“सब माछ शेष [सगळी मच्छी संपून गेलीये],” मुरली मोडक्या तोडक्या बंगालीत हसत म्हणतो. त्याला दुःखाची किनार असते. “शोब किच्छू डिफरंट [सगळं बदलून गेलंय],”तो म्हणतो. दोन वर्षांपूर्वी आम्ही जालधा गावातल्या मासळी बाजारात भेटलो होतो. मुरलीच्या निरीक्षणानुसार बंगालच्या उपसागरातले मासे गायब व्हायला लागले आहेत.
समुद्राच्या मध्यावर असलेल्या ‘कालो जोन’बद्दल तो बोलतो. २०१७ साली शास्त्रज्ञांनी या सागरामध्ये सुमारे ६०,००० चौरस किलोमीटरचा प्रदेश ‘मृत प्रदेश’ जाहीर केला होता जो वाढत चालला होता. तिथे प्राणवायू अगदी नगण्य प्रमाणात होता, नायट्रोजन कमी झाला होता आणि जवळपास कोणत्याच समुद्री जीवांचं अस्तित्व नव्हतं. काही नैसर्गिक प्रक्रिया आणि सोबत मानवी हस्तक्षेपाचा हा परिणाम असल्याचं अहवालात म्हटलं आहे.
मुरली (आडनाव माहित नाही) बेश्ता या मच्छिमार समुदायाचा असून आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातल्या आणि गोवुंदलापालेम (जनगणनेनुसार गुंडालापालेम) गावचा रहिवासी आहे. गेल्या दोन दशकांपासून तो बंगालच्या उपसागराच्या किनारी पट्ट्यातल्या ऑक्टोबर-मार्च मासेमारीच्या हंगामामध्ये पूर्ब मेदिनीपूर जिल्ह्याच्या रामनगर तालुक्यातल्या जालधा गावी येत आहे. इतक्या वर्षांमध्ये त्याने थोडीफार बंगाली भाषा आत्मसात केली आहे. थोडं हिंदी, थोडं इंग्रजी मिसळून ती तो बोलतो.
भारत, बांग्लादेश आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीवर आपलं कुटुंब आणि मित्र परिवार असल्याचं मुरली अभिमानाने सांगतो. “जाफना ते जंबूद्वीप, सगळेच माझे कुटुंबीय आहेत,” तो खुशीत येऊन सांगतो. जास्त काही तपशील देत नाही पण माझी ओळख त्याचा मित्र स्वपन दासशी करून देतो – “एइ आमार भाई [हा माझा भाऊ],” चाळिशीच्या आसपास असणारा मुरली सांगतो.






