धमतरी जिल्ह्याच्या नगरी तहसिलात १० जणांच्या एका घोळक्याचं काही तरी चाललं होतं. मी थांबलो आणि त्यांना कशानी खिळवून ठेवलंय ते पहायला त्यांच्यापाशी चालत गेलो.
काही तरुण मुलं स्थानिक सरकारी रुग्णालयाच्या इमारतीला लागलेल्या मधमाशांच्या पोळ्यातनं टपटपणारा मध विकत होती. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्यांना पोळं काढायला सांगितलं होतं.
मी त्यांना ते कुठचे आहेत ते विचारलं. सैबलने आपल्या गावाबद्दल आपुलकीने सांगितलं, “कोलकाता, पश्चिम बंगाल!” म्हणजे कोलकात्याचा, मी विचारलं? “तुम्हाला सुंदरबन माहितीये?” तो उत्तरतो. अर्थात, मी म्हणतो. ते सुंदरबनमध्येही मध गोळा करत असतील का असा प्रश्न माझ्या मनात डोकावून जातो.


