रमेश कुमार सायकल चालवत सिंघुला आले आहेत. पंजाबच्या होशियारपूरहून इथे ४०० किलोमीटर अंतर कापायला त्यांना २२ ताल लागले. त्यांची बहीण, मुलगा आणि सून त्यांच्या पाठोपाठ चारचाकीतून येत होते, तर पोलिस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले ६१ वर्षीय रमेश कुमार सायकलवर.
“या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मला आधीपासूनच सहभागी व्हायचं होतं,” ते सांगतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चात भाग घेण्यासाठी ते आता इथे पोचलेत.
“सरकारला असं वाटू शकतं की त्यांना कृषी कायदे मागे घेतले तर लोकांच्या मनातून ते उतरतील,” ते म्हणतात. “पण ते काही खरं नाहीये, उलट तसं केलं तर लोकांच्या मनात त्यांना मान वाढेल.”
शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.
तर, उद्याच्या मोर्चासाठी सिंघु सीमेवर फुलांचे हार, झेंडे आणि रंगीबेरंगी पताकांनी ट्रॅक्टर सजवण्यात आले आहेत. आणि हे सगळे ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाल्यावर निघणं सुरळीत व्हावं म्हणून एका मागोमाग एक उभे केलेले आहेत.