प्लॅस्टिक हे सगळ्यांना पुरून उरतं. आपण ज्या ज्या रूपात त्याची कल्पना करू त्या त्या रूपात ते असतंच, आणि जिथे बघावं तिथेही - रसत्यावर पडलेलं, पाण्यावर तरंगणारं,पोत्यांमधे भरलेलं, कचराकुंड्यांमधे टाकलेलं, आणि छपरांवर रचलेलं. आणि जेव्हा तेराव्या कंपाउंड जवळच्या खाडीजवळ, त्यातले धातूचे भाग वेगळे करायलासाठी प्लॅस्टिक जाळलं जातं तेव्हा त्यातून निघणारा घातक धूर हवेत भरून रहातो.
या रिसायकलिंग सेंटरच्या कंपाउंडमधे रोज मुंबईतून येणाऱ्या प्लॅस्टिक आणि इतर भंगार मालाचा ओघ चालूच रहातो. मुंबईत रोज १०,००० टन कचरा तयार होतो त्यातला बऱ्यापैकी कचरा ट्रक, टेम्पो आणि हातगाड्यांवरून इथे आणला जातो. ह्या सेक्टरच्या अतिशय अरुंद गल्ल्यांमधे कामगार तो ट्रकमधे चढवतात आणि उतरवतात. बहुतेक कामगार वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले स्थलांतरित तरुण आहेत.
इथे रिसायकलिंग (पुनर्वापर) करण्याच्या अनेक पायऱ्यांची प्रक्रिया छोट्या छोट्या असंख्य शेड्समधे चालू असते. त्यातल्या काही तर चार मजली असून त्यांची इथे दाटी झाली आहे. इथली प्रत्येक वस्तू एका असेंब्लीलाईनच्या मार्गाने जाते. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे आणि एका प्रक्रियेतून दुसऱ्या प्रक्रियेकडे. या सगळ्यातून शेवटी बाहेर पडतो एक नवीन कच्चा माल किंवा एखादी तयार वस्तू.
या तेरा कंपाउंडमधल्या रिसायकलिंगच्या यंत्रणेतले सगळे भाग कसे एकमेकांशी सांधे जुळवून आहेत. खरेदी आणि विक्रीची पद्धत रुळून गेली आहे. लोक ‘कामासाठीच वापरली जाणारी भाषा’ वापरतात, आणि कामात कशानंतर काय करायचं हेही अगदी रुळून गेलं आहे, आणि प्रत्येक जण एक किंवा त्याहून अधिक विशेष असं काम करतो. रद्दीवाले (शहरभर पसरलेले) लोकांकडचा रद्दी माल गोळा करतात, भंगारवाले आणि फेरीवाले रोजचा जमलेला माल इथल्या शेड्समधे आणून टाकतात. वाहनांचे ड्रायव्हर आणि हेल्पर कांटावाल्यांकडे (वजनकाटा बाळगणारे लोक) माल उतरवतात. शिवाय गोडाऊनचे मालक असणारे शेठ असतात, त्यांनी सब-कॉन्ट्रॅक्ट दिलेले सुपरवायझर असतात, आणि हजारो प्रकारच्या कामांमधे गुंतलेले स्त्री-पुरुष कामगार असतात.




