“सोमवारपासून [१६ मार्चपासून] आम्हाला काहीही काम मिळालेलं नाय. पैसा कुठनं आनायचा?” वंदना उंबरसडा म्हणतात. त्यांची ७ वर्षांची नात ५ रुपये दे म्हणून मागे लागली होती तिच्याविषयी.
पालघर जिल्ह्यातल्या कवटेपाडा गावात आपल्या घरी अंगणात बसलेल्या ५५ वर्षांच्या वंदना वाडा तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधकामावर मजुरीला जातात. त्या सांगतात, “काय चाललंय ते पन कलत नाय. माजा पोरगा मला सांगतो की तू घरी बस कारन कोनता तर आजार आलाय इकडं आन् सरकार सांगतंय की घराच्या बाहेर पडू नका.”
दुपारचे ४ वाजून गेलेत आणि वंदनाचे अनेक शेजारी पाजारी तिच्या घराबाहेर अंगणात गोळा झालेत. त्यांच्या बोलण्यात अनेक विषय असले तरी मुख्य चर्चा आहे ती कोविड-१९ च्या संकटाची. त्यातली एकच, तीही तरुण मुलगी सांगते की सगळ्यांनी बोलताना एकमेकांपासून लांब थांबा म्हणून. इथल्या लोकांच्या सांगण्यानुसार कवटेपाड्यावर सुमारे ७० घरं आहेत. आणि सगळे जण वारली समुदायाचे आहेत.
लॉकडाउन सुरू व्हायच्या आधी वंदना आणि त्यांच्या शेजारी मनिता उंबरसडा सकाळी ८ वाजताच कामाला लागायच्या. दहा किलोमीटर चालत जाऊन त्या वाडा शहरातल्या बांधकामांवर पोचायच्या. तिथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ असं काम करून रोजचे २०० रुपये कमवायचे. वंदना सांगतात की त्यांना महिन्याला ४,००० रुपयांचं तरी काम मिळत होतं. पण सध्या मात्र बांधकामांवरच्या मुकादमांकडे त्यांच्यासाठी कसलंच काम नाही.
“माझ्या पोरांना पण कसलंच काम भेटत नाय. आम्हाला पोटाला काही तरी आणावं लागेल ना. पण कामच नाही तर पैसा कुठून येणार?” त्या विचारतात. “आमचं सगलं राशन संपलंय. आता काय पोरांना कोरडी चटणी खायला घालायची का? लवकर सुटका कर रे बाबा.”
वंदनांना तीन मुलं आणि ११ नातवंडं आहेत. त्यांची मुलं वाडा तालुक्यात वीटभट्ट्यांवर किंवा बांधकामांवर मजुरीला जातात. वाडा तालुक्यात १६८ गावं असून सगळी मिळून लोकसंख्या १,५४,४१६ आहे. वंदनांचे पती गावातल्या एका दुकानात काम करायचे. पंधरा वर्षांपूर्वी दारूच्या व्यसनामुळे तब्येतीच्या तक्रारी निर्माण झाल्या आणि त्यातच ते वारले.







