आम्ही पाहत होतो, पण आम्हाला खरंच वाटत नव्हतं. आम्ही गाडी त्यांच्याजवळ वळवली,
आणि खाली उतरून त्याच्याकडे पाहतच राहिलो. तरी आमचा विश्वास बसेना. रतन बिस्वासकडे पाच बांबू होते, एक-एक बांबू
४०-४५ फूट लांबीचा, आणि ते एकत्र बांधून सायकलीचा तोल सांभाळत ते चालले होते. ही
कसरत करत, त्यांच्या घरापासून १७ किलोमीटर दूर असलेल्या त्रिपुराच्या राजधानीत,
अगरतलाच्या बाजारात, ते निघाले होते. बांबूची टोकं चुकून जरी रस्त्यावरच्या
एखाद्या दगडाला, उंचवट्याला किंवा खड्ड्यात अडकली तर सायकल, सगळे बांबू आणि रतन असे
एकत्र खाली कोसळले असते. आणि जबर लागलं असतं. बांबूचं वैशिष्ठ्य असं की ते जितके वजनदार असतात त्यापेक्षा दिसायला बरेच हलके
वाटतात. निरखून बघण्याआधी घट्ट बांधलेले पाच बांबू चारच असल्यासारखे वाटत होते.
त्यांचं एकत्रित वजन साधारण २०० किलो तरी असावं. बिस्वास यांना अर्थात हे माहित
होतं. आमच्याशी ते आनंदाने बोलले. इतकंच नाही त्यांनी स्वतःच्या या पराक्रमाचा
फोटोसुद्धा काढू दिला. पण आम्हाला त्यांनी त्यांची सायकल मात्र ढकलू दिली नाही. त्यांना
त्यातले कष्टे चांगलेच माहित होते.
आम्ही त्यांना विचारलं, “केवळ पाच फुट लांबीच्या सायकलीवर तुम्ही बांबूचं हे एवढं वजन तोलता तरी कसं?” त्यावर ते हसले आणि त्यांनी आम्हाला सायकलला लावलेल्या काही बांबूच्या फळ्या दाखवल्या. समोरच्या बाजूला दोन उभ्या फळ्या होत्या ज्या सायकलच्या तिरक्या बारला बांधल्या होत्या, आणि त्या सायकलच्या आडव्या बारच्या दोन्ही बाजूने आणून एकत्र बांधल्या होत्या. तसंच दोन फळ्या आडव्या ठेऊन कॅरियरला बांधल्या होत्या.
थोडक्यात काय तर, समोरच्या फळ्यांवर दोन बाजूने दोन-दोन बांबूंची समोरची टोकं बांधली होती आणि मागच्या फळ्यांवर सगळे बांबू बांधून ठेवले होते. तीन बांबूंची समोरची बाजू हँन्डल आणि सीटला बांधली होती. बांबू तर अगदी घट्ट बसले होते, पण यामुळे सायकल वळवणं मात्र अगदीच अवघड झालं होतं. हे सगळं अगदी कंबरेचा काटा मोडणारं काम होतं. बिस्वास यांच्याकडे मात्र पर्याय नव्हता. आपल्या संसारासाठी अशी अनेक मेहनतीची कामं करावी लागत होती. “माझं कुटुंब म्हणजे माझी दोन मुलं, माझी पत्नी आणि मी,” ते सांगतात. “आमचं गाव जीरीनिया तालुक्यात आहे (पश्चिम त्रिपुरा जिल्हा). काम असेल तेव्हा मी रोजंदारीवर बांधकामावर कामाला जातो. नाहीतर, हंगामाप्रमाणे शेत मजुरी किंवा हमाली करतो.”
“नाही, मी स्वतः बांबू तोडत नाही. ते खूपच अवघड असतं. आमच्या गावात जे बांबू विकायला आणतात त्यांच्याकडून मी विकत घेतो,” ते सांगतात. सर्व बांबू अगरतला बाजारात विकले गेले तर त्यांना यातून एकूण २०० रु. इतका फायदा होऊ शकतो. माझ्यासोबत त्रिपुरा सेन्ट्रल युनिव्हर्सिटीत पत्रकारिता आणि जनसंवाद विभागात प्राध्यापक असलेले सुनील कलाई होते. ते सांगतात की बिस्वास काही छोट्या रस्त्यांचा वापर करू शकतात. पण कदाचित अशा बारीक रस्त्यांवर बिस्वास यांच्या सायकलीला पुरेशी जागाच मिळत नसावी. आम्ही आमच्या गाडीत बसलो आणि पुढच्या जिल्ह्यातल्या अंबासाकडे निघालो. बिस्वास विरुद्ध दिशेने आपली ४० फुटी शेपूट घेऊन चालू लागले.
अनुवाद: अनुजा दाते