समुद्राच्या किनाऱ्यावरून लाकडी सांगाड्याच्या मदतीने चालवण्यात येणाऱ्या जाळ्यांवर केरळच्या कोचीमधल्या अनेकांचं पोट भरत होतं. याच जाळ्यांना चायनीज जाळी देखील म्हटलं जातं.
पण अनेक स्थित्यंतरांनंतर या उद्योगाला अवकळा आली आहे. पर्यावरण आणि अर्थकारण, दोन्ही दृष्टीने. फोर्ट कोचीच्या आसपास खोल समुद्रातल्या ट्रॉलर्समुळे तसंच औद्योगिक प्रदूषणामुळे मासळी कमी व्हायला लागली आहे. जी काही मासळी घावते त्याचा नफा मध्यस्थांच्या खिशात जातो आणि मच्छीमारांना मात्र अगदी तुटपुंजा नफा हाती येतो.
मच्छीमारांच्या समस्यांमध्ये भर पडते ते सरकारच्या अविचारी धोरणांमुळे. त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात न घेताच ही धोरणं आखण्यात येतात. त्यात, या जाळ्यांची देखभाल दिवसेंदिवस खर्चिक होत चालल्याने मच्छीमारांना ती परवडत नाहीयेत.
तरुण मुलं आता या व्यवसायातून बाहेर पडतायत आणि तसंच होत राहिलं तर फोर्ट कोचीच्या किनारपट्टीची ओळख असणारी ही मासेमारीची जाळी भविष्यात लुप्त होऊन जातील.