सगळं ठरून दहाच दिवस झाले होते. रेखाला पुरतं कळून चुकलं होतं की आता लग्न करण्याशिवाय पर्याय नाही. एखादी १५ वर्षांची मुलगी जितका म्हणून विरोध करू शकते तो तिने करून पाहिला होता. पण तिच्या आई-वडलांनी तिचं म्हणणं मनावर घेतलं नाही. “ती रडली, मला शिकायचंय म्हणाली,” तिची आई भाग्यश्री सांगते.
बीड जिल्ह्यातल्या एका गरीब खेड्यात भाग्यश्री, तिचा नवरा अमर आणि त्यांची मुलं राहतात. दोघंही तिशीत आहेत. दर वर्षी नोव्हेंबरच्या सुमारास ते पश्चिम महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात ऊसतोडीसाठी जातात. सहा महिने प्रचंड कष्ट केल्यानंतर दोघांना मिळून ८०,००० रुपये हातात येतात. मातंग या दलित समाजाच्या या कुटुंबाकडे स्वतःची जमीन नाही. ऊसतोड हाच उत्पन्नाचा एकमेव स्रोत आहे.
दर वेळी ऊसतोडीला जाताना भाग्यश्री आणि अमर रेखा आणि तिच्या धाकट्या भावंडांना (वय १२ आणि ८) त्यांच्या आजीपाशी ठेवून जायचे (आजी गेल्या मे महिन्यात वारली). गावाला लागूनच असलेल्या सरकारी शाळेत तिघं शिकत होती. पण मार्च २०२० मध्ये महासाथीमुळे शाळा बंद झाल्या आणि नववीत शिकत असलेल्या रेखाला घरी बसावं लागलं. ५०० दिवस उलटले तरी बीड जिल्ह्यातल्या शाळा आजही बंद आहेत.
“आमच्या ध्यानात आलं की शाळा काही इतक्यात सुरू व्हायच्या नाहीत,” भाग्यश्री सांगते. “शाळा सुरू होती तर शिक्षक असायचे, आजूबाजूला बाकी लेकरं असायची. गावात लगबग होती. शाळाच बंद म्हटल्यावर तिला माघारी कसं सोडून जावं. दिवस चांगले नाहीत.”
म्हणून गेल्या वर्षी जून महिन्यात भाग्यश्री आणि अमरने रेखाचं लग्न २२ वर्षीय आदित्यशी लावून दिलं. त्यांच्या गावाहून ३० किलोमीटरवर राहणारं आदित्यचं कुटुंब देखील हंगामी स्थलांतर करणारं होतं. नोव्हेंबर २०२० मध्ये ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला तेव्हा रेखा आणि आदित्य देखील पश्चिम महाराष्ट्रात तोडीला गेले – मागे राहिलं ते केवळ शाळेच्या रजिस्टरवरचं रेखाचं नाव.
महासाथीमुळे रेखासारख्या किशोरवयीन मुली आणि तिच्याहून लहान असणाऱ्या कित्येक मुलींना बळजबरी लग्न करावं लागलं आहे. युनिसेफने मार्च २०२१ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला – COVID-19: A threat to progress against child marriage (कोविड-१९: बालविवाहांविरोधातील प्रयत्नांना खीळ). या दशकाच्या अखेरपर्यंत जगभरात आणखी १ कोटी मुलींना बालविवाह करावा लागण्याचा धोका असल्याचं हा अहवाल सांगतो. शाळा बंद, वाढती गरिबी, आई-वडलांचं निधन आणि कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या इतर काही परिस्थितीचा परिणाम म्हणून “लाखो मुलींची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे,” हा अहवाल नोंदवतो.
गेल्या १० वर्षांत बालविवाह झालेल्या तरुणींचं प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झालं होतं आणि जगभरात अडीच कोटी बालविवाह रोखले गेल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांतल्या या प्रगतीला महासाथीने खीळ बसल्याचंच यातून दिसून येतं. महाराष्ट्रातही हेच चित्र आहे.








