"आमचं जीवन आणि आधार, आमची जमीन, घरदार सारं म्हणजे ही पेटी."
२४ वर्षांचा आकाश यादव सांगतो. कुठून हवा सुटतीये का ते तपासण्यासाठी तो पेटीचा भाता दाबतोय. पट्ट्या सैल करून स्वच्छ करण्यासाठी उलटवून त्या पुसत पुसत तो म्हणतो, "एक वेळेचं जेवण मिळणं मुश्किल झालंय. उपाशी झोपी जाणाऱ्या मुलांकडे लाचारपणे बघतो, ते साधी तक्रारही करत नाहीत. आमच्या आयुष्यातला सगळ्यात क्रूर आणि दुःखाचा काळ आहे हा लॉकडाऊन."
आकाश आणि त्यांचा १७ कारागिरांचा हा समूह तसा दुर्मिळच. दर वर्षी ऑक्टोबर ते जून दरम्यान मध्य प्रदेशातून महाराष्ट्रभर जवळपास २० शहरांमध्ये ते संवादिनी दुरूस्त करत फिरत असतात. या कामात प्रचंड कौशल्य लागतं, शिवाय शास्त्रीय संगीताची चांगली जाण आणि विलक्षण श्रवण क्षमता असावी लागते.
ते सोबत संवादिनी आणि अवजारांची पेटी घेऊन फिरत असल्याने बहुतेक ठिकाणी त्यांची ओळख पेटीवाले अशीच आहे. हे सगळे मध्य प्रदेशातील यादव जातीतील अहीर किंवा गवळी जमातींच्या काराहीर या पोटजमातीचे आहेत.
रेणापूर या महाराष्ट्रातील लातूर शहराहून १८ किमी दूर असलेल्या गावी आकाश माझ्याशी बोलत होता. १८ पेटीवाले आणि त्यांचे कुटुंबीय असे मिळून एकूण ८१ जण आहेत. टाळेबंदी झाल्यापासून ते एका मोकळ्या मैदानात उभारलेल्या तंबूंमध्ये अडकून पडलेत. रेणापूर नगर पालिकेने त्यांना तिथे राहण्याची परवानगी दिली होती.
मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्याच्या सिहोरा तहसीलातील ९४० लोकवस्ती (२०११ मधील जनगणना) असलेलं गांधीग्राम हे त्यांचं गाव. "जर या आजारामुळं [कोविड-१९] प्रवासबंदी राहिली, तर आम्ही मरून जाऊ. आमच्याकडं अजिबात पैसे नाहीत. प्रवास सुरू करण्याआधी दरवर्षी आम्ही महत्त्वाची कागदपत्रं आमच्या गावातील शेजाऱ्यांकडे सोपवतो, कारण तिथं आमची घरं धड नाहीत. त्यामुळं आमच्याजवळ 'पिवळी' राशन कार्डं नाहीत. तुम्ही मेहेरबानी करून साहेबांना आम्हाला परत जायची परवानगी द्यायला सांगाल का?" आकाश विचारतो.






