तंबाखूच्या भट्ट्या बंद होणं किंवा तंबाखूखालचं क्षेत्र कमी होण्याशी अजून एक घटक संबंधित आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या फ्रेमवर्क कन्व्हेंशन ऑफ टबॅको कंट्रोल म्हणजेच तंबाखू नियंत्रण जाहीरनाम्याचा उद्देशच तंबाखूचं सेवन कमी करणे असा आहे. २०१६ मध्ये या जाहीरनाम्यावर सह्या करणाऱ्या देशांनी, यात भारताचाही समावेश आहे, कालबद्ध रितीने तंबाखूचं उत्पादन कमी करायचं ठरवलं आहे. त्यामुळेच तंबाखू बोर्डाने नव्या भट्ट्यांना परवाने देणं थांबवलं आहे. आणि तंबाखूतला नफा कमी होत चालल्यामुळे शेतकऱ्यांकडून परवान्याची मागणीही कमी होत चालली आहे.
श्रीनिवास राव, वय ४०, टी. अग्राहरममध्ये वर्षाला एकरी ३०,००० रुपये खंडाने शेती करतात, आणि आपल्या खंडाच्या नऊ एकरात तंबाखू करतात. गेल्या हंगामातच त्यांच्यावर १५ लाखांचं कर्ज झालंय. “मी २०१२ मध्ये ६ लाख खर्च करून भट्टी बांधली आणि गेल्या वर्षी ती तीन लाखाला विकली,” ते सांगतात. “आता तर कुणी भट्ट्या विकतही घेईना झालेत. आम्हाला सरकारने भट्टीमागे १० लाखांचं अनुदान द्यावं, आम्ही एका मिनिटात तंबाखूचं उत्पादन थांबवू. २०१० मध्ये तंबाखूच्या भट्ट्यांमध्ये काम करण्यासाठी बाहेरगावहून मजुरांच्या ३३ टोळ्या आल्या होत्या. या वर्षी १० टोळ्यादेखील दिसत नाहीयेत.”
या सगळ्यामुळे प्रकासमचे तंबाखू शेतकरी आता अशा पर्यायी पिकांच्या शोधात आहेत जी फायदेशीर ठरतील आणि थोड्या पाण्यावर येतील. मी मुगा चिंतला गावी गेलो होतो तेव्हा सुब्बा राव त्यांच्या स्मार्टफोनवर इतर शेतकऱ्यांना लाखेचं पीक घेण्याबद्दलचा एक यूट्यूबवरचा व्हिडिओ दाखवत होते. “आपण आपल्या गावात हे पीक घेऊन पाहिलं पाहिजे,” ते म्हणतात. बाकीचे मान डोलावतात आणि या पिकाबद्दल अजून माहिती विचारतात. “श्रीकाकुलम जिल्ह्यात आणि ओदिशाच्या काही भागात हे पीक घेतलं जातं आणि त्याला फारसं पाणीदेखील लागत नाही,” ते सगळ्यांना समजावून सांगतात.
या दरम्यान, दिल्लीमध्ये रिक्षांच्या मागे आणि बसस्थानकांवर ‘आमच्या उपजीविका वाचवा’ (Protect Our Livelihood) असं लिहिलेली पत्रकं-पोस्टर्स दिसू लागली आहेत. या पोस्टरवर ‘अखिल भारतीय पान विक्रेता संगठन’ या तंबाखू विक्रेत्या संघटनेचं नाव आणि मुद्रा दिसतीये. मी जेव्हा शेतकऱ्यांना या आंदोलनाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी तंबाखू कंपन्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. मग सुब्बा राव म्हणाले, “बाकी सोडा, शेतकरी जर का एकत्र आले असते, सिंचनाच्या सोयींसाठी किंवा सिगारेट कंपन्यांविरोधात भांडले असते, तर आमची स्थिती कदाचित आज याहून बरी असती.”
सहलेखकासह, पूर्वप्रसिद्धी – द हिंदू बिझनेसलाइन, २ फेब्रुवारी, २०१८
अनुवादः मेधा काळे