बसंत बिंद थोड्या दिवसांसाठीच घरी आला होता. रोजंदारीवर शेतात मजुरी करणारा बसंत गेले काही महिने जेहानाबाद जिल्ह्यातल्या सलेमानपूर या आपल्या गावापासून काही तासांच्या अंतरावर पटण्याजवळच्या शेतांमध्ये काम करत होता.
१५ जानेवारी २०२३ रोजी गावी संक्रांत साजरी करून तो परत मजुरीसाठी जायची तयारी करत होता. पटण्याला जाण्यापूर्वी तो शेजारच्याच चंदरिया गावी गेला होता. तिथल्या कामगारांना सोबत घेऊन पटण्याला जाण्याचा त्याचा बेत होता. गटाने गेलं तर काम मिळण्याची शक्यता जास्त असते.
बसंत तिथल्या काही जणांशी बोलत होता तितक्यात पोलिस आणि एक्साइज विभागाचे काही अधिकारी तिथे अवतरले. बिहार दारूबंदी व उत्पादन (सुधारणा) कायदा, २०१६ या कायद्याअंतर्गत नेमण्यात आलेल्या दारुबंदी पथकाचे ते सदस्य होते. आणि त्यांचं काम म्हणजे, “बिहार राज्याच्या क्षेत्रात दारू आणि मादक पदार्थांवर संपूर्ण बंदीची अंमलबजावणी आणि प्रसार...”
पोलिसांना पाहून लोक पळू लागले. बसंतसुद्धा पळायला लागला, मात्र “माझ्या पायात स्टीलचा रॉड असल्याने मला वेगात पळता येत नाही,” २७ वर्षांचा बसंत सांगतो. एक मिनिटभर पळाला असेल, तेवढ्यात “कुणी तरी मागून माझी शर्टाची कॉलर पकडली आणि मला गाडीत टाकलं.”
त्याने पथकातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्याची किंवा घराची झडती घ्या. पण तसं काहीही त्यांनी केलं नाही. “एक्साइज खात्यात गेल्यावर तुला सोडू असं पोलिसांनी सांगितलं,” तेव्हा बसंत जरा शांत झाला.
पण जेव्हा ते पथक आणि बसंत पोलिस स्टेशनला पोचले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे ५०० मिली दारू सापडली अशी नोंद आधीच करून ठेवली होती. त्याच्यावर दारूबंदी कायद्याखाली दारू जवळ बाळगल्याच्या आरोप लावण्यात आला. त्यासाठी पाच वर्षांपर्यंत कैद आणि किमान एक लाख दंड अशी शिक्षा आहे, तेही पहिल्या गुन्ह्यासाठी.










