बिहारच्या उत्तरेकडच्या सहरसा जिल्ह्याच्या सखल भागातल्या रहिवासी सातत्याने येणाऱ्या पुराशी ताळमेळ साधत शेती करत आहेत – उन्हाळ्यात येणाऱ्या भाताचं वाण गरमा धान घेऊन. हे वाण पूर्वापारपणे सखल भागांमध्ये, नद्यांच्या खोऱ्यात जिथे पावसाळ्याचं पाणी साचून राहतं आणि त्याचा निचरा होत नाही अशा भागात घेतलं जातं.
बांध बंदिस्ती करून पुराचं पाणी साचलेल्या जमिनीची उत्पादकता वाढावी या उद्देशाने शेतकऱ्यांनी उन्हाळी भाताच्या या वाणाला पसंती दिली कारण त्याचा उतारा जास्त पडतो. गरमा धान फेब्रुवारीत पेरतात आणि मे महिन्यामध्ये पीक कापणीला येतं. रानात काही नसतं तेव्हा घरात खायला दाणा आणि हातात पैसा दोन्हीची बेगमी होते.





