“या आधी कोणीच माझी मुलाखत घेतली नाही. मी सारं काही सांगते...” या ‘सारं काही’ मध्ये७० वर्षं मुंबईच्या खार (पश्चिम) या उपनगरातील घरांत शौचालय साफ करणं, पोछा मारणं, धुणी भांडी करणं आणि त्याच्या मोबदल्यात कवडी मोल मिळवणं हे सगळं आलं. १९८० ते १९९० च्या सुरुवातीला एका इमारतीतील १५-१६ घरं साफ करण्याचे भटेरी सरबजीत लोहट यांना महिन्याला ५० रुपये मिळत असत. आणि सोबत त्यांच्या स्वयंपाकघरातील शिळंपाकं.
“मी भटेरी देवी. मी मूळची हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील संघी गावची. मुंबईत कधी राहायला आले मला ठाऊक नाही, पण तेंव्हा माझं नुकतंच लग्न झालेलं. सासूने माझ्याकरिता एक काम शोधून काढलं होतं, आमच्याच एका नातेवाईकाच्या बदली. माझा नवरा (तोसुद्धा सफाई कर्मचारी) काही वर्षांनी मरण पावला. माझा मुलगा तेंव्हा दोन-तीन वर्षांचा असेल. तो दादरमध्ये काम करत असे. एकदा लोकलने घरी परतत असताना तो दरवाजात उभा होता अन् विजेच्या खांबावर आदळला. तो जागच्या जागीच मरण पावला.”
वर्षं उलटली तरीही हे सांगत असताना त्यातली वेदना आजही ताजी आहे. भटेरी देवींचा ऊर भरून आलाय. त्या पूर्व वांद्र्यातील वाल्मिकीनगर येथे राहतात. त्यांच्या आधारकार्डावर त्यांचा जन्म १९३२ सालचा असल्याचं लिहिलं आहे, म्हणजे त्या आता ८६ वर्षांच्या असायला हव्यात. पण त्यांचा सुरकुतलेला चेहरा पाहून वाटतं त्यांनी नव्वदी पार केली असेल – त्या सुद्धा हे मान्य करतात. त्यांचा मुलगा हरीश या वर्षी ३० जूनला मरण पावला, तो वयाच्या सत्तरीत होता. भटेरी १२-१३ वर्षांच्या असतानाच त्यांचं लग्न झालं, ज्यानंतर त्या आपले पती सरबजीत लोहट यांच्यासोबत मुंबईत राहायला आल्या.
त्यांचं अख्खं कुटुंब (आणि सासरची बरीचशी मंडळी) हरयाणातून स्थलांतरित होऊन मुंबईतच राहत होतं. जवळपास सगळेच खासगी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. या वस्तीत राहणारे बहुतांश लोक, भटेरीप्रमाणेच, वाल्मिकी समुदायाचे दलित असून कालांतराने कामाच्या शोधात हरयाणातून मुंबईला स्थलांतरित झालेत. भटेरीप्रमाणेच ते घरी हरियाणवी बोलतात. मुंबईत हरयाणातून आलेल्या लोकांच्या अशा बऱ्याच वाल्मिकी वस्त्या आहेत. विशेष करून भांडुप टँक रोड, डोंबिवली, माटुंगा मजदूर कँप, विक्रोळी आणि चेंबूर येथे.





