“आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही मोर्चा काढतच राहणार,” मे महिन्याच्या तळपत्या उन्हात चालत असलेल्या मितभाषी अशा विजया आंधेर सांगतात. त्यांच्यासोबत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले इतर ३५००० आदिवासी आहेत.
काही महिन्यापूर्वी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातल्या बोराळा-अघई गावच्या शेतकरी असणाऱ्या विजया नाशिकहून मुंबईला लाँग मार्चमध्ये सामील झाल्या होत्या. हा ऐतिहासिक मोर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित अखिल भारतीय किसान सभेने काढला होता. गेल्या आठवड्यात किसान सभेने आयोजित केलेल्या निर्धार मोर्चासाठी त्या परत रस्त्यावर उतरल्या होत्या. हा मोर्चा म्हणजे आदिवासी शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला मिळालेलं यश साजरं करत असतानाच आपल्या मागण्यांसाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त करणारी कृती होती.
“हा लाँग मार्चचा पाठपुरावा आहे,” अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे सांगतात. “वन हक्क कायदा आणि इतर विषयांवर सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारवर दबाव कायम ठेवण्यासाठी हा मोर्चा काढला आहे.”
इतर मुद्द्यांमध्ये ते सांगतात, मुंबई-नागपूर समृद्धी मार्गासारख्या इतर प्रकल्पांसाठी सरकारद्वारे करण्यात येणाऱ्या भू संपादनाला कडवा विरोध असे काही मुद्दे आहेत. शेतकऱ्यांच्या संमतीनंतरच जमिनी संपादित करण्यात येतील या आश्वासनाचं सरकार स्वतःच उल्लंघन करत आहे.








