गणेश सोरेन यांची गबगुबी बंगाली लोकसंगीतातल्या प्रसिद्ध खोमोकचा पूर्वीचा अवतार आणि त्याचं आदिवासी रुप म्हणायला पाहिजे. त्यांनी त्यामध्ये ढोल आणि गंमतीचा भाग म्हणजे त्यांच्या मुलाच्या खेळण्यांचा वापर केलाय. त्याची धून ऐकली की त्यांना त्यांच्या मुलाचं निरागस, आनंदी असं खुदूखुदू हसणं आठवतं आणि त्याचा ठेका जंगलाची आठवण करून देतो. “मी गेली १५ वर्षं ही दोन्ही वाद्यं वाजवतोय, का तर माझं मन ताजंतवानं रहावं म्हणून,” ते म्हणतात. “एक काळ तर असा होता जेव्हा मी दिवसभराच्या पिळवटून टाकणाऱ्या कामानंतर पूर्ण संध्याकाळ ही वाद्यं वाजवायचो आणि ते संगीत ऐकायला लोक गोळा व्हायचे. पण आज काल त्यांच्याकडे किती तरी दुसऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे या म्हाताऱ्याचं गाणं ऐकायला कुणी येत नाही.”
त्यांच्या गावातले बरेच लोक गवंडीकाम करतात. किंवा काही जण वेगवेगळ्या शहरात रोजंदारीवर कामं करतात. आणि अजूनही त्यातले काही जण त्यांच्यासोबत बनाम घेऊन जातात. पण या वाद्याची संगीताची परंपरा मात्र आता कुणालाच शिकून घ्यावीशी वाटत नाही असं गणेश आणि होपोन सांगतात. “आता हा अनोखा नाद निर्माण करण्याचं ज्ञान आणि कला माहित असणारे आमच्या गावात आणि आमच्या समुदायात मोजकेच लोक आहेत,” होपोन म्हणतात.
“आता आमच्या गावातल्या शाळेत जाऊन आम्ही शिकवू पण तिथे थोड्या तरी मुलांना यात रस वाटला पाहिजे ना,” गणेश म्हणतात. पण आताच्या मुलांना मोबाइलवर एका क्लिकमध्ये गाणी उपलब्ध आहेत. त्यांना बनाममध्ये का रस वाटेल?
गणेश किंवा होपोन, दोघांकडेही मोबाइल फोन नाही, ना तो घेण्याची त्यांची ऐपत आहे.
या दोघांनाही असं वाटतं की त्यांच्या लाडक्या बनामला अशी अवकळा आलीये त्याचा संबंध त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीशी देखील आहे. कमी मजुरीत जादा तास काम करणारे ते गरीब शेतमजूर आहेत. “मी बनाम वाजवत बसलो तर माझं अख्खं कुटुंब कित्येक दिवस उपाशी राहील,” गणेश म्हणतात.
“नुसत्या नादावर आमची भूक थोडी भागणारे,” इति होपोन.
अनुवादः मेधा काळे