२४ फेब्रुवारी २०१८, सकाळी ७.३० वाजता ४३ वर्षीय पाण्डी वेंकय्यांनी पेनुगोलानु गावातल्या आपल्या रानात कीटकनाशक पिऊन घेतलं. ते तेव्हा एकटेच होते, बाकी मंडळी घरीच होती. ९ वाजण्याच्या सुमारास इतर काही शेतकऱ्यांना रानात त्यांचा मृतदेह सापडला.
वेंकय्यांचा कर्जाचा बोजा वाढत वाढत १७ लाखांवर गेला होता कारण एकट्या २०१६ च्या हंगामातच त्यांचं १० लाखांचं नुकसान झालं होतं. त्यांची स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन आहे आहे आणि वर्षाला एकरी ३०,००० खंडाने ते आणखी ७ एकर कसत होते. सप्टेंबर २०१६ मध्ये त्यांनी चार एकरावर एक लाखाची मिरची लावली आणि बाकी चार एकरावर कपास. “त्यांनी शेतीत १० लाख घातले होते,” त्यांच्या पत्नी, ३५ वर्षीय सीता सांगतात. काही कर्ज खाजगी सावकाराकडचं होतं तर काही सीताच्या बँकेत ठेवलेल्या थोड्याफार दागिन्यांवर काढलं होतं.
जिल्हाधिकारी कार्यालयातली कागदपत्रं पाहता असं दिसतं की डिसेंबर २०१६ पर्यंत पेनुगोलानु गावातल्या ८७ शेतकऱ्यांना आपलं मिरचीचं पीक वाया गेलं आहे हे कळून चुकलं होतं. पेनुगोलानु आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याच्या गम्पालगुडे मंडलात मोडतं. त्यांनी सर्वांनी दोन स्थानिक नर्सरींमधून बी घेतलं होतं. “[एकूण] १६२ एकरावरचं मिरचीचं पीक आलंच नाही. सगळी गुंतवणूक आणि कष्ट पाण्यात गेले,” २६ वर्षीय वड्डेरपू तिरुपती राव सांगतो.










