मारुती व्हॅन भरलीये आणि निघतेच आहे. मिळेल त्या जागेत शेतकरी बसलेत, काही जण चक्क दुसऱ्यांच्या मांडीवर. त्यांच्या बॅगा आणि काठ्या मागच्या सीटमागच्या चिंचोळ्या जागेत कोंबून ठेवल्या आहेत.
पण मंगल घाटगेंच्या शेजारची एक सीट मात्र चक्क रिकामी आहे. त्या कोणालाही तिथे बसू देत नाहीत – ती ‘रिझर्व’ केलीये. आणि मग मीराबाई लांगे व्हॅनपर्यंत येतात आणि ती रिकामी जागा पटकवतात. साडी नीटनेटकी करतात णि मंगल त्यांना कवेत घेतात. दार लागतं आणि मंगल ड्रायव्हरला म्हणतात, “चल, रे.”
५३ वर्षांच्या मंगल आणि ६५ वर्षांच्या मीराबाई, दोघी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या शिंदवड गावच्या. पण गेल्या काही वर्षांत त्यांची जी मैत्री झालीये ती काही एका गावच्या आहेत म्हणून नाही. “गावात कसं घरात, रानात आम्ही कामातच असतो,” मंगल सांगतात. “निदर्शनं असली की कसं गप्पा मारायला वेळ भेटतो.”
मार्च २०१८ मध्ये नाशिकहून मुंबईला चालत आलेल्या किसान लाँग मार्चमध्ये त्या एकत्र होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीत भरलेल्या किसान मुक्ती मोर्चालाही त्या गेल्या होत्या. आणि आता नाशिकहून दिल्लीला निघालेल्या चारचाकी जत्थ्यासोबतही त्या निघाल्या आहेत. या निदर्शनांमध्ये का जाताय असं विचारल्यावर मंगल म्हणतात, “पोटासाठी.”
देशाच्या राजधानीच्या वेशीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी हजारो, लाखो शेतकरी केंद्राने या वर्षी सप्टेंबर महिन्यात संसदेत रेटून पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करतायत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि एकजुट व्यक्त करण्यासाठी २१ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातून सुमारे २००० शेतकऱ्यांचा जत्था नाशिकहून १४०० किलोमीटर दूर दिल्लीच्या दिशेने निघाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न अकिल भारतीय किसान सभेने हा जत्था आयोजित केला आहे.
तर या झुंजार आंदोलकांमधल्या दोघी म्हणजे मंगल आणि मीराबाई.
पिवळसर छापील पातळ नेसलेल्या, डोक्यावर पदर घेतलेल्या मंगलताईंचा वावर म्हणजे “यात काय नवीन” असा आहे. २१ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये एका मैदानातून हा जत्था सुरू होणार होता. तिथे शिरल्या शिरल्या आधी त्यांनी ज्या टेम्पोनी प्रवास करायचा होता त्याची चौकशी सुरू केली. ही सगळी माहिती घेण्याचं काम मीराबाईंनी त्यांच्यावर सोपवलंय. “मला फार उत्सुकता लागलीये,” मंगल म्हणतात. “हे सरकार शेतकऱ्याच्या लईच विरोधात आहे. [दिल्लीच्या वेशीवर] तिथं ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचा आम्हाला कौतुक आहे आणि आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायचाय.”
मंगलच्या कुटुंबाची २ एकर शेतजमीन आहे त्यात ते भात, गहू आणि कांदा घेतात. पण त्यांची मुख्य कमाई म्हणजे शेतमजुरीतून मिळणारा २५० रुपये रोजगार. जेव्हा त्या आठवडाभराहून जास्त काळ चालणाऱ्या आंदोलनात भाग घेतात तेव्हा त्यांच्या महिन्याच्या एक चतुर्थांश कमाईवर त्यांना पाणी सोडावं लागतं. “आपल्याला बाहेर काय चालू आहे ते पहावं लागेलं की नाय,” त्या म्हणतात. “हे आंदोलन सगळ्याच शेतकऱ्यांसाठी आहे.”
आम्ही मैदानात भेटलो त्याला दहाच मिनिटं झाली असतील, गाड्यांची रांग या टोकापासून त्या टोकाला लागायला सुरुवात झाली. तेवढ्यात मीराबाई त्यांना शोधत शोधत येतात. त्यांना इशारा करत, आमच्या गप्पा थांबवायला सांगतात. तिथे किसान सभेचे नेते भाषणं देतायत, तिथे चल असं त्या त्यांना खुणावून सांगतात. पण मंगल मात्र त्यांना आमच्या गप्पांमध्ये सामील व्हायला सांगतात. मीराबाई तशा बुजऱ्या पण या दोघी शेतकरी बायांना त्या आणि इतर शेतकरी आंदोलन का करतायत आणि या नव्या कायद्यांमुळे काय नुकसान होणार आहे हे पक्कं माहित आहे.
“आमची शेती तशी खायापुरतीच आहे,” मंगल सांगतात. “जर का आम्ही कांदा किंवा तांदूळ विकलाच तर तो आम्ही वणीच्या बाजारात विकतो.” त्यांच्या गावाहून १५ किलोमीटरवर असलेल्या वणीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जिथे लिलाव होतात आणि शेतमाल विकला जातो. शेतकऱ्यांना कधी कधी हमी भाव मिळतो, कधी नाही. “किमान हमीभाव आणि खात्रीची बाजारपेठ किती महत्त्वाची आहे, ते आम्हाला समजतं,” मंगल म्हणतात. “हे नवे कायदे आणलेत ना, त्यामुळे ज्यांना आता हमीभाव मिळतोय त्यांना देखील आता तो मिळायचा नाही. आमच्या हक्कासाठी सदा न् कदा आम्हाला आंदोलनं करावी लागतायत, त्याचं वाईट वाटतं.”
२०१८ साली मार्चमध्ये, शेतकऱ्यांचा – ज्यातले अनेक आदिवासी शेतकरी होते – पायी किसान लाँग मार्च नाशिक ते मुंबई असं १८० किलोमीटर अंतर सात दिवसात पार करून आला. जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे व्हावेत ही त्यांची मुख्य मागणी होती. “नाशिक-मुंबई मोर्चानंतर त्या कामाला जरा गती मिळाली,” मीराबाई सांगतात. त्यांच्या दीड एकरात त्या मुख्यतः भाताचं पीक घेतात.
“पण आम्ही लई थकून गेलो. एका आठवड्यानंतर माझी पाठ अशी धरली होती. पण आम्ही पोचलो. माज्याइतका त्रास मंगलला झाला नाही, आता वय हाय ना.”
२०१८ सालच्या मार्चमधल्या त्या एक आठवड्याच्या मोर्चामध्ये मंगल आणि मीराबाईंनी एकमेकींची छान काळजी घेतली. “ती दमली, तर मी थांबायचे आणि मला चालावंसं वाटलं नाही, तर ती माझ्यासाठी थांबायची,” मंगल सांगतात. “कठीण दिवसात असंच निभावून न्यायचं असतं. शेवट गोड झाला की सगळं छान म्हणायचं. या सरकारला जाग यावी यासाठी आमच्यासारख्या लोकांना आठ दिवस अनवाणी चालावं लागलं बघा.”
आणि आता, पुन्हा एकदा त्या दिल्लीच्या वाटेवर निघाल्या आहेत, मोदी सरकारला ‘जागं करायला’. “सरकार हे कायदे मागे घेत नाही, तोवर आम्ही दिल्लीतून हलणारच नाही,” मंगल म्हणतात. “भरपूर गरम कापडं घेतलीयेत. दिल्लीला काय पहिल्यांदा नाय चालले.”
मंगल राजधानी दिल्लीत पहिल्यांदा गेल्या १९९० साली. “नानासाहेब मालुसऱ्यांसंगं,” त्या सांगतात. नानासाहेब नाशिक जिल्ह्यातले किसान सभेचे मोठे नेते होते. त्याला आता ३० वर्षं उलटली तरी शेतकऱ्यांच्या मागण्या अजूनही त्याच आहेत. मंगल आणि मीराबाई दोघी महादेव कोळी, आदिवासी आहेत. गेली किती तरी वर्षं त्या जी जमीन कसतायत ती तांत्रिक दृष्ट्या वन खात्याच्या मालकीची आहे. “ती आमच्या मालकीची नाही,” त्या सांगतात. २००६ साली आलेल्या वन हक्क कायद्याने खरं तर त्यांना त्यांच्या जमिनीची मालकी देऊ केली, त्या संदर्भात त्या सांगतात.
इतर आंदोलकांप्रमाणे त्यांनाही कंत्राटी शेतीबद्दलच्या कायद्याची भीती वाटतीये. अनेक जण या कायद्यावर टीका करतायत आणि म्हणतायत की बड्या कंपन्यांबरोबर करार करणाऱ्या शेतकऱ्यांवर अखेर त्यांच्या स्वतःच्याच शेतात वेठबिगारी करण्याची वेळ येऊ शकते. “आम्ही आमच्या जमिनींसाठी किती तरी वर्षं संघर्ष करतोय,” मंगल सांगतात. “आपल्या जमिनी स्वतःच्या ताब्यात असणं किती महत्वाचं आहे ते आम्हाला माहितीये. आम्ही अख्खी जिंदगी त्याच्यासाठीच तर झगडतोय. थोड्या गोष्टी मिळाल्यात सुद्धा. आणि या सगळ्यात आपल्यासारखंच दुःख असणाऱ्या मैत्रिणी देखील मिळाल्या बघा.”
त्यांची मैत्री आता एकदम घट्ट झालीये. एकमेकींच्या सवयी सगळं त्यांना माहितीये. मीराबाईंचं वय जास्त असल्याने मंगल त्यांची जास्त काळजी घेताना दिसतात. त्यांच्यासाठी जागा धरण्यापासून ते लघवी त्यांच्याबरोबर जाईपर्यंत. एकमेकीला त्या सोडतच नाहीत. जत्थ्याचे आयोजक आंदोलकांना केळी वाटत होते, तर मंगलताईंनी मीराबाईंसाठी एक जादा केळं घेऊन ठेवलं.
आमची मुलाखत संपली आणि मी मंगलताईंचा फोन नंबर विचारला. त्यानंतर मी मीराबाईंचा नंबर विचारणार, इत्याक मंगल झटकन म्हणाल्या, “त्याची काहीच गरज नाय. त्यांच्याशी बोलायचं तर माझ्याच नंबरवर फोन करा की.”
ता.क.: मी २१ आणि २२ डिसेंबर रोजी मंगल आणि मीराबाईंना भेटलो. २३ तारखेच्या सकाळी मात्र त्यांनी जत्थ्यातून माघारी जायचा निर्णय घेतला. २४ डिसेंबरला मी त्यांना जेव्हा फोन केला, तेव्हा मंगल म्हणाल्या, “मध्य प्रदेशच्या सीमेवरूनच आम्ही माघारी जायचं ठरवलं. थंडी सहनच झाली नाही.” त्यांचा टेम्पो मागून उघडाच होता त्यामुळे आत शिरणारं बोचरं वारं काही त्यांना मानवलं नाही.यापुढे थंडी जास्तच वाढत जाणार याचा अंदाज आल्यावर मात्र त्यांनी तब्येत बिघडायला नको म्हणून आपल्या गावी शिंदवडला माघारी जायचं ठरवलं. “मीराबाईला लईच थंडी वाजत होती. मला बी,” मंगल म्हणाल्या. नाशिकमध्ये गोळा झालेल्या २,००० शेतकऱ्यांपैकी किमान १,००० शेतकरी मध्य प्रदेशाची सीमा ओलांडून दिल्लीच्या वाटेवर आहेत.
अनुवादः मेधा काळे