बाउल हा शब्द संस्कृतातल्या वातुल या शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ वेडा, असंतुलित किंवा भान हरपलेला असा होतो. बाउल म्हणजेच, बंगालच्या मातीत तयार झालेलं संगीत.
बाउल समुदाय हा बहुतकरून भटका समाज आहे. बाउल लोकांची शिकवण इस्लाम, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या समन्वयावर आधारित आहे, हे लोक वेगवेगळ्या समुदायांबरोबर मिळून राहत आले आहेत. समाजाचे पारंपरिक नियम नाकारत सगळ्यांना एकत्र आणणारं तत्त्व म्हणून ते संगीताचा विचार करतात. त्यांच्या गाण्यांमध्ये जीवनाचं स्पष्ट तत्त्वज्ञान सापडतं. बाउल या समाजात जन्माला येत नाहीत, तर ते जगण्याचा हा मार्ग निवडतात आणि या समाजामध्ये एक गुरू त्यांना दीक्षा देतो.
बाउल – स्त्रिया आणि पुरुष – लगेच ओळखू येतात. न कापलेले कुरळे केस, भगवी वस्त्रं, रुद्राक्षांच्या माळा आणि हातात एकतारा. पिढ्या न् पिढ्या केवळ ऐकून शिकलेली गाणी आणि त्यासाठी लोकांनी दिलेलं दान हेच त्यांचं जगण्याचं साधन. त्यांच्या लोकप्रियतेप्रमाणे त्यांच्या कमाईत फरक पडतो, साधारणपणे ते एका कलाविष्कारासाठी २०० ते १००० रु. कमाई करतात.




