पुराचं पाणी वाढायला लागलं तेव्हा पार्वती वासुदेव यांनी घर सोडताना त्यांच्या पतीची टोपी तेवढी घेतली. “आम्ही फक्त टोपी आणि चिपळी आणलीया. काही होऊ द्या, टोपी सोडून जाणंच शक्य नाही,” त्या म्हणतात. टोपीवर मोरपिसं लावलीयेत. पहाटे गाणी गाताना गोपाळ वासुदेवांच्या डोक्यावर ही टोपी असतेच.
९ ऑगस्ट रोजी, सत्तरी पार केलेले गोपाळ वासुदेव शाळेच्या एका वर्गाच्या कोपऱ्यात बसले होते, चेहऱ्यावरचं दुःख लपत नव्हतं. “माझी तीन शेरडं गेली आणि एकाला कसं तरी सोबत आणलं, तेही जगेल असं वाटत नाही,” ते म्हणतात. गोपाळ वासुदेव समाजाचे आहेत, पहाटे दारोदारी जाऊन कृष्णाची भजनं गाऊन भिक्षा मागायची हे त्यांचं काम. पावसाळ्यात कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या आपल्या भेंडवडे या गावी ते शेतमजुरी करतात. “महिना झाला, जोरदार पावसामुळे रानानी कामं नव्हती आणि आता परत पुराचं पाणी शिरलंया,” पाणावलेल्या डोळ्यांनी ते सांगतात.
भेंडवड्याच्या शेतकऱ्यांनी पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या पेरण्या जुलैपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. पण पाऊस आला तो असा काही की एका महिन्यातच सोयाबीन, भुईमूग आणि ऊस पाण्याखाली गेला.


















