आर. कैलासम बँकेतून बाहेर पडताना सहसा गोंधळून गेलेले असतात. "दर वेळी पासबुक भरायला गेलो की मला म्हणतात मशीन बंद पडलंय, नाहीतर नंतर कधी या," ते म्हणतात.
त्यांना यासाठी आपल्या बंगालामेडू या पाड्याहून के. जी. कंडीगई शहरातील बँकेच्या शाखेत साधारण दोन तास पायी चालत जावं लागतं. (वर्षभराआधी अर्धं अंतर बसने जाता येत होतं, पण आता तीही बंद झालीये).
मात्र, बँकेत त्यांची खरी कसरत सुरू होते. तमिळनाडूमधील तिरूवल्लुर जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या के. जी. कंडीगई शाखेत पासबुक भरण्यासाठी एक स्वयंचलित मशीन ठेवण्यात आलंय. कैलासम यांना ते कधीही वापरता आलेलं नाही. "मला जमतच नाही," ते म्हणतात.
एक दिवस सकाळी ते मला बँकेच्या कामात येणाऱ्या अडचणी सांगत होते. शेजारच्या मैदानात बसलेल्या काही महिला वेड्या बाभळीच्या सावलीत आमच्याभोवती येऊन उभ्या राहिल्या. "ताता (आजोबा), पासबुक भरायला त्यावर स्टिकर लावावं लागतं," एक जण म्हणाली. तिचं म्हणणं बरोबर आहे: कैलासम यांच्या पासबुकवर बारकोड नाही, आणि त्याशिवाय मशीन काम करू शकत नाही. " स्टिकर का नाही दिलं मला काय माहित? मला यातलं काही कळत नाही," ते म्हणतात. इतर जणींना देखील कल्पना नाही, त्या एकेक करून अंदाज बांधत होत्या: "तुमच्याकडे [एटीएम] कार्ड असलं तरच स्टिकर मिळतो," एक म्हणाली. "तुम्ही ५०० रुपये भरून एक नवीन अकाऊंट उघडा," दुसरी म्हणाली. तर तिसरी म्हणते, "तुमचं झिरोवालं अकाऊंट असेल तर तुम्हाला स्टिकर मिळणार नाही." कैलासम अजूनही गोंधळलेलेच आहेत.
बँक व्यवहाराच्या अशा खटपटी करणारे ते एकटेच नाहीत. बंगालामेडूतील बऱ्याच जणांसाठी आपल्या खात्याचे व्यवहार करणं, पैसे काढणं किंवा कमाईचा हिशोब ठेवणं सोपं नाहीये. त्यांचा पाडा – अधिकृतरीत्या चेरूक्कनुर इरुलर कॉलनी – तिरुत्तानी तालुक्यातला झुडपांनी भरलेल्या माळावरची एक गल्ली असावी असा आहे. काही झोपड्या आणि काही पक्की घरं अशी एकूण ३५ इरुला कुटुंबांची ही वस्ती आहे. (हल्ली सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांची नोंद इरुलार अशी केली जाते.)
कैलासम, वय ६०, आणि त्यांच्या पत्नी के. संजयम्मा, वय ४५ इथे एका गवताने शाकारलेल्या मातीच्या झोपडीत राहतात. त्यांच्याकडे चार शेळ्या असून संजयम्मा त्यांची देखभाल करतात; त्यांचे चारही मुलं मोठी असून आपापल्या कुटुंबांना घेऊन वेगळी झालीयेत. कैलासम रोजंदारी करतात, ते म्हणतात, "शेतात काम मिळालं तर दिवसभर वाकावं लागतं. माझी कंबर भरून येते आणि हाडं दुखायला लागतात. मला हल्ली एरी वेलई [मनरेगा अंतर्गत मिळणारं तलावाचं काम] बरं वाटतं." महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षांचे किमना १०० दिवस रोजगार मिळण्याची तरतूद आहे – मात्र बंगालामेडूतील इरूलांना ते क्वचितच मिळतं.











