“तिचा अंत कशाने झाला कोण जाणे, पण तिच्याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते काही दिलं गेलं नाही. एवढं मला माहितीये,” आपल्या बहिणीच्या मृत्यूबद्दल सुभाष कबाडे सांगतो.
त्याची बहीण लता सुरवसे बीडच्या सिविल हॉस्पिटलमध्ये मरण पावली. त्याच्या आदल्याच रात्री तिथल्या एका डॉक्टरांनी दोन इंजेक्शन ताबडतोब आणून द्यायला लावली होती. सुभाष बाहेरच्याच औषधाच्या दुकानात धावत गेला आणि क्षणात परत आला. पण तो येईपर्यंत डॉक्टर निघून गेले होते.
“किती तरी पेशंटवर ते एकाच वेळी उपचार करत होते. ते दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले,” २५ वर्षीय सुभाष सांगतो. “मी नर्सला इंजेक्शनबद्दल सांगितल्यावर तिने लताची फाइल पाहिली. त्यात काहीच लिहिलं नव्हतं. काही मिनिटांपूर्वीच त्यांनी इंजेक्शन आणायला सांगितलीयेत, फाइलीत नसेल लिहिलेलं असं मी सांगून पाहिलं.”
पण नर्सने काहीच ऐकलं नाही. 'ही इंजेक्शनं द्या' म्हणून तो हातापाया पडायला लागला तेव्हा “त्या वॉर्डचा प्रमुख सिक्युरिटीला बोलवायची धमकी द्यायला लागला,” सुभाष सांगतो. सगळ्या गोष्टींची चौकशी करून, माहिती घेऊन पेशंटला अखेर इंजेक्शन मिळाली पण त्यात एक तासाचा वेळ गेला.
दुसऱ्या दिवशी, १४ मे रोजी सकाळी लताचा मृत्यू झाला. २३ एप्रिलला तिला कोविड-१९ झाल्याचं निदान झालं तेव्हापासून ती हॉस्पिटलमध्ये होती. “अधून मधून तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्यासारखं वाटायचं,” बीडमध्ये वकिली करणारा सुभाष सांगतो. ती इंजेक्शनं वेळेत दिली असती तर ती वाचली असती का ते त्यालाही ठामपणे सांगता येणार नाही. पण एक गोष्ट त्याला नक्की माहितीये ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. “त्याचा परिणाम पेशंटवर व्हायलाय,” तो म्हणतो.
या वर्षी मार्च महिन्यापासून कोविड-१९ ची दुसरी लाट झपाट्याने पसरायला लागली आणि भारताच्या ग्रामीण भागातल्या खिळखिळ्या सार्वजनिक आरोग्यसेवेची लक्तरं वेशीवर टांगली गेली. हॉस्पिटलमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत, आरोग्य कर्मचारी दमून गेलेले आहेत आणि रुग्णांना चांगले उपचार मिळत नाहीयेत. गावपाड्यावरच्या लाखो नागरिकांसाठी आरोग्यसेवेचं हेच चित्र दिसून येतंय.








