७ जून. आमच्या सर्वांच्याच - आणि पारीच्याही - आयुष्यातले फार हृद्य आणि गहिवरून टाकणारे क्षण आम्ही या दिवशी अनुभवले. आणि तो सोहळा पारीच्या कल्पनेतून साकार झाला याचा मला खरंच अभिमान वाटतोय. कॅप्टन भाऊ आणि तुफान सेनेची गोष्ट आठवतीये तुम्हाला? तर या क्षणांमध्ये कॅप्टन भाऊही होते आणि त्यांच्या बरोबरीने इतर विस्मृतीत गेलेले अनेक लढवय्ये शिलेदारही होते.

काळ सरतोय तसं मन अधिकच खिन्न होत जातंय – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातले हे अखेरचे काही शिलेदार आता आपल्यातून जातायत, मृत्यू पावतायत. पुढच्या पिढीतल्या मुलांना, ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा आवाज कधीच ऐकायला मिळणार नाहीये. कदाचित हा लेख वाचणाऱ्यांपैकीही कित्येकांना हा अनुभव मिळाला नसेल.

म्हणूनच, कित्येक वर्षं मी या विलक्षण, वयोवृद्ध स्त्री पुरुषांच्या कहाण्या, त्यांचे लढे गोळा करतोय, नोंदवून ठेवतोय, चित्रित करतोय, लिहितोय. मनात सतत एक खंत बाळगत की यातले बहुतेक जण, शांतपणे, एखाद्या काळ बनून आलेल्या रात्री, या जगातून निघून जाणार आहेत. नाही चिरा, नाही पणती.

तर, आम्ही १९४३-४६ साली सक्रीय असणाऱ्या साताऱ्याच्या प्रति सरकारमधल्या* हयात असणाऱ्या या शिलेदारांचं एक स्नेह संमेलन आयोजित केलं होतं. ७ जूनला तूफान सेनेचे हे सैनिक आणि सातारा  व सांगली जिल्ह्यातल्या इतर स्वातंत्र्य सैनिकांचा आम्ही सत्कार केला. १९४३ साली याच दिवशी त्यांनी इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांचे पगार घेऊन जाणाऱ्या ‘पे स्पेशल’ आगगाडीवर हल्ला केला होता. ते सगळं धन लुटून त्यांनी गोरगरिबांना वाटलं आणि त्यांनी स्थापन केलेलं प्रति सरकार चालवण्यासाठी वापरलं होतं.

निवृत्त सनदी अधिकारी, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल – आणि महात्मा गांधींचे नातू – गोपाळ गांधींना आम्ही या प्रसंगी बोलण्यासाठी आमंत्रित केलं. ते आले, आणि तिथे जे काही घडलं त्या सगळ्याने हेलावून गेले.

तूफान सेना ही प्रति सरकारचं सशस्त्र दळ. प्रति सरकार हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक गौरवशाली पर्व आहे. १९४२ च्या चले जाव चळवळीचा भाग म्हणून ही सशस्त्र सेना तयार झाली आणि या सेनेतल्या क्रांतीकारकांनी साताऱ्यामध्ये प्रति सरकारची घोषणा केली. तेव्हा सातारा मोठा जिल्हा होता, सांगली त्यात समाविष्ट होता.

व्हिडिओ पहा – ७ जून १९४३ ला आगगाडीवर झालेल्या हल्ल्याची निशाणी म्हणून इंग्रजांनी उभारलेल्या ‘स्मारकापाशी’ गोपाळ गांधी इतरांसमवेत


जिथे आगगाडीवर हल्ला झाला त्या ठिकाणी शेणोलीमध्ये आम्ही स्वातंत्र्य सैनिकांसमवेत एक छोटेखानी कार्यक्रम घेण्याचं ठरवलं होतं. मात्र उन्हाळ्यातल्या भर दुपारी ३ वाजता तिथे २५० जण जमले. आता वयाची नव्वदी गाठलेले किती तरी जण त्या रेल्वेच्या रुळांपाशी लहान मुलं बागेत खेळतात तसे बागडत होते. त्यांच्यासाठी हा संगम होता, स्वातंत्र्यसंग्रामाच्या वेगवेगळ्या प्रवाहांचा संगम. आणि तूफान सेनेचे सशस्त्र क्रांतीकारक, गोपाळ गांधींना प्रेमाने आलिंगन देताना ‘महात्मा गांधी की जय’ अशी घोषणा देत होते. खास करून कॅप्टन भाऊ, वय ९५, अभिमानानाने डोळे पाणावलेले, तब्येत बरी नव्हती, पण कार्यक्रमाला येण्याची दुर्दम्य इच्छा. माधरवराव माने, वय ९४, त्या रेल्वेरुळांवरून एखाद्या लहानग्यासारखे हुंदडत होते आणि मी, ते पडतील या भीतीने त्यांच्यामागे धावत होतो. ना ते पडले, ना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ढळलं.

तर, आम्ही रेल्वे लाइनच्या बाजूने त्या खास स्थळी पोचलो. त्या कोपऱ्यावर सैनिकांनी ७४ वर्षांपूर्वी रेल्वे अडवली आणि तिचा ताबा घेतला होता. तिथे एक छोटं स्मारक उभारलं आहे – क्रांतीकारकांनी नाही, तर या हल्ल्याचं दुःख व्यक्त करण्यासाठी इंग्रजांनी. खरं म्हणजे त्याच स्मारकाशेजारी आणिक एक स्मारक उभारायला पाहिजे – त्या दिवसाचा खरा अर्थ, खरी थोरवी सांगणारं.


Haunsai bai and Nana Patil felicitation

कुंडल येथील कार्यक्रमात गोपाळ गांधी हौसाताई पाटील (प्रति सरकारचे प्रणेते, क्रांतीसिंह नाना पाटलांची कन्या) यांचा सत्कार करताना (डावीकडे), माधवराव माने यांचा सत्कार करताना (उजवीकडे)


त्यानंतर आम्ही शेणोलीहून २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कुंडलला गेलो. १९४३ मध्ये प्रति सरकारचं हे मुख्य ठाणं. हा कार्यक्रम स्थानिक नागरिक आणि या लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढच्या पिढीने आयोजित केला होता. डॉ. जी डी बापू लाड, नागनाथण्णा नायकवडी, क्रांतीसिंह नाना पाटील (प्रति सरकारचे प्रणेते) यांच्या कुटुंबियांनी हे आयोजन केलं होतं. १९४३ च्या त्या चौकडीतले  आज हयात असलेले – आणि म्हणून साक्षात आलेले कॅप्टन भाऊ. सोबत होत्या हौसाताई पाटील, नाना पाटलांची कन्या, जिवंत आणि मुखर, स्वतः जहाल भूमीगत चळवळीत सहभाग घेतलेल्या. वय झालेले तरी उमदे असे कॅप्टन भाऊ दोनच दिवस आधी रस्त्यावर उतरले होते. हो, महाराष्ट्रातल्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला रस्त्यावर उतरले होते. एक ध्यानात घ्या – या स्वातंत्र्य सैनिकांपैकी बरेचसे शेतकरी किंवा शेतमजूर होते. आणि बऱ्याच जणांचे वंशज आजही तेच काम करतायत.

महाराष्ट्र सरकारने मात्र ७ जून आमच्यापेक्षा वेगळ्या रितीने साजरा केला. बराचसा १९४३ च्या इंग्रज राजवटीला साजेल असा. शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसबळाचा वापर करून. याची आमच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संमेलनाला काहीशी झळ पोचलीच. बरेचसे शेतकरी आणि शेतमजूर प्रतिबंधक कारवाई म्हणून पकडून तुरुंगात डांबले गेले. बेकायदेशीर अटक, अखेर कोणतंही आरोपपत्र दाखल केलं गेलं नाही. किसान सभेचा उमेश देशमुख या संमेलनाचा मुख्य आयोजक. पण तो स्वतःच येऊ शकला नाही. त्याला पहाटे ५.३० वाजता पकडून इतर आठ जणांसोबत तासगावच्या पोलिस स्टेशनमध्ये अटकेत टाकलं गेलं. या वयोवृद्ध सैनिकांना घरी फोन करून निमंत्रण देणारा आणि त्यांच्या संमेलनाची तयारी करणारा म्हणजे उमेश.

इतकं असूनही दोन्ही कार्यक्रम झाले. बसायला जागा नव्हती, कित्येक जण उभे होते. कुंडलच्या या कार्यक्रमात मंचावर २० स्वातंत्र्यसैनिक विराजमान झाले होते. जिवाचा कान करून ऐकणाऱ्या त्या समुदायाशी गोपाळ गांधी बोलले. स्वातंत्र्य लढ्याबद्दल, महात्मा गांधींच्या या लढ्याबाबत असलेल्या दृष्टीकोनाबद्दल, त्यांना स्वातंत्र्य सैनिकांबद्दल वाटत असलेल्या आदराबद्दल, आजच्या काळाबद्दल आणि वृत्तींबद्दल.


व्हिडिओ पहा – कुंडलच्या नागरिकांनी उभं राहून दिलेली सुंदर मानवंदना स्वीकारताना स्वतःही उभे राहिलेले वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक


त्यांचं बोलणं संपलं आणि सगळ्या उपस्थितांनी मंचावरच्या या वयोवृद्ध स्वातंत्र्य योद्ध्यांना उभं राहून मानवंदना दिली. आणि अपेक्षेपेक्षा किती तरी वेळ टाळ्या वाजतच राहिल्या. आपल्या मातीतल्या या वीर आणि वीरांगनांना कुंडल सलाम करत होतं. किती तरी डोळे पाणावले होते. माझेही. नव्वदीतल्या त्या विलक्षण वीरांसाठी मी टाळ्या वाजवत उभा होतो, त्यांचंच गाव आज अशा रितीने त्यांचं कौतुक करतंय हे पाहून आनंदाने, अभिमानाने ऊर भरून आलं होतं. त्यांच्या अखेरच्या काही वर्षांमधले हे काही अखेरचे सुंदर क्षण. त्यांचा अखेरचा जयघोष.


Freedom fighter program

या योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी उभे राहिलेले प्रेक्षक. उजवीकडेः शूरबहाद्दर कॅप्टन भाऊ, कुंडलच्या समारंभात


*प्रति सरकार महाराष्ट्रात पत्री सरकार म्हणून जास्त ओळखलं जातं

फोटोः नमिता वाईकर, संयुक्ता शास्त्री, सिंचिता माजी

P. Sainath

ପି. ସାଇନାଥ, ପିପୁଲ୍ସ ଆର୍କାଇଭ୍ ଅଫ୍ ରୁରାଲ ଇଣ୍ଡିଆର ପ୍ରତିଷ୍ଠାତା ସମ୍ପାଦକ । ସେ ବହୁ ଦଶନ୍ଧି ଧରି ଗ୍ରାମୀଣ ରିପୋର୍ଟର ଭାବେ କାର୍ଯ୍ୟ କରିଛନ୍ତି ଏବଂ ସେ ‘ଏଭ୍ରିବଡି ଲଭସ୍ ଏ ଗୁଡ୍ ଡ୍ରଟ୍’ ଏବଂ ‘ଦ ଲାଷ୍ଟ ହିରୋଜ୍: ଫୁଟ୍ ସୋଲଜର୍ସ ଅଫ୍ ଇଣ୍ଡିଆନ୍ ଫ୍ରିଡମ୍’ ପୁସ୍ତକର ଲେଖକ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ପି.ସାଇନାଥ
Translator : Medha Kale

ମେଧା କାଲେ ପୁନେରେ ରହନ୍ତି ଏବଂ ମହିଳା ଓ ସ୍ଵାସ୍ଥ୍ୟ କ୍ଷେତ୍ରରେ କାମ କରିଛନ୍ତି । ସେ ମଧ୍ୟ PARIର ଜଣେ ଅନୁବାଦକ ।

ଏହାଙ୍କ ଲିଖିତ ଅନ୍ୟ ବିଷୟଗୁଡିକ ମେଧା କାଲେ