"आमचं जीवन एक जुगार आहे. मागची दोन वर्षं आम्ही कशी काढलीत ते देवच जाणे," व्ही. धर्मा म्हणतात. "लोककलांच्या ४७ वर्षांच्या या काळात, मागच्या दोन वर्षांत पहिल्यांदाच आमचे खाण्यापिण्याचे वांधे झालेत."
धर्मा अम्मा, वय ६०, तमिळनाडूच्या मदुरै जिल्ह्यात राहणाऱ्या एक तृतीयपंथी महिला कलावंत आहेत. "आम्हाला नियमित पगार नसतो," त्या सांगतात. "आणि या कोरोना [महामारी]मुळे कमाईच्या ज्या काही थोड्याफार संधी असतात त्याही गमावून बसलोय."
मदुरै जिल्ह्यातील तृतीयपंथी लोककलावंतांसाठी वर्षाचे पहिले सहा महिने कळीचे असतात. या काळात गावात जत्रा आणि मंदिरांत सांस्कृतिक कार्यक्रम असतात. पण टाळेबंदी दरम्यान मोठ्या सार्वजनिक समारंभांवर निर्बंध आल्यामुळे तमिळनाडूतील तृतीयपंथी महिला कलावंतांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यांची संख्या जवळपास ५०० असेल, असा ६० वर्षीय धर्मा अम्मा (लोक त्यांना याच नावाने हाक मारतात) यांचा अंदाज आहे. त्या स्टेट ऑर्गनायझेशन फॉर ट्रान्स विमेन इन ड्रामा अँड फोक आर्ट या संस्थेच्या सचिव आहेत.
धर्मा अम्मा मदुरै रेल्वे स्टेशनजवळ आपला भाचा आणि त्याच्या दोन मुलांसोबत एका भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांचे आईवडील मदुरै शहरात रोजंदारी करायचे. तिथे लहानाचं मोठं होत असताना त्या इतर तृतीयपंथीयांना मंदिरांमध्ये आणि शेजारच्या गावांमध्ये कला सादर करताना पाहायच्या.
त्या १४ वर्षांच्या असल्यापासून गाऊ लागल्या. "श्रीमंत लोक आम्हाला त्यांच्या घरी मयतीच्या वेळी गायला बोलवायचे," धर्मा अम्मा म्हणतात. (त्या आपल्या समाजाच्या लोकांचा उल्लेख करण्यासाठी तृतीयपंथीयांसाठी तमिळ भाषेतील तिरूनंगई हा शब्द वापरतात.) "आम्हाला ओप्पारी (शोकगीत) आणि मराडी पाटू (ऊर बडवणे) यांचे पैसे मिळायचे. माझा लोककलेत प्रवेश झाला तो असा."
त्या काळी चार तृतीयपंथी कलावंतांच्या गटाला एकूण रू. १०१ मिळायचे. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी सुरू होण्याआधी धर्मा अम्मा अधूनमधून हे काम करायच्या, त्याचे त्यांना प्रत्येकी ६०० रुपये मिळायचे.
१९७० मध्ये त्या वरिष्ठ कलावंतांकडून तालट्टू (अंगाई) आणि नाटूपुरा पाटू (लोकगीते) शिकल्या. आणि कालांतराने त्यांचे कार्यक्रम पाहून त्यांनी हालचाली अवगत करून घेतल्या आणि त्या राजा राणी आट्टम् मध्ये राणीची भूमिका करू लागल्या. हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागांत सादर करण्यात येणारा एक पारंपरिक नृत्य-नाट्यप्रकार आहे.
"१९७० च्या काळात मदुरैमध्ये [या नृत्य-नाट्यातील] राजा, दोन राण्या आणि गुलाम हे चारही पात्र पुरुषच वेश घालून सादर करायचे." धर्मा अम्मा सांगतात. त्या म्हणतात की त्यांनी आणखी तिघांना सोबत घेऊन एका गावात पहिल्यांदाच तृतीयपंथी कलावंतांचा राजा राणी आट्टम् कार्यक्रम सादर केला होता.
स्थानिक शिक्षकांच्या मदतीने त्या डोक्यावर मडकं तोलायचा करगट्टम् हा नृत्यप्रकारही शिकल्या. "यातून मला सांस्कृतिक आणि अगदी शासकीय कार्यक्रमांत देखील आपली कला सादर करण्याची संधी मिळाली," त्या म्हणतात.
नंतर त्यांनी माडू आट्टम् (ज्यात गायीचा वेश धारण करून नृत्य सादर करतात), मैयिल आट्टम् (मयूर नृत्य) आणि पोई काल कुडुरै आट्टम् (लंगड्या घोड्याचं नृत्य) या नृत्य प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवलं. तमिळनाडूतील अनेक गावांमध्ये हे कार्यक्रम व्हायचे. "चेहऱ्याला पावडर लावून एकदा रात्री १० वाजता नाचायला सुरुवात केली की पहाटे ४-५ वाजेस्तोवर आम्ही थांबायचोच नाही," धर्मा अम्मा म्हणतात.
जानेवारी ते जून-जुलै या तेजीच्या हंगामात अनेक आमंत्रणं आणि ठिकठिकाणच्या कार्यक्रमांतून त्यांना महिन्याला रू. ८,००० ते रू. १०,००० मिळायचे. बाकी काळ त्या महिन्याला कसेबसे रू. ३,००० कमवत होत्या.
महामारी-टाळेबंदी यांनी हे पार बदलून टाकलं. "तमिळ नाडू एयल इसई नाटक मनरमची सभासद असूनही काही फायदा झाला नाही," त्या म्हणतात. तमिळ नाडू संगीत नाटक साहित्य मंडळ हे राज्याच्या कला व संस्कृती संचालनालयाचा एक घटक आहे. "महिला व पुरुष कलावंतांना सहज पेन्शन मिळते, पण ट्रान्स-तृतीयपंथीयांना ते फार कठीण असतं. माझा अर्ज किती तरी वेळा नाकारण्यात आलाय. अधिकाऱ्यांनी मला शिफारशी आणायला सांगितलं. त्या कोणाला मागतात ते मला माहीत नाही. मला थोडी मदत झाली असती तर असल्या भयंकर काळात जरा दिलासा मिळाला असता. आम्ही फक्त राशनचा तांदूळ शिजवून खातोय, भाज्या घेण्यापुरतेही पैसे नाहीयेत."
*****
मदुरै शहराहून सुमारे १० किमी अंतरावरील विलंगुडी गावात मागी हीसुद्धा अशाच परिस्थितीचा सामना करतेय. मागील वर्षापर्यंत ती मदुरै आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कुम्मी पाटू गाऊन पैसे कमवायची. पेरणीनंतर बीज अंकुरलं की त्याचा सोहळा म्हणून ही पारंपरिक गाणी सादर करणाऱ्या या जिल्ह्यातल्या मोजक्या काही तृतीयपंथी महिलांपैकी एक आहे.
"ट्रान्स महिला असल्यामुळे मला [मदुरैमधील] घर सोडावं लागलं [तिचे आईवडील शेजारच्या गावांमध्ये शेतमजूर होते]," ३० वर्षीय मागी (ती हेच नाव वापरते) म्हणते. "तेव्हा मी २२ वर्षांची होते. एक मैत्रीण मला मुलैपारी उत्सवात घेऊन गेली, तिथे मी कुम्मी पाटू शिकू लागले."
विलंगुडीत मागी इतर २५ तृतीयपंथी महिलांसोबत राहते त्यांपैकी केवळ दोघीच कुम्मी पाटू गातात, ती म्हणते. तमिळनाडूत दरवर्षी जुलै महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या १० दिवसांच्या मुलैपारी उत्सवात हे गाणं गातात. पाऊस, जमिनीची सुपीकता आणि चांगलं पीक यावं म्हणून या गाण्यातून गावदेवीची प्रार्थना करण्यात येते. "या उत्सवात आम्हाला रू. ४,००० ते रू. ५,००० मिळतात," मागी म्हणते. "आणि आम्हाला मंदिरांत नाचायला मिळतं, अर्थात त्याची काही खात्री नसते."
पण जुलै २०२० मध्ये आणि याही वर्षी हा उत्सव झाला नाही. आणि मागील वर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू झाल्यापासून मागी इतर कार्यक्रमांसाठी फारच कमी वेळा बाहेर पडली. "यावर्षी आम्हाला लॉकडाऊन होण्याआधी तीन दिवस [मार्चच्या मध्यात] मदुरैमध्ये एका मंदिरात नाचायला मिळालं," ती म्हणते.
आता आमंत्रणं आणि कार्यक्रमांचा काळ जुलै महिन्यात संपत आल्यामुळे मागी आणि तिच्या सोबतीणींना पुढे वर्षभर कामाच्या संधी मिळणार नाहीत
मागील वर्षी टाळेबंदी सुरू झाल्यापासून अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी तृतीयपंथी कलावंतांना काही वेळा राशन दिलंय. आणि मागी कला व संस्कृती संचालनालयात नोंदणीकृत असल्यामुळे तिला यावर्षी शासनाकडून रू. २,००० मिळाले. "बाकी बऱ्याच जणांना काहीच मिळालं नाही, हे त्यांचं नशीब," ती म्हणते.
मात्र, टाळेबंदी होण्याआधी तेजीच्या हंगामातही आमंत्रणं कमी होऊ लागली होती, असं मागी म्हणते. "आता बरेच स्त्री पुरुष कुम्मी पाटू शिकतायत, आणि मंदिरात कला सादर करायला त्यांनाच पसंती देतात. आम्हाला बऱ्याच ठिकाणी भेदभाव सहन करावा लागतो. अगोदर हा कलाप्रकार केवळ लोककलावंतांनाच माहीत होता आणि पुष्कळ तृतीयपंथी महिला तो सादर करायच्या, पण त्याची लोकप्रियता वाढली आणि आमच्या संधी कमी झाल्या."
*****
मदुरै शहराहून सुमारे १०० किमी लांब असलेल्या पुदुकोट्टई जिल्ह्यातील विरलीमलई शहरात वर्षा हीदेखील गेलं सव्वा वर्षँ अडचणीत आलीय. अगदी रोज लागणारं सामान विकत घेण्याइतके देखील पैसे उरले नसल्याने तिला आपल्या धाकट्या भावापुढे हात पसरावे लागले. त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला असून तो एका स्थानिक कंपनीत कामाला आहे.
२९ वर्षीय वर्षा मदुरै कामराज विद्यापीठात लोककला या विषयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला आहे. टाळेबंदी लागू होण्याआधी ती जत्रा आणि मंदिरांत रात्री लोकनृत्य सादर करून पैसे कमवायची, आणि दिवसा अभ्यास करायची – मध्ये केवळ २-३ तासांची विश्रांती घ्यायची.
तिच्या मते कट्ट काल आट्टम् सादर करणारी ती पहिलीच तृतीयपंथी महिला आहे (एका स्थानिक वृत्तपत्रात याचा उल्लेख असलेल्या बातमीचं कात्रण तिने मला पाठवलं), यात कलाकार लाकडी पायांवर नाचतात. त्यासाठी पुष्कळ अनुभव आणि तोल सांभाळायचं कसब लागतं.
वर्षा इतरही नृत्य प्रकारांमध्ये प्रवीण आहे. उदाहरणार्थ, ताप्पाट्टम् ज्यात नर्तकी थप्पू या प्रामुख्याने दलितांमध्ये वाजवण्यात येणाऱ्या पारंपरिक ढोलाच्या तालावर ठेका धरतात. पण ती म्हणते की देविगा नादनम (देविका नृत्य) तिचं आवडतं नृत्य आहे. ती तमिळनाडूत एक प्रसिद्ध लोककलावंत असून तिच्या कार्यक्रमांचं मोठ्या तमिळ वाहिन्यांवर प्रसारण देखील झालंय. स्थानिक संस्थांनी तिचा मानसन्मान केला असून ती कार्यक्रमाच्या निमित्ताने बेंगळुरू, चेन्नई आणि दिल्लीला गेली आहे.
वर्षा (ती हेच नाव वापरणं पसंत करते) ही अर्धनारी कलै कुळु या २०१८ मध्ये स्थापन झालेल्या तृतीयपंथी महिला कलावंतांच्या एका गटाची संस्थापक सदस्य देखील आहे. उरलेल्या सात सदस्या मदुरै जिल्ह्यातील निरनिराळ्या गावांमध्ये राहतात. कोविडची पहिली आणि दुसरी लाट येण्याआधी त्यांना जानेवारी ते जूनपर्यंत किमान १५ आमंत्रणं तरी मिळायचे. "आम्हाला दर महिन्याला कमीत कमी रू. १०,००० कमावता यायचे," वर्षा म्हणते.
"कला हेच माझं जीवन आहे," ती म्हणते. "कार्यक्रम केले तरच आम्हाला पोट भरता येतं. पहिल्या सहा महिन्यांत जेवढी कमाई व्हायची त्यात आम्ही उरलेलं वर्ष काढायचो." तिच्यासारख्या तृतीयपंथी महिलांना मिळणाऱ्या पैशातून त्यांचे नेहमीचे खर्चच भागत असत. "बचत करण्यापुरते पैसे कधीच नव्हते," ती म्हणते. "बचत करणं खूप कठीण आहे कारण आम्हाला कपडे, प्रवास आणि खाण्यापिण्यावरही खर्च करावा लागतो. पंचायत ऑफिसात लोन घ्यायला गेलो की आमचे अर्ज फेटाळून लावतात. [पुरेशा कागदपत्रांच्या अभावी] आम्हाला कुठल्या बँकेतूनही कर्ज मिळत नाही. आता अशी वेळ आलीये की कोणी रू. १०० दिले तरी आम्ही नाचायला तयार आहोत."
वर्षाला आपण ट्रान्स आहोत याची इयत्ता ५वीत असताना जाणीव झाली तेंव्हा ती १० वर्षांची होती. तिने १२ वर्षांची असताना पहिल्यांदा लोक नृत्य सादर केलं – हे नृत्य ती स्थानिक उत्सवांमध्ये पाहून शिकली होती. तिने विद्यापीठात लोकनृत्याचं शिक्षण घ्यायला प्रवेश घेतला तेंव्हा कुठे तिला औपचारिक प्रशिक्षण मिळालं.
"घरच्यांनी माझा स्वीकार केला नाही, आणि मला वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडावं लागलं. लोककलेविषयी माझी तळमळ पाहून [कालांतराने] त्यांनी मला स्वीकारलं," वर्षा म्हणते. ती आपली आई आणि धाकट्या भावासोबत विरलीमलई गावी राहते. तिची आई पूर्वी शेतात मजुरी करायची.
"पण गेली दोन वर्ष [मार्च २०२० मधल्या पहिल्या टाळेबंदीपासून] मी घरी बसून आहे. आम्हाला [मैत्रिणी वगळता] कोणाकडूनही कुठल्याच प्रकारची मदत मिळाली नाहीये. मी काही एनजीओ आणि व्यक्तींकडे मदत मागायला गेली होती. ज्यांनी मागच्या वर्षी आम्हाला मदत केली त्यांनाही यावर्षी मदत करता आली नाही," ती म्हणते. "गावाकडच्या तृतीयपंथी लोककलावंतांना शासनाकडूनही कुठल्याच प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही आमच्यावर काही काम नसताना स्वतःचं पोट भरायची वेळ आली. आम्ही कुणाच्या खिजगणतीत नाही."
या कहाणीसाठी सगळ्या मुलाखती फोनवर घेण्यात आल्या.