कृष्णनला जेव्हा ते पांढऱ्या नरम सालीचं गोड फळ सापडलं तेव्हा सगळेच उत्साहात आले. त्याने ते सोललं, आणि आतला गुलाबी-लाल गर दिसायला लागला. बारा वर्षांच्या आर. राजकुमारने एक घास घेतला तर त्याचे ओठही तसेच लाल झाले! म्हणूनच या मुलांनी त्याला थाप्पात्तीकल्ली म्हणजे लिपस्टिक फळ असं नाव दिलंय. मग इतरही मुलांनी फळाला चावे मारले आणि आपली तोंडं लाल करून घेतली. जंगलात मारलेली अशी फेरी नेहमीच एक आनंदवारी असते.
डिसेंबरमधल्या त्या सकाळी त्यांचे वाटाडे होते जी. मणिगंदन (३५) आणि के. कृष्णन (५०). चेरुक्कानुर गावाजवळच्या झुडुपांच्या त्या जंगलातून वेली बाजूला सारत किंवा पहारीने त्या उपटून काढत ते आत आत जात आहेत. त्यांच्या सोबतची पाच मुले – वय वर्षे दीड ते बारा – आणि ते दोघेही इरुला आदिवासी आहेत.
त्या रविवारी, ते काट्टु वेल्लीकिळंगु कंदाचा वेल शोधत होते. “ तो कंद तुम्ही फक्त विशिष्ट महिन्यांतच (डिसेंबर-जानेवारी) खाऊ शकता. तो अगदी कोवळा असावा लागतो, नाहीतर तो खाजतो,” मणीगंदन सांगतो, “आधी इतर झुडपांमधून त्या वेलीचं खोड ओळखावं लागतं. त्याच्या जाडीवरून आम्हाला कळतं की कंद किती मोठा असेल आणि तो पूर्ण खणून काढण्यासाठी किती खोल खणावं लागेल.” या कंदाचा शोध घेतानाच त्यांना लिपस्टिक फळ मिळालं होतं. (याला इकडे नाधेल्ली पळ्हम् असेही म्हणतात.)
काही मिनिटांच्या शोधानंतर त्यांना मनाजोगती काट्टु वेल्ली किळंगु वेल सापडते आणि ते तिचा कोवळा कंद खणून काढतात. सगळ्या प्रक्रियेचं निरीक्षण करणारी मुलं उत्सुकतेने त्याची साल सोलून त्याचे तुकडे खाऊ लागतात.
सकाळीच निघालेली मंडळी दुपारपर्यंत बंगालामेडूला परततात. तमिळनाडूच्या तिरुवल्लुर जिल्ह्याच्या तिरुत्तानी तालुक्यातील चेरुक्कानुर गावापासून ३ किमी अंतरावरील इरुला आदिवासींचा हा पाडा आहे.
मणिगंदन आणि त्याचे मित्र मला जंगलातून त्यांनी गोळा केलेल्या काही भाज्या आणि फळं दाखवतात. काट्टु वेल्लीकिळंगु बरोबरच त्यांनी कुट्टी किळंगु (च्याऊम्याऊ म्हणून खायला); कोन्की पळम (एक गोड फळ); तमराई किळंगु (तळ्यातले कंद ज्यांची भाजी करतात); मातु कळीमूलम (हे खाल्ल्यावर पाणी प्यालं तर गोड लागतं) आणि कोळ्ळी कळीमूलम (याने पोट लगेच भरते) याही भाज्या आणि फळे आणलीत. यातील काही फक्त इरुला लोकांच्या आहारातच असतात.
सकाळी सातच्या सुमारास काहीही शिदोरी न
घेता निघून जेव्हा ते संध्याकाळी ५-६ वाजता परततात तेव्हा त्यांना
कोळ्ळी कळीमूलम
खूप उपयोगी पडतं. “याने पोट लगेच भरतं आणि ते कच्चंही खाता येतं. अनेक तास
तुम्हाला भूक लागत नाही,” मणिगंदन सांगतो.
ही विविध फळं, मुळं, कंद आणि औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी अनेकजण नियमितपणे जंगलात जातात. पूर्वापारपासून हे त्यांच्या अन्न आणि औषधींचे स्रोत आहेत. औषधी वनस्पती, मुळे, फुले आणि झाडांच्या साली अनेक छोट्या आजारांवर उपयोगी पडतात, असं मणिगंदन सांगतो. उदा. अल्लीतमरई , हे कमळ आणि तमरई किळंगु म्हणजे कमलाचा कंद उकडून खाल्ल्यास जठरातल्या व्रणासारख्या पोटाच्या विकारावर आराम पडतो. चिन्ना एलई या पानामुळे कीटक दंशानंतर उठलेलं पुरळ नाहीसं होतं.
केंद्र सरकारच्या आदिवासी विभागाने इरुला आदिवासींची नोंद ‘विशेष दुर्बल आदिवासी गट’ (Particularly Vulnerable tribal Group PVTG) अशी केलेली आहे. देशात असे ७५ दुर्बल समुदाय आहेत आणि त्यांतील सहा तामिळनाडूमध्ये आहेत. राज्यात ठिकठिकाणी ते छोट्या छोट्या पाड्यांवर राहतात, काही निलगिरीच्या टेकड्यांमध्ये तर काही पठारावर, बहुधा खेड्यांच्या मुख्य ग्रामीण वस्तीपासून दूर.
२००७ मध्ये, १५ इरुला कुटुंबं चेरुक्कनुर गावातून बंगालामेडू पाड्यावर रहायला आली (आतापर्यंत ३५ कुटुंबे इथे आली आहेत). मणिगंदनच्या म्हणण्यानुसार गावकऱ्यांशी झालेल्या झगड्यामुळे हे घडलं. तो एका स्वयंसेवी संस्थेमार्फत पाड्यावर अभ्यासवर्ग चालवतो. पाड्यावर बहुतेक घरं मातीच्या छोट्या झोपड्याच आहेत, पण १२ घरं पक्की आहेत. २०१५ आणि १६ मध्ये मुसळधार पावसात अनेक घरं वाहून गेली तेव्हा या स्वयंसेवी संस्थेने ही पक्की घरं बांधली.
बंगालामेडूमधील कोणीही दहाव्या यत्तेपेक्षा अधिक शिकलेलं नाही. चेरुक्कनुर गावातील पंचायत माध्यमिक शाळेत मणिगंदन आठवीपर्यंत शिकला आहे, या केंद्रातील दुसरी शिक्षिका सुमती राजूदेखील एवढंच शिकली आहे. कृष्णन कधीच शाळेत गेला नाही. अनेकांनी आठवीनंतर शाळा सोडलेली आहे कारण सरकारी उच्च माध्यमिक शाळा पाच किमी अंतरावरील दुसऱ्या गावात आहे. अनेकांना नवीन शाळेत शिकायला जाणं अवघड असतं, असं सुमती सांगते. शिवाय बस किंवा ऑटोरिक्षाने जाण्यासाठी (अनेक कुटुंबांना हा खर्च परवडतही नसल्याने) मुलांना दोन किमी चालावं लागतं.
छोट्या प्राण्यांची शिकार आणि खाण्यायोग्य वनस्पती शोधण्यासाठी तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, प्राण्यांच्या वर्तनाची जाण, त्यांचे अधिवास आणि स्थानिक ऋतूचक्राचं ज्ञान आवश्यक असतं
मर्यादित शिक्षण असल्याने, इरुलांच्या कामाच्या पर्यायांवरही मर्यादा येतात. चेरुक्कनुर गाव, आसपासची इतर गावं किंवा कधी १२ किमीवरील तिरुतानी तालुक्याच्या ठिकाणी छोट्या बांधकामांवर ते रोजंदारीवर कामं करतात. भातशेती, ऊस आणि बांबूतोड, फळबागांना पाणी देणं अशी कामंही ते करतात. बांधकामात लागणारी सावुक्कू म्हणजेच सुरूची झाडं तोडण्याचंही काम काही जण करतात. इतर काहीजण तिरुतनी तालुक्यातील वीट व कोळसा भट्ट्यांवर कामं करतात. ही सारी कामं हंगामी असतात आणि मिळतीलच याची शाश्वती नसते. साधारण ३०० रुपये रोज याप्रमाणे महिन्यातून सरासरी १० दिवस एवढंच काम त्यांना मिळतं. वेळ पडल्यास बायाही मनरेगा योजनेखाली रु. १७० रोज एवढ्या मजुरीवर रोपं लावणं, कालवे खोदणं, झाडोरा साफ करणं अशी कामं करतात.
त्यांच्यातील एक-दोन कुटुंबांनी शेळ्या पाळल्या आहेत आणि त्यांचं दूध ते आसपासच्या बाजारात नेऊन विकतात. काही जण तळ्यातील मासे धरतात. कधी कधी शेतकरी इरुलांना त्यांच्या भाताच्या शेतातील उंदीर मारण्याचं काम देतात. उंदीर शेतातील धान जमिनीखालील बिळांत साठवतात. इरुला बिळांत धूर करून उंदरांना पळवतात आणि मग त्यांना जाळ्यात पकडतात. या उंदरांचं मांस ते सांबारात वापरतात. बिळांतून निघालेल्या साळीही त्यांना मिळतात.
मर्यादित कमाईमुळे, जंगल हा त्यांच्यासाठी भाज्या आणि मांसाचा स्रोत असतो. “जेव्हा कधी काम नसतं तेव्हा आम्ही जंगलात अन्न गोळा करायला जातो,” मणिगंदन सांगतो. “ससे, गोगलगाई, खारी आणि काही जातींच्या पक्ष्यांची आम्ही शिकार करतो.” सशाचं मांस विकून कुणी कुणी कधीतरी २५०-३०० रुपये कमावतात. “ससा मिळणं ही नशिबाची गोष्ट आहे. कधी कधी आठ-दहा दिवसांत एखादा मिळतो तर एखाद्या दिवशी २-३ ही मिळून जातात. ससे सहसा मोकळ्या जागेत येत नाहीत. लांब काठ्यांनी ढोसून आम्ही त्यांना बाहेर काढतो म्हणजे ते आमच्या सापळ्यात अडकतात. पण त्यांना चंद्रप्रकाशात देखील चांगलं दिसतं त्यामुळे सापळ्याची बारीक तारही ते बघतात आणि सापळे टाळतात. त्यामुळे आकाशात चंद्र नसतो त्या अमावास्येच्या रात्री आम्ही ससे धरायला बाहेर पडतो.”
छोट्या प्राण्यांची शिकार आणि खाण्यायोग्य वनस्पती शोधण्यासाठी तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, प्राण्यांच्या वर्तनाची जाण, त्यांचे अधिवास आणि स्थानिक ऋतूचक्राचं ज्ञान आवश्यक असतं. इरुलांच्या अनेक पिढ्यांनी हे ज्ञान पुढील पिढ्यांना दिलेलं आहे, जसं कृष्णन आणि मणिगंदन रविवारच्या जंगलभेटीत मुलांना देतायत. १३ वर्षांची, चेराक्कनुर गावातील पंचायत शाळेतील आठवीची विद्यार्थिनी आर. अनुषा सांगते की, “आम्ही रविवार आणि सुट्ट्या यांची वाट पाहत असतो कारण तेव्हाच आमचे पालक आम्हाला जंगलात जाऊ देतात.
पण अन्न, सरपण, औषधी आणि उपजीविका या इरुलांच्या गरजांचा मुख्य स्रोत असणारं हे दाट झुडुपांचं जंगल गेल्या काही दशकांत आक्रसत चाललंय. काही ठिकाणी ते शेतीसाठी किंवा आमराया लावण्यासाठी तोडलंय; काही ठिकाणी बांधकामासाठी प्लॉट पडण्यासाठी तर काही ठिकाणी, तिरुवल्लुर जिल्ह्यातील बिगर आदिवासींनी इथल्या जमिनीवर आपला हक्क सांगत कुंपणं घालून इरुलांना आत शिरण्यास मनाई केली आहे.
आक्रसत चाललेलं जंगल आणि कामाची अनिश्चितता पाहता अनेक इरुलांना चांगलं शिक्षण हेच त्यांच्या मुलांना चांगल्या संधी देईल असा विश्वास वाटतो. माध्यमिक शाळेपर्यंत पोचण्यात अडचणी असूनही बंगालामेडू मधील इरुला पुढे शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मणिगंदनच्या अभ्यासकेंद्रात त्याची बहिण के. कन्नीअम्मा आपल्या २-३ वर्षांच्या नातवंडाला घेऊन येते. ती म्हणते, “आमच्या मुलांनी चांगलं शिकावं आणि नोकऱ्या मिळवाव्यात असं आम्हाला वाटतं. त्यांना आमच्यासारखं पोटापाण्यासाठी झटावं लागू नये.
अनुवादः छाया देव