गणेश वडंद्रेंच्या रानातल्या कपाशीच्या बोंडांवरचे काळे डाग सगळ्या शास्त्रज्ञांना एकच ओरडून सांगतायत – जा, यावर काही उतारा शोधा.
“अळी आत गेल्याची बिळं आहेत ही,” वडंद्रे सांगतात. वर्ध्याच्या आमगाव (खुर्द)चे पाच एकर रान असणारे आणि गावात मान असणारे वडंद्रे सांगतात. इथनंच बोंडअळी आत शिरली असणार, वडंद्रे म्हणतात.
“जर हे बोंड आपण फोडून पाहिलं, तर आतमध्ये गुलाबी अळी बोंड फस्त करताना सापडेल,” ते सांगतात. त्यांच्या आवाजातला राग आणि चिंता लपत नाही. त्यांनी बोंड फोडताच आतमधली अगदी नखाएवढी गुलाबी अळी दचकून हलली, जणू काही ती आम्हाला रामराम करत असावी. कापूस तयार होण्याआधीच तिने बोंड आतून पोखरलं होतं, त्यामुळे आता त्याचा उपयोग शून्य.
२०१७ च्या नोव्हेंबरमध्ये मी वडंद्रेना भेटलो होतो. तेव्हा या ४२ वर्षीय शेतकऱ्याने मला सांगितलं की “एक अळी हजारो अंडी घालते आणि काही दिवसांतच त्यापासून लाखो अळ्या तयार होतात.”
ही अळी बोंडांमध्ये आत जाऊन बसते त्यामुळे बोंडं उलेपर्यंत शेतकऱ्यांना कसलाच पत्ता लागत नाही. कापूस काढणीच्या वेळी किंवा बाजारात कापूस विकायला नेला की अचानक शेतकऱ्यांना धक्का बसतो कारण अळी असलेल्या कापसाला खूपच कमी भाव मिळतो.
वडंद्रेंची कहाणी महाराष्ट्रातल्या सगळ्यात कापूस शेतकऱ्यांची कहाणी आहे. खासकरून विदर्भाच्या कापूस पट्ट्यात २०१७-१८ च्या हिवाळ्यात कापसाच्या वेचणीच्या वेळी तर हेच चित्र सगळीकडे पहायला मिळत होतं. या प्रदेशात शक्यतो जुलै-ऑगस्ट दरम्यान कापूस लावला जातो आणि ऑक्टोबर ते मार्च दरम्यान वेचणी होते.
बोंडअळीच्या हल्ल्यात शेकडो हेक्टर रानातला कापूस वाया गेला. गेल्या ३० वर्षात झालं नाही असं नुकसान या अळीने केलं. वडंद्रेंच्या रानाला लागून असलेल्या शेतांमध्ये बोंडअळीच्या हल्ल्याच्या सगळ्या खुणा स्पष्ट दिसत होत्याः काळी पडलेली, सुकून गेलेली आणि डागाळलेली बोंडं, उलल्यावर दिसणारा काळपट रंगाचा, कमी प्रतीचा आणि कमी भाव येणारा कापूस.
याच अळीच्या धास्तीने जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात काहीही करून आपला कापूस वाचवण्याची धडपड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विषारी कीटकनाशकांचा बेसुमार वापर केला, पण त्यांना काय कल्पना होती की कशानेच ही बोंडअळी मरणार नाही म्हणून. (पहा रसशोषक अळ्या, जीवघेणे फवारे)
“ही अळी कोणत्याच कीटकनाशकाला दाद देत नाही,” वडंद्रे सांगतात. “ती तितकी भयानक आहे. आता या बीटी कपाशीचा काय उपयोग, सांगा.”










