टाळेबंदीमुळे अब्दुल सत्तार यांना बंगळुरू सोडून गावी परतावं लागलं त्याला आता चार महिने होऊन गेलेत.
"काहीही करून निघून जाऊ, उशिरा का होईना," ते म्हणाले होते. ही गोष्ट आहे २० मे रोजी अम्फान चक्रीवादळ जमिनीवर धडकण्यापूर्वीची. तरीही, अब्दुल आणि त्यांचे मित्र काहीही करून १,८०० किमी अंतर पार करून पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील चाक लछीपूर या गावी आपल्या घरी परतण्यास सज्ज होते.
अब्दुल मुंबईहून बंगळुरूला येऊन अजून काहीच महिने झाले होते. जानेवारी किंवा फेब्रुवारीत कधी तरी, ते म्हणतात. त्यांच्या पत्नी हमीदा बेगम, वय ३२, गृहिणी असून त्यांची मुलं, सलमा खातून, वय १३, आणि यासिर हमीद, वय १२, घाटाल तालुक्यातील त्यांच्या गावी तीन खोल्यांच्या लहानशा घरात राहतात. त्यांच्या कुटुंबाकडे २४ दिस्मिल (पाव एकर) जमीन आहे, जिच्यावर त्यांचा भाऊ भातशेती करतो.
अब्दुल यांनी इयत्ता आठवीत शाळा सोडून गावातील बहुतांश जणांप्रमाणे भरतकाम शिकायला सुरुवात केली होती. तेव्हापासून, ते कायम फिरस्तीवर असतात, काही वर्षं दिल्लीत काम केलं, आणि नंतर मुंबईत, दर ५-६ महिन्यांनी घरी भेट देतात. "मी मशीनची कशिदाकारी करतो. मुंबईत जास्त काम मिळत नव्हतं, म्हणून विचार केला की आपल्या भावासोबत काम करावं," ते म्हणाले.
चाळिशीचे अब्दुल आपला चुलत भाऊ, ३३ वर्षीय हसनुल्ला सेख (त्यांच्या आधार कार्डवर लिहिल्याप्रमाणे) याच्यासोबत त्याच्या दक्षिण बंगळुरूमधील लहानशा शिवण उद्योगात सामील झाले. ते पाच जणांसोबत एक खोली करून राहायचे, सगळे चाक लछीपूरचे. हे सहा जण हसन यांच्या दुकानात शिंपी आणि कशिदाकार म्हणून काम करायचे.







