तो जुनाही आणि नवाही. पुरातनही आणि आधुनिकही. फार मोठं ऐतिहासिक मोल आहे त्याला आणि तरीही अगदी आधुनिक संदर्भ. पुदु मंडपम म्हणजे अख्ख्या मदुराईचं छोटंसं रूप. या ३८४ वर्षं जुन्या इमारतीत दुकानंही आहेत आणि इथे या पुरातन शहराचा गाभा जसा जपला गेलाय तसा ते इतरत्र कुठेही नाही. झगमगीत, विविध रंगी कापडांचे पोषाख शिवले जात असतात, दुकानांमध्ये पारंपरिक भांडीकुंडी विकायला ठेवलेली असतात, या जागेचे अनेक न्यारे ढंग आहेत.
तमिळ नाडूच्या कदाचित सर्वात जास्त महत्त्व असणाऱ्या हिंदू मंदिरातल्या उत्सवाला गर्दी करणाऱ्या भक्तांसाठी इथे पोषाख शिवले जातात. आणि या पोषाख शिवणाऱ्या १५० जणांपैकी जवळ जवळ एक तृतीयांश या शहरातले मुस्लिम आहेत. आणि हे पोषाख परिधान करणारे मदुराईच्या आसपासच्या खेड्यापाड्यातले मुस्लिम आहेत.
या शिलाईकाम कारागिरांना जर विचारलं की ते मुस्लिम असूनही एका हिंदू सणासाठी पोषाख शिवतायत ते कसं, तर ते हा प्रश्न धुडकावून लावतात. “हा काही उत्तर भारत नाहीये, मॅडम,” आमीर जॉन म्हणतात. “आम्ही पिढ्या न् पिढ्या एकमेकासोबत राहिलोय आणि एकमेकांना नात्याने पुकारतो. इथे काहीही चुकीचं कसं घडू शकेल?”
“यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?” ४२ वर्षीय मुबारक अली विचारतात. तेही पुदु मंडपममध्ये पोषाख शिवतात. “आम्ही पिढ्या न पिढ्या हे करत आलो आहोत.”










