“शाळेत एकदाच वाढतात. परत द्यायला पाहिजे.”
तेलंगणाच्या सेरिलिंगमपल्ली मंडलातल्या मंडल परिषद प्राथमिक विद्यालयात शिकणारा सात वर्षांचा बसवराजू म्हणतो. देशभरातल्या एकूण ११.२ लाख शाळांमध्ये मुलांना दुपारी ताजा गरम आहार दिला जातो. रंगा रेड्डी जिल्ह्यातली ही शाळा त्यातलीच एक. बसवराजूच्या वर्गात शिकणारी १० वर्षांची अंबिका आणि इतरही बरीच मुलं शाळेत येण्याआधी फक्त एक पेलाभर गंजी म्हणजेच भाताची पेज पिऊन येतात. त्यांचं दिवसाचं पहिलं खाणं म्हणजे शाळेतला आहार.
देशाच्या पोषण आहार योजनेअंतर्गत शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळा, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शिक्षण केंद्रांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीमधल्या ११ कोटी ८० लाख मुलांना पोषण आहार मिळतो. पोट भरलेलं असलं तर मुलं पटपट गणितं सोडवतील किंवा त्यांना इंग्रजी स्पेलिंग तोंडपाठ होतील असा कुणाचाही दावा नाही. शाळेत जेवण मिळालं तर मुलं शाळेत येतील हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. (भारतात औपचारिक शिक्षण व्यवस्थेबाहेर असणाऱ्या मुलं आणि तरुणांचा आकडा तब्बल १५ कोटीअसल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात.)
राजस्थानच्या भिलवारा जिल्ह्यातल्या जोधगढ गावात राजकीय प्राथमिक विद्यालय या शाळेत शिकणारा दहा वर्षांचा दक्ष भट्ट शाळेत फक्त बिस्किटं खाऊन आला होता. तिथून हजारो किलोमीटर दूर आसामच्या नलबारी जिल्ह्यात अलिषा बेगम सांगते की ती सकाळी कोरा चहा आणि चपाती खाऊन आलीये. ती निझ खागाता एलपी शाळा क्र. ८५८ मध्ये शिकते. तिचे वडील फेरीवाले आहेत आणि आई घरचं सगळं पाहते.


































