दक्षिण मुंबईच्या भुलेश्वरमधल्या चिंचोळ्या गल्ल्यांच्या चक्रव्यूहात एका कोपऱ्यात मन्झूर आलम शेख राहतात. पहाटे ५ वाजता उठून कामाला जायचं हा त्यांचा नेम. सडसडीत बांध्याचे, बहुतेक वेळा चौकडीची लुंगी नेसलेले शेख ५५० लिटरची पाण्याची लोखंडी टाकी ढकलत कावसजी पटेल टँकवर पाणी भरायला जातात. त्यांच्या घरापासून हा भाग एक किलोमीटरवर आहे. आणि त्यांचं घर - मिर्झा गालिब मार्केटजवळ, दूध बाजारमधल्या सार्वजनिक संडासच्या कोपऱ्यावर. उघड्यावर. ते आपली पाण्याची गाडी घेऊन दूध बाजारला येतात. गाडी लावायला जागा शोधतात आणि त्यानंतर जवळच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी पोचवायला सुरुवात करतात.

पन्नाशीचे मन्झूर आता अखेरच्या काही मोजक्या भिश्तींपैकी एक आहेत. पाणी पुरवणे हाच त्यांचा व्यवसाय. ते गेल्या तीस वर्षांपासून मुंबई महानगरातल्या या ऐतिहासिक अशा शहरात रहिवाशांना पिण्याचं आणि इतर वापरासाठीचं पाणी पुरवतायत. कोविड-१९ महासाथीने त्यांच्या व्यवसायावरच गदा आणली नाही तर तोपर्यंत भुलेश्वरमधे ते आणि त्यांच्यासारखे काही मोजके 'मशकवाले' म्हणजेच पाणके आपल्या 'मशक' किंवा 'मश्क' म्हणजेच पखालीतून पाणी वाटपाचं काम करत होते. अंदाजे ३० लिटर पाणी मावेल अशी चामड्याची खास पिशवी म्हणजे पखाल.

पखालीतून पाणी पुरवण्याची ही परंपरा “आता मेल्यात जमा आहे,” मन्झूर सांगतात. २०२१ साली त्यांनी पखालीऐवजी प्लास्टिकच्या बादल्या वापरायला सुरुवात केली. “जुन्या भिश्तींना आपापल्या गावचा रस्ता धरावा लागणार आणि तरुण मुलांना दुसरा काही तरी रोजगार शोधावा लागणार,” ते म्हणतात. उत्तर भारतातल्या भिश्ती या मुस्लिम समुदायाचं हे पारंपरिक काम. पर्शियन मूळ असलेल्या ‘भिश्ती’ या शब्दाचा अर्थ आहे, पाणी वाहणारा. या समुदायाला सक्का असंही म्हणतात. या अरबी शब्दाचा अर्थसुद्धा ‘पाणी वाहणारा’ किंवा ‘चषक वाहणारा’ असाच आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात (इथे यांना पखाली असं म्हणतात) या राज्यांमध्ये या समुदायाचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये होतो.

PHOTO • Aslam Saiyad

मन्झूर आलम शेख (गुलाबी सदऱ्यात) दक्षिण मुंबईच्या भुलेश्वर भागातल्या सीपी टँक परिसरात आपली पाण्याची लोखंडी गाडी ढकलत नेतायत. एकट्याने काही हे काम शक्य होत नाही. गाडीवरती त्यांची मशक किंवा पखाल दिसते आहे

“पाणी पुरवठ्यावर भिश्तींचंच राज्य होतं म्हणा ना. मुंबईत वेगवेगळ्या भागात त्यांच्या लोखंडी गाड्या होत्या,” मन्झूर सांगतात. “प्रत्येक गाडीमागे पाणी देण्याच्या कामावर ८-१० माणसं नेमलेली असायची.” कधी काळी तेजीत असलेल्या या धंद्याला दक्षिण मुंबईच्या परिसरात उतरती कळा लागली आणि आम्ही इतर कामधंदा शोधू लागलो, ते म्हणतात. भुलेश्वरमध्ये आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या स्थलांतरित कामगारांनी त्यांची जागा घेतली आहे.

मन्झूर १९८० च्या दशकात मुंबईत आले. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातलं गछ रसूलपूर हे त्यांचं गाव. हे काम सुरू करण्याआधी पहिले दोन महिने त्यांनी वडापाव विकायचं काम केलं. ते स्वतः जन्माने भिश्ती नाहीत पण त्यांनी भुलेश्वच्या डोंगरी आणि भेंडी बाझार भागात पाणी पुरवायचं काम सुरू केलं.

“मुमताझ म्हणून राजस्थानातला एक भिश्ती होता. त्याने मला कामावर ठेवलं आणि सगळं काही शिकवलं,” मन्झूर सांगतात. “त्यांच्याकडे एका वेळी चार पाणीगाड्या होत्या. वेगवेगळ्या मोहल्ल्यात एकेक गाडी ठेवलेली असायची. प्रत्येक गाडीवर सात आठ माणसं पखालीतून पाणी पुरवायचं काम करायची.”

PHOTO • Aslam Saiyad

कोविड-१९ च्या टाळेबंदीनंतर मन्झूर यांना पखालीऐवजी प्लास्टिकच्या बादल्यांचा वापर करावा लागला

मन्झूर यांनी मुमताझ यांच्याबरोबर सुमारे पाच वर्षं काम केलं आणि त्यानंतर स्वतः एक पाण्याची गाडी भाड्यावर घेतली आणि धंदा सुरू केला. “वीस वर्षांपूर्वी आम्हाला भरपूर काम असायचं. पण आता  फार तर चारातला एक या कामात राहिला असेल. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी विकायला सुरुवात झाली आणि आमच्या धंद्याला चांगलाच फटका बसला,” मन्झूर सांगतात. १९९१ नंतर भारताची अर्थव्यवस्था खुली करण्यात आली आणि बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय चांगलाच फोफावला. भुलेश्वरच्या भिश्तींच्या धंद्याला याचा मोठा फटका बसला. १९९९ ते २००४ या काळात भारतात बाटलीबंद पाण्याचा खप तिपटीने वाढला. २००२ साली या उद्योगाची उलाढाल अंदाजे एक हजार कोटींच्या आसपास होती.

खुल्या आर्थिक धोरणाने इतरीह अनेक बदल घडवून आणले – छोट्या दुकानांची जागा मॉल्सनी घेतली, चाळींच्या जागी गगनचुंबी इमारती आल्या आणि मोटर लावलेल्या पंपाद्वारे टँकर पाणी पुरवठा करायला लागले. निवासी इमारतींमध्ये पाण्याची मागणी कमी कमी होत गेली आणि फक्त छोटे उद्योग, दुकानं आणि कारखाने मशकवाल्यांकडून पाणी घेत राहिले. “इमारतीत राहणारे लोक पाण्यासाठी टँकर बोलवायला लागले. लोकांनी पाण्याच्या लाइन टाकल्या. आता जरी लग्नांमध्ये बाटलीबंद पाणी देण्याची पद्धत सुरू झाली असली तरी पूर्वी आम्हीच पाणी पुरवत असू,” मन्झूर सांगतात.

महासाथीच्या आधी एका पखालीसाठी (सुमारे ३० लिटर) मन्झूर यांना १५ रुपये मिळायचे. आता १५ लिटरची एक बादली दिली तर १० रुपये मिळतायत. पाण्याच्या गाडीचं भाडं सध्या महिन्याला १७० रुपये इतकं आहे आणि पाण्याच्या स्रोताप्रमाणे पाणी आणण्यासाठी दिवसाला ५० ते ८० रुपये खर्च येतो. या भागातल्या देवळांमध्ये आणि शाळांमध्ये विहिरी आहेत, तिथून भिश्ती पाणी विकत घेऊ शकतात. “पूर्वी आम्ही महिन्याला किमान १० ते १५ हजार रुपये मागे टाकायचो, पण आजकाल कसेबसे ४ ते ५ हजार रुपये बचत होते,” मन्झूर सांगतात. पूर्वी आणि आता धंदा कसा काय सुरू आहे तेच यातनं कळतं.

PHOTO • Aslam Saiyad

मन्झूर पाणी देऊन परत येता येता (डिसेंबर २०२०), फोन पाहत एखादी ऑर्डर नजरेतून सुटली नाही ना हे बघतायत. त्यांचं ठरलेलं गिऱ्हाईक आहे आणि दर दिवशी त्यांना १० ते ३० ऑर्डर येतात. काही जण स्वतः येऊन मागणी नोंदवतात तर काही जण फोनवर सांगतात

या धंद्यातले त्यांचे भागीदार, पन्नाशीचे आलमदेखील (आडनाव वापरत नाहीत) बिहारच्याच एका गावातले आहेत. आलम आणि मन्झूर आळीपाळीने ३ ते ६ महिने मुंबईत काम करतात आणि उरलेला काळ गावी आपल्या कुटुंबासमवेत घालवतात. घरची शेती असली तर ती पाहतात किंवा इतरांच्या शेतात मजुरीला जातात.

मार्च २०२० मध्ये देशभरात टाळेबंदी लागली आणि जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली. या काळात भुलेश्वरमध्ये पाण्याचं गिऱ्हाईक एकदमच कमी झालं. छोट्या उद्योगधंद्यांमध्ये काम करणारे आणि रात्री फूटपाथवर झोपणारे कामगार तेवढे उरले. अनेक दुकानं बंद झाली आणि तिथे काम करणारे लोक आपापल्या गावी परतले. मन्झूर या काळात घरी पुरेसा पैसा पाठवू शकले नाहीत. त्यांना पाच मुलं आहेत. म्हणून मग त्यांनी २०२१ साली हाजी अली परिसरात बांधकामावर गवंडीकाम करायला सुरुवात केली. दिवसाला ६०० रुपये मजुरी मिळायला लागली.

२०२१ साली मार्च महिन्यात मन्झूर आपल्या गावी गछ रसूलपूरला परत गेले. तिथे २०० रुपये मजुरीवर ते शेतात कामाला जायला लागले. जी काही कमाई झाली त्यातून त्यांनी घराची दुरुस्ती केली. चार महिन्यांनी ते मुंबईला परतले आणि मशकवाला म्हणून परत एकदा आपलं काम सुरू केलं. पण या वेळी नळ बाजार परिसरात. पण त्यांची पखाल दुरुस्त करावी लागणार होती. दर दोन महिन्यांनी पखालीची नीट डागडुजी करून घ्यावी लागते. त्यामुळे हे काम करून घेण्यासाठी मन्झूर युनुस शेख यांच्या शोधात निघाले.

PHOTO • Aslam Saiyad

२०२१ साली जानेवारी महिन्यात युनुस शेख भेंडी बझारमध्ये पखाल दुरुस्त करताना. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकला आणि बहराइच जिल्ह्यातल्या आपल्या गावी निघून गेले

साठीचे युनुस भेंडी बझारमध्ये मशक म्हणजेच पखाली बनवायचं आणि दुरुस्त करायचं काम करून त्यावर आपली गुजराण करत. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागल्यानंतर चार महिन्यांनी ते आपल्या गावी, उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्यात परतले. त्या वर्षी डिसेंबरमध्ये ते मुंबईला परत आले पण हाताला फार काही कामच राहिलं नव्हतं. त्यांच्या भागात फक्त १० पाणके काम करतात आणि कोविड-१९ च्या टाळेबंदीनंतर त्यांच्या कामाचे पैसे देखील कमी मिळायला लागले. फार काही आशा नसल्याने अखेर २०२१ च्या सुरुवातीलाच युनुस बहराइचला परत गेले. कायमचे. पखाली दुरुस्त करण्याइतकी शक्तीदेखील आता राहिली नसल्याचं ते सांगतात.

पस्तिशीच्या बाबू नय्यर याच्यासाठी युनुस यांचं जाणं म्हणजे पखाली वाहणं बंद झाल्यासारखं आहे. “ती अगदी दुरुस्त होण्यापलिकडे गेली होती म्हणून मी टाकून दिली,” ते सांगतात. भेंडी बझारच्या नवाब अयाझ मस्जिद परिसरातल्या दुकानांमध्ये आता ते प्लास्टिकच्या जारमधून पाणी पुरवतात. “अगदी सहा महिन्यांपूर्वीपर्यंत इथे पखालीतून पाणी पुरवणारे पाच-सहा लोक होते. आता सगळे बादल्या किंवा हंड्यांवर आले आहेत,” युनुस निघून गेल्यानंतरची स्थिती बाबू सांगतो.

आपली पखाल दुरुस्त करणारं कुणीच भेटत नाहीये म्हटल्यावर मन्झूर देखील नाइलाज म्हणून प्लास्टिकच्या बादल्या वापरू लागले आहेत. “युनुस नाहीत आणि त्यांच्यानंतर आता मशक दुरुस्त करणारं कुणीच नाहीये,” मन्झूर सांगतात. आजकाल बादल्या उचलून जिने चढणं त्यांना जड जायला लागलंय. पखाल वापरायला सोपी जायची कारण पाणीही जास्त मावायचं आणि खांद्यावरून पाठीवर टाकता यायची. “भिश्तींच्या कामाला आता घरघर लागली समजा,” बाबू म्हणतो. “आता पैसाही मिळत नाही. मोटरवाल्या पंपांनी आमचं काम हिसकावून घेतलंय.”

PHOTO • Aslam Saiyad

भुलेश्वरच्या सीपी टँक परिसरातल्या चंदारामजी हायस्कूलजवळ मन्झूर गाडीत पाणी भरतायत. मंदिरं आणि शाळा आपल्या विहिरीतलं पाणी भिश्तींना विकत देतात


PHOTO • Aslam Saiyad

दूध बाजारमध्ये मन्झूर गाडीतनं पाणी पखालीत भरून घेतायत. २०२० सालच्या डिसेंबरमध्ये मन्झूर मशक वापरत होते. गाडीच्या टायरवर पखालीचा खालचा भाग ठेवून आधार घ्यायचा आणि पखालीचं तोंड गाडीच्या नळापाशी धरून पूर्ण पाणी भरून घ्यायचं


PHOTO • Aslam Saiyad

पखाल एका खांद्यावरून पाठीवर अडकवतात आणि हाताने तिचं तोंड धरून तोल सांभाळला जातो

PHOTO • Aslam Saiyad

भुलेश्वर परिसरातली छोटी दुकानं मशकवाल्यांकडून पाणी मागवायचे. नळ बाझारमधल्या एका दुकानात मन्झूर पाणी पोचवतायत. इथल्या बांधकामावर सुद्धा ते ऑर्डरप्रमाणे पाणी पुरवतात

PHOTO • Aslam Saiyad

नळ बाझारमधल्या एका जुन्या, मोडकळीला आलेल्या तीन मजली इमारतीचे लाकडी जिने चढून जाणारे मन्झूर. दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एकाकडे ६० लिटर पाणी पुरवायचं असल्याने याच जिन्याने खाली वर अशा त्यांच्या २-३ खेपा होणार

PHOTO • Aslam Saiyad

पाण्याची गाडी ढकलायची आणि पाणी पुरवायचं या कामातून क्षणभर विश्रांती. मन्झूर आणि त्यांचे दोस्त रझ्झाक दूध बझारमध्ये


PHOTO • Aslam Saiyad

सकाळच्या कामाने थकून गेलेले मन्झूर दुपारी जरा डुलकी काढतात. २०२० साली मन्झूर यांचं ‘घर’ म्हणजे दूध बझारमधल्या सार्वजनिक संडासशेजारची मोकळी जागा. ते पहाटे ५ ते सकाळी ११ आणि दुपारी १ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काम करतात. दुपारी जेवण आणि थोडी वामकुक्षी


PHOTO • Aslam Saiyad

पाण्याच्या या धंद्यातले मन्झूर यांचे भागीदार आलम नळ बाझारच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांना पाणी पुरवतात. दर ३ ते ६ महिन्यांनी मन्झूर बिहारमधल्या आपल्या गावी जातात आणि त्यांचं काम आलम करतात


PHOTO • Aslam Saiyad

जानेवारी २०२१ मध्ये आलम नळ बाझारमधल्या एका कामगाराला आपल्या पखालीतून पाणी पुरवतायत


PHOTO • Aslam Saiyad

बाबू नय्यर भेंडी बझारमधल्या नवाब अयाझ मस्जिदजवळ एका दुकानासमोर पाणी ओततोय. तो या परिसरात भिश्ती म्हणून काम करतो. अनेक दुकानदार दुकानासमोर पाणी मारण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी भिश्तींनी बोलावतात. बाबू, आलम आणि मन्झूर तिघंही बिहारच्या कटिहार जिल्ह्यातल्या गछ रसूलपूर गावचे आहेत


PHOTO • Aslam Saiyad

जानेवारी २०२१ मध्ये बाबू आपली पखाल युनुस शेख (डावीकडे) यांना दाखवतोय. पखालीला तीन भोकं पडली असल्याने ती दुरुस्त करायची होती. युनुस यांनी दुरुस्तीसाठी १२० रुपये मागितले पण बाबू फक्त ५० देऊ शकला


PHOTO • Aslam Saiyad

भेंडी बझारच्या नवाब अयाझ मस्जिदजवळच्या एका इमारतीच्या दारात बसलेले युनुस बाबूची पखाल दुरुस्त करतायत


PHOTO • Aslam Saiyad

दुरुस्त झालेली पाच फुटी पखाल युनुस यांच्या हातात. हा फोटो घेतल्यानंतर एक दोन महिन्यात त्यांनी मुंबईला कायमचा रामराम ठोकला आणि ते बहराइचला घरी परतले. मुंबईत त्यांची कमाई फारच घटली आणि ते सांगतात की पखाल बनवायची किंवा दुरुस्त करायची शक्ती आता त्यांच्यात राहिली नाही


PHOTO • Aslam Saiyad

आजकाल बाबू प्लास्टिकच्या जारमधून पाणी पुरवतो


PHOTO • Aslam Saiyad

युनुस गावी निघून गेले आणि पखाली दुरुस्त करणारं दुसरं कुणीच नसल्यामुळे मन्झूर यांनी नाइलाज म्हणून प्लास्टिकच्या बादल्या वापरायला सुरुवात केली. २०२२ साली जानेवारी महिन्यात ते नळ बाझारमधल्या छोट्या दुकानांत काम करणाऱ्या कामगारांसाठी पाणी घेऊन चाललेत. हे कामगार दिवसभर काम करतात आणि रात्री फूटपाथवर झोपतात


PHOTO • Aslam Saiyad

पाणी देऊन झाल्यावर मन्झूर बादल्या भरून घेण्यासाठी परत गाडीपाशी येतायत


PHOTO • Aslam Saiyad

भिश्तींचं काम आता टँकर करू लागलेत. विजेवर चालणाऱ्या मोटरचा वापर करून ते इमारतींना थेट पाणी पुरवू शकतात


PHOTO • Aslam Saiyad

नळ बाझारच्या दुकानात विक्रीला ठेवलेले प्लास्टिकचे ड्रम. भाड्यावर घ्यायच्या लोखंडी पाणी गाड्यांऐवजी आता हे ड्रम भिश्तींच्या पसंतीला उतरले आहेत


PHOTO • Aslam Saiyad

नळ बाझारमध्ये पाणी देऊन आलेल्या मनझूर आलम शेख यांचा आपली पखाल घेऊन काढलेला एक जुना फोटो. ‘पाणी वाहून नेण्याची परंपरा आता मेल्यात जमा आहे’


Photos and Text : Aslam Saiyad

ଅସଲମ ସୟଦ ମୁମ୍ବାଇରେ ଫଟୋଗ୍ରାଫୀ ଏବଂ ଫଟୋ ସାମ୍ବାଦିକତା ପଢ଼ାଇଥାନ୍ତି ଏବଂ ସେ ’ହାଲୁ ହାଲୁ’ ଐତିହ୍ୟ ଯାତ୍ରାର ସହ ପ୍ରତିଷ୍ଠାତା । ମାର୍ଚ୍ଚ ୨୦୨୧ରେ ଲିଭିଂ ୱାଟର୍ସ ମ୍ୟୁଜିୟମ ସହାୟତାରେ, ମୁମ୍ବାଇର ଜଳ କାହାଣୀ ଉପରେ ଆୟୋଜିତ ଏକ ଭର୍ଚୁଆଲ ପ୍ରଦର୍ଶନୀ- କନଫ୍ଲୁଏନ୍ସରେ ପ୍ରଥମେ ତାଙ୍କର ଫଟୋଗ୍ରାଫୀ ସିରିଜ୍‌ ‘ଦ ଲାଷ୍ଟ ଭିସ୍ତିଜ୍‌’ ପ୍ରଦର୍ଶିତ ହୋଇଥିଲା । ବର୍ତ୍ତମାନ ମୁମ୍ବାଇର ଏକ ବାଇସ୍କୋପ୍‌ ପ୍ରଦର୍ଶନୀ ମାଧ୍ୟମରେ ସେ ତାଙ୍କର ଫଟୋଗୁଡ଼ିକୁ ପ୍ରଦର୍ଶନ କରୁଛନ୍ତି ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ Aslam Saiyad