“जेव्हा आंदोलक रस्ता अडवतात, किंवा काही नुकसान करतात तेव्हा त्यांच्यावर गुन्हेगार असल्याचा ठपका ठेवला जातो. पण सरकारने हेच केलं तर? आम्हा जे बिरूद लावलं जातं तेच त्यांनाही लावायला नको?” पंजाबच्या मोगा जिल्ह्यातल्या मेहना गावातले शेतकरी असलेले ७० वर्षीय हरिंदर सिंग लाखा विचारतात.
पंजाबच्या आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीत पोचता येऊ नये यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यात १० फूट खोल खड्डे खणले त्याच्या संदर्भात ते विचारतात. कित्येक दिवसांपासून या राज्यातल्या आणि उत्तर प्रदेश आणि हरयाणाच्या असंख्य शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या देशाच्या राजधानीत प्रवेश करण्यासाठी पोलिस आणि इतर बळाशी संघर्ष करावा लागतो आहे.
तीन दिवसांच्या संघर्षानंतर दिल्ली पोलिसांनी नमतं घेतलं असलं तरी हरयाणा सरकार मात्र अजूनही शेतकऱ्यांना त्या राज्याच्या सीमा पार करू देत नाहीये. आणि जरी त्यांना राजधानीत प्रवेश करण्याची परवानगी असल्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारने हे फार सोपं केलेलं नाही. ‘परवानगी’ असतानाही खंदक, काटेरी तारा आणि अडथळे – सगळं जिथल्या तिथे आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांनी मात्र जे काही नुकसान केलं त्याच्या खुणा अजून मिटलेल्या नाहीत.
या वर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हे शेतकरी आंदोलन करतायत. कृषी उत्पन्न बाजार समितीसंबधीचा कायदा आला तर त्यांच्या भल्यासाठी काम करणारी मंडी – बाजार समित्यांची यंत्रणाच मोडकळीस येईल याकडे ते लक्ष वेधतात. किमान हमीभावाची सगळी प्रक्रिया उद्ध्वस्त होईल आणि मोठ्या कृषी संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांना किंमतीवर नियंत्रण मिळेल. हे दोन कायदे किमान हमीभावाची ग्वाही देत नाहीतच पण स्वामिनाथन कमिशनच्या अहवालांचा साधा उल्लेखही त्यात नाही हे या शेतकऱ्यांना माहित आहे. यातला दुसरा कायदा, the Farmers (Empowerment And Protection) Agreement On Price Assurance And Farm Services Act, 2020 जो करारांसंबंधी आहे त्यात खाजगी व्यापारी आणि मोठ्या कॉर्पोरेशनचं पारडं भारी असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसंच अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्येही अशाच मोठ्या कंपन्यांना बढावा दिला असून साठेबाजीला प्रोत्साहन मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या वाटाघाटीच्या शक्यताच मर्यादित केल्या आहेत.
या आंदोलकांच्या मागण्यांमध्ये हे तीनही कायदे रद्द केले जावेत ही मागणी आहे.








