाकडे राहायला आली – त्याच गावात जिथे राधावर बलात्कार झाला. "इथं आमची तीन एकर जमीन आहे, म्हणून आम्ही राहायला आलो. दुसरं काहीही सुचत नव्हतं," ती म्हणते. हे कुटुंब आता आपल्या जमिनीवर एका झोपडीत राहतं आणि राधा तिथे कापूस आणि ज्वारीचं पीक घेते.
राधा गावात राहायला आली तोच गुन्हेगारांच्या कुटुंबांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. "केस चालू होती. ती मागे घ्यायला खूप दबाव आणत होते," ती म्हणते. पण तिने खटला मागे घ्यायला नकार दिला, तेव्हा दबावाऐवजी तिला थेट धमक्या येऊ लागल्या. "गावात मी त्यांच्या डोळ्यासमोर होते. मला धमकावणं, छळणं सोपं झालं," राधा म्हणते. मात्र, तिने माघार घेतली नाही.
२०२० च्या मध्यात तिच्या आणि शेजारच्या दोन गावाच्या ग्राम पंचायतींनी राधा आणि तिच्या कुटुंबाला वाळीत टाकायचं आव्हान केलं. राधा "चारित्र्यहीन" असून तिने गावाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला. तिला तिन्ही गावांमध्ये "संचारबंदी" घालण्यात आली. "मी पाण्याला घराबाहेर निघाले की कोणीतरी छेड काढायचं," तिला आठवतं. "त्यांचं म्हणणं असायचं की ' आमच्या माणसांना जेलमध्ये पाठवून तू वर तोंड करून राहायला आलीयेस.”
तिला बरेचदा भरून येत होतं. "मला स्वतःला सांभाळणं महत्त्वाचं होतं," ती म्हणते. "केस संपतच आली होती."
बीडमधील एक महिला हक्क कार्यकर्त्या, मनीषा तोकले या खटल्यादरम्यान राधाच्या संपर्कात होत्या. त्यांनी या आधी राधाला पोलिसात तक्रार नोंदवण्यातही मदत केली होती. "आमच्या वकिलाला [योग्य] निकालाबद्दल विश्वास वाटत होता," मनीषाताई म्हणतात. "पण राधाला परिस्थितीमुळे गोंधळून न जाता खंबीर राहणं आवश्यक होतं." महाराष्ट्र शासन बलात्कार पीडितांना मनोधैर्य योजने अंतर्गत आर्थिक साहाय्य देतं. त्यातून राधाला रू. २.५ लाख मिळतील याची त्यांनी खात्री केली.
मनोज कधीकधी या किचकट न्यायालयीन प्रक्रियेमुळे बेचैन व्हायचा. "तो कधीकधी निराश व्हायचा. मी त्याला धीर द्यायची," त्या सांगतात. तो कसा ठामपणे राधाच्या लढ्यात पाठिंबा उभा राहिले ते मनीषाताईंनी स्वतः पाहिलंय.
महामारीदरम्यान कोर्टाचं कामकाज ऑनलाईन सुरू झालं, आणि आधीच संथ गतीने चाललेला खटला आणखी रेंगाळला. "[तोवर] चार वर्ष झाले होते. लॉकडाऊननंतर काही वेळा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आम्ही हार मानली नाही, पण न्याय मिळायची आशा कमी झाली," राधा म्हणते.
पण तिचं धैर्य आणि जिद्द वाया गेली नाही. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये, गुन्हा घडल्याच्या तब्बल सहा वर्षांनंतर बीड सत्र न्यायालयात आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी सिद्ध झाले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. "आम्ही राधाला निकाल कळवला तेव्हा मिनिटभर ती अवाक् झाली आणि तिला रडू कोसळलं. तिचा लढा अखेर समाप्त झाला," मनीषाताई म्हणतात.
पण तिचा छळ तेवढ्यात थांबला नाही.
दोन महिन्यांनंतर राधाला एक नोटीस बजावण्यात आली ज्यात तिच्यावर दुसऱ्या कोणाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा आरोप होता. ग्राम सेवकाने सही केलेल्या त्या कागदपत्रात म्हटल्याप्रमाणे राधा ज्या जमिनीवर शेती करून राहत होती ती तिच्या गावातल्या इतर चार जणांच्या नावे होती. "ते लोक माझी जमीन बळकावण्याच्या मागे आहेत," राधा म्हणते. "इथे सगळ्यांना माहित्येय की काय घडतंय, पण भीतीपोटी कोणीच मला जाहीरपणे पाठिंबा द्यायला तयार नाही. महामारीत मला कळलं की एका बाईचं आयुष्य बरबाद करायला लोक किती खालच्या पातळीला जाऊ शकतात."
तक्रार नोंदवल्यावर राधावर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला गेला. गुन्हेगार आणि त्याच्या नातेवाईकांची ग्राम पंचायतीच्या सदस्यांशी आणि गावातल्या बड्या प्रस्थांशी सोयरीक आहे
राधाचं कुटुंब ज्या पत्र्याच्या घरात राहतं, ते पावसाळ्यात गळतं आणि उन्हाळ्यात तापतं. "जोराचा वारा आला की वाटतं छत खाली येईल. असं झालं की माझी मुलं पलंगाखाली जाऊन लपतात," ती म्हणते. "माझी अशी हालत आहे, तरी ते माझा पिच्छा सोडत नाहीत. त्यांनी माझं पाणी देखील तोडलं आणि मला इथनं हाकलून लावायची धमकी दिली. पण माझ्याकडं सगळी कागदपत्रं आहेत. मी कुठं नाही जायची."
राधाने तिची जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं. आपल्या जिवाला धोका आहे आणि संरक्षण हवं असल्याचं तिने लिहिलं होतं. नंतर ग्राम सेवकाने जिल्हाधिकाऱ्याला कळवलं की नोटीशीवर त्याची खोटी सही करण्यात आली होती. त्याने सांगितलं की ही जमीन राधाच्या मालकीची आहे.
या घटनेची नोंद घेऊन २०२१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिलं. त्यांनी राधाला आणि तिच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची आणि तिच्यावर तीन गावांनी जाहीर केलेल्या अवैध सामाजिक बहिष्काराची चौकशी करण्याचा आग्रह केला.
आता राधाच्या घराबाहेर कायम एक पोलिस कॉन्स्टेबल असणं अपेक्षित आहे. "मला अजूनही पूर्णपणे सुरक्षित वाटत नाही. पोलिसवाला कधी असतो, कधी नसतो. मला रात्री कधीच गाढ झोप येत नाही," ती म्हणते. "लॉकडाऊनच्या आधी [मार्च २०२०] मला शांत झोप यायची कारण मी गावाच्या दूर राहत होती. आता मी जरा जागीच असते, खासकरून जेंव्हा फक्त मी आणि मुलंच घरी असतो."
मनोज सुद्धा त्याच्या कुटुंबापासून दूर असला की त्याला नीट झोप येत नाही. "ते व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत की नाही याची काळजी वाटत राहते," तो म्हणतो. शहरातील नोकरी गमावल्यानंतर तो रोजंदारी करत होता. त्याला मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पुन्हा नोकरी मिळाली. त्याच्या कामाचं ठिकाण गावाहून ६० किमी लांब आहे, म्हणून तो तिथे एक खोली भाड्याने घेऊन राहतो. "[महामारीच्या] आधी मिळायचा त्याहून आता कमी पगार मिळतो. म्हणून ते आम्हा चौघांना घेऊन राहण्याइतकी मोठी जागा भाड्यानं घेऊ शकत नाही. ते आठवड्यातून ३-४ दिवस येऊन आमच्यासोबत राहतात," राधा म्हणते.
राधाला तिच्या तीन मुलींना – वय ८, १२ आणि १५ – गावातल्या शाळेत कशी वागणूक मिळेल याची काळजी वाटते. शाळा उघडली की त्या शाळेत जाऊ लागतील. "त्यांचा छळ होईल किंवा धमक्या मिळतील, काय माहीत."
तिच्या कुत्र्यांनी तिची चिंता दूर करण्यात मदत केली. "त्यांचा जरा आधार होता. कोणी झोपडीजवळ आलं की ते भुंकायचे," राधा म्हणते. "पण या लोकांनी त्यांना एकेक करून मारायला सुरुवात केली. नुकताच माझ्या चौथ्या कुत्र्याचा खून झाला."
आता पाचवा पाळण्याचा सवालच येत नाही. "निदान गावातले कुत्रे तरी सुरक्षित राहू देत," राधा म्हणते.
या लेखमालेसाठी पार्थ एम एन यांना पुलित्झर सेंटरचे स्वतंत्र अर्थसहाय्य मिळाले आहे.
अनुवादः कौशल काळू