मी मुंबईतल्या ज्या झोपडपट्टीत लहानाची मोठी झाले, तिथे रोज संध्याकाळी ६ च्या सुमारास किराणा दुकानाबाहेर खूप गर्दी जमायची. ते साल म्हणजे २००० चं. पाव किलो तांदूळ, १ रुपयाचं तिखट-मीठ, एक-दोन रुपयांचं तेल, चाराणे-आठाण्याची राई-हळद वगैरे, एक-दोन कांदे, पाव किलो तूरडाळ आणि गव्हाचं पीठ, स्टोव्ह पेटवण्यापुरतं घासलेट अशी सगळी सामग्री घ्यायला किरकोळ ग्राहक त्या मोठाल्या दुकानासमोर गर्दी करायचे.
ते लोक १५० रुपयांच्या रोजंदारीतून रोज थोडं-थोडं सामान भरायचे. २५ आणि ५० पैसेही चलनात होते तेंव्हा. अगदी स्वस्तातला स्वस्त तांदूळही २० रुपये किलोला आणि तुरीची डाळ २४ रुपये किलोला मिळायची. बहुतेक लोक पाव किलो-अर्धा किलो असंच खरेदी करायचे. कुणास ठाऊक, पण आमच्या राशनच्या दुकानावर आम्हाला फक्त साखर, पाम तेल आणि घासलेट मिळायचं. बाकी सगळी खरेदी किराणा दुकानातूनच व्हायची.
सकाळी ८ वाजल्यापासून सलग काम करून थकून भागून आलेली मजूर मंडळी ७०-८० रुपयांची सामग्री विकत घेऊन ३-४ जणांच्या दिवसभराच्या खाण्याची सोय करायची. महिन्याचं घराचं भाडं, वीजबील, पाणीबील, याचा हिशोब मांडून उरलेली रक्कम – रू. २,००० हून कमी – महिन्याअखेरीस पोस्टाने किंवा कोणी ओळखीचं जात असल्यास त्याच्या हाती गावी पाठवली जायची.
रोज कमवा, रोज भागवा असं त्यांचं आयुष्य. आमचं घरही लिंबू-मिर्ची विकून चालायचं, त्यामुळे रोजची कमाई. मग आई रोज संध्याकाळी मला दुकानात पाठवायची, थोडं-थोडं तिखट-मीठ-तांदूळ आणायला. मी तेंव्हा नऊ वर्षांची होते. मला दुकानातल्या आज्जी “काय पाहिजे तुला?” असं विचारेपर्यंत मी नुसतं त्यांच्याकडे पाहत राहायचे.
राशनच्या दुकानावर बरेच चेहरे ओळखीचे झाले होते. मग एकमेकांना नुसतं पाहून हसायचो. ते मराठीत बोलत नव्हते. पिक्चरमध्ये जसं बोलतात, त्या हिंदी भाषेत बोलायचे. ते दुसऱ्या राज्यातून आले असावेत, याची काहीच कल्पना नव्हती मला.
अगदी अरुंद गल्ल्यांमध्ये एकमेकांना चिकटून असलेल्या, दहा बाय दहाच्या आमच्या खोल्या. आजही या शहरात निमुळत्या गल्लीबोळात अशी लागून असलेली बरीच घरं आहेत. काही घरांमध्ये १०-१२ जणही एकत्र भाड्यानं राहायचे, सगळे पुरुषच असायचे. काही घरांमध्ये बिऱ्हाडंही असायची.



