कोविड-१९ वरच्या लशीचा पहिला डोस घेण्यासाठी म्हणून महेंद्र फुटाणे ५ मे रोजी सकाळी बाहेर पडले. आणि परतले ते थेट १२ दिवसांनी. “फार चांगला दिवस असणार होता तो,” ते सांगतात. “पण प्रत्यक्षात मात्र काळरात्र ठरला.”
महेंद्र यांना लस मिळण्याआधीच पोलिसांनी त्यांना कोठडीत टाकलं होतं.
बीडच्या नेकनूर गावचे रहिवासी असणाऱ्या ४३ वर्षीय महेंद्र यांना अखेर, सततच्या प्रयत्नानंतर कोविन पोर्टलवर लसीकरणाची वेळ मिळवता आली. “मला [५ मे रोजी] सकाळी ९-११ ही वेळ मिळाल्याचा एसएमएस आला,” ते सांगतात. त्यांना स्वतःसाठी आणि त्यांच्या घरच्या इतर काही जणांसाठी वेळ मिळाली. सगळे ४५ वर्षांखालचे होते. “लसीचा पहिला डोस मिळणार त्यामुळे आम्ही खुशीत होतो. कोविडची दुसरी लाट फार भयंकर होती,” महेंद्र म्हणतात.
नेकनूरपासून २५ किलोमीटरवर बीड शहरात हे कुटुंब लस घेण्यासाठी पोचलं पण तिथे सगळाच विचका झाला. लशींच्या तुटवड्यामुळे १८-४४ वयोगटातल्या लोकांचं लसीकरण थांबवण्यात आलं होतं. “तिथे पोलिसांचा पहारा होता,” महेंद्र सांगतात. “आम्हाला वेळ दिल्याचा एसएमएस आम्ही त्यांना दाखवला. पण ते उर्मटासारखे बोलायला लागले.”
पोलिस आणि रांगेत थांबलेल्या लोकांमध्ये वाद सुरू झाला. आणि त्याची अखेर झाली ते लाठीमार करण्यात. सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. महेंद्र, त्यांचा मुलगा पार्थ, भाऊ नीतीन आणि चुलत भाऊ विवेक.
या घटनेचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) लसीकरण केंद्रावरच्या हवालदार अनुराधा गव्हाणे यांनी दाखल केला. त्यामध्ये या सहा जणांवर रांग मोडल्याचा आणि पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यात म्हटलंय की या लोकांनी हवालदारांना शिव्या दिल्या आणि त्यांच्यावर हल्ला केला. एकूण ११ प्रकारचे आरोप ठेवण्यात आले आहेत – अवैधरित्या जमाव करणे, दंगल, शासकीय कर्मचाऱ्यास इजा पोचवणे आणि शांतताभंगाची कलमं लावण्यात आली आहेत.






