जर २०२१ ची फोर्ब्सची यादी खरी मानायची असं ठरवलं तर (आणि जेव्हा अब्जाधिशांची बात असते तेव्हा फोर्ब्सवर बहुतेकांचा भरोसा असतो) १२ महिन्यांच्या काळात भारतातल्या डॉलर अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४० इतकी वाढली. त्यांची सर्वांची मिळून संपत्ती गेल्या एका वर्षात “जवळ जवळ दुप्पट होऊन ५९६ अब्ज डॉलर” इतकी वाढल्याचं या यादीत म्हटलंय.
याचा अर्थ असा की १४० व्यक्ती किंवा आपल्या लोकसंख्येच्या ०.००००१४ टक्के व्यक्तींची सर्वांची मिळून संपत्ती आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या, म्हणजेच २ लाख ६२ हजार कोटी डॉलरच्या २२.७ टक्के (एक पंचमांशहूनही अधिक) आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्न खरोखरच ‘सकल’ आहे का असा प्रश्न आता पडावा.
देशातल्या बहुतेक दैनिकांनी फोर्ब्सच्या घोषणेचा अर्थातच उदो उदोच केला. अशा विक्रमांसाठीच तो राखून ठेवलेला असतो. त्यातही या धनदांडग्यांच्या स्वर्गातून झालेली थेट आणि प्रामाणिक आकाशवाणी मात्र या दैनिकांनी निक्षून वगळली.
आपल्या देशाच्या अहवालातला पहिला परिच्छेद सांगतो, “भारतात कोविडची नवीन लाट आलेली आहे आणि सध्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी २० लाखाच्या पुढे गेली आहे. पण देशाच्या स्टॉक मार्केटने मात्र भीतीचं मळभ झटकून नवनवीन उच्चांक गाठायला सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सेन्सेक्स ७५% वधारला आहे. गेल्या वर्षी भारतातल्या अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४० वर पोचली. आणि त्यांची सर्वांची मिळून संपत्ती दुपटीने वाढून ५९६ अब्ज किंवा ५९ हजार ६०० कोटी डॉलर इतकी झाली आहे.”
होय. या १४० धनदांडग्यांची संपत्ती ९०.४ टक्क्यांनी वाढली – तीही अशा वर्षात जेव्हा सकल राष्ट्रीय उत्पन्न ७.७ टक्क्यांनी संकोचलं. ही बातमी आपल्यावर येऊन आदळते तेव्हाच स्थलांतरित कामगारांचे तांडे परत एकदा शहरं सोडून गावाच्या वाटेवर निघालेले असतात. त्यांची संख्या इतकी जास्त आणि ते इतके विखुरलेले आहेत की त्यांची मोजदाद करणं अशक्य आहे. त्यातून जो रोजगार हिरावला जाणार आहे त्याचा सकल राष्ट्रीय उत्पन्नावर होणारा परिणामही फारसा चांगला नसणार. पण आपल्या अब्जाधीशांना याची काहीही झळ पोचणार नाही हे मात्र बरं झालं. फोर्ब्सनेच तसा निर्वाळा दिलाय म्हटल्यावर आणखी काय पाहिजे?
शिवाय, अब्जाधीशांची संपत्ती आणि कोविड-१९ यांचं प्रमाणही व्यस्त आहेसं दिसतंय. संपत्ती जितकी जास्त एकवटणार तितका तिचा प्रसार होण्याची शक्यता कमीत कमी होत जाणार.







