रेशन कार्ड मिळवण्यासाठी दशरथ सिंहाची या वर्षाच्या सुरवातीपासूनच धडपड सुरु आहे. मात्र तुझा अर्ज अजून प्रलंबित आहे असं सांगत उमरिया जिल्ह्यातील अधिकारी त्याची बोळवण करत आहेत. दशरथ सिंहच्या म्हणण्यानुसार अधिकारी त्याला, "तू रु. १५०० दे तुझा अर्ज लगेच मंजूर होईल," असे सांगतात, “मी पैसे काही देऊ शकलेलो नाही.”
दशरथ सिंह मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्याच्या बांधवगड तालुक्यातील कटारिया गावचा रहिवासी आहे. स्वतःचं शेत कसण्यासोबतच तो महिन्यातले काही दिवस जवळपासच्या गावांतील मनरेगाच्या कामावर १०० रुपये रोजाने कामाला जातो. बऱ्याचदा किरकोळ खर्चासाठी त्याला स्थानिक सावकाराकडून थोडे फार पैसे उसने घ्यावे लागतात – नुकतेच लॉकडाउन काळात त्याला रु. १५०० कर्जाने घ्यावे लागले होते.
रेशन कार्ड नसल्याने – ज्याचा एरवीही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोठाच आधार असतो आणि लॉकडाउनमध्ये तर अधिकच – दशरथच्या कुटुंबाला नाईलाजास्तव बाजारभावाने अन्नधान्य विकत घ्यावं लागतंय. दशरथची बायको २५ वर्षीय सरिता सिंहच्या म्हणण्यानुसार दर वर्षी शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचं अगदी जेमतेम भागतं. त्यांच्या कुटुंबाची २.५ एकर जमीन आहे ज्यात ते प्रामुख्याने कोद्रा आणि वरई ही तृणधान्यं आणि गहू व मक्याचं पीक घेतात.
दरम्यान, ४० वर्षीय दशरथची रेशनकार्ड मिळवण्यासाठीची खटपट चालूच आहे. तो म्हणतो, "या वर्षीच्या २६ जानेवारीला कटारियाला झालेल्या ग्रामसभेत रेशन कार्डासाठी एक अर्ज भरावा लागेल असं त्याला सांगण्यात आलं." गावच्या सरपंचाने त्याला अंदाजे ७० किलोमीटरवर असणाऱ्या मानपूरमधल्या लोक सेवा केंद्राला भेट देण्याचा सल्ला दिला. तिथे एक वेळच्या बस तिकिटाला ३० रुपये लागतात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दशरथ दोन चकरा मारून आला – म्हणजे एकूण चार बस फेऱ्यांचा तिकीट खर्च आला. मध्य प्रदेशातील लॉक डाउन सुरु होण्यापूर्वी (२३ मार्च) तो त्याच्या गावापासून ३० किलोमीटर लांब असलेल्या बांधवगडमधल्या तालुक्याच्या कचेरीततही जाऊन आला होता. त्याचं स्वतःचं वैयक्तिक ओळखपत्र नसल्यानं त्याच्या अर्जावर कार्यवाही करण्यात आलेली नाही, असं तिथे त्याला सांगण्यात आलं.
स्वतंत्र ओळखपत्र मिळवण्यासाठी मानपूर केंद्राने त्याला कारकेलीतील तालुक्याच्या कार्यालयात जायला सांगितलं जे त्याच्या गावापासून ४० किलोमीटरवर आहे. "त्यांनी मला सांगितलं की माझ्या नावावर स्वतंत्र ओळखपत्र असणं आवश्यक आहे. पूर्वी आमच्या सर्व कुटुंबाचं मिळून एकच सामायिक ओळखपत्र होतं ज्यात माझ्या भावांची नावंही होती. त्यानुसार मी कारकेलीला जाऊन स्वतंत्र ओळखपत्र बनवून घेतलं." दशरथचं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आहे.






