हातकणंगले तालुक्यातल्या खोची गावात आता आतापर्यंत एक वेगळीच चढाओढ असायची. एका एकरात सर्वात जास्त ऊस कोण काढू शकतो अशी ही चढाओढ. गावातले शेतकरी सांगतात की गेल्या ६० वर्षांपासून हे असंच सुरू होतं. आणि खेळीमेळीच्या या चढाओढीत सगळ्यांचाच फायदा होत होता. काही शेतकऱ्यांनी तर एकरी ८० ते १०० टन ऊस काढलाय. सर्वसाधारण उत्पादनापेक्षा दीडपट जास्त.
पण २०१९ साली ऑगस्ट महिन्यात या सगळ्याला खीळ बसली. जवळपास १० दिवस हे गाव पुराच्या पाण्याखाली होतं आणि शिवारातला बहुतेक सगळा ऊस पाण्यात सडून गेला होता. दोन वर्षांनंतर २०२१ साली जुलै महिन्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला, पूर आला आणि खोचीतल्या ऊसपिकाचं आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं.
“आताशा शेतकरी चढाओढ करीना गेलेत. लावलेल्या उसातला अर्धा जरी हातात आला तरी नशीब समजावं अशी स्थिती आहे,” ४२ वर्षीय गीता पाटील खोचीत खंडाने शेती करतात. एके काळी गीतांना वाटायचं की उसाचं उत्पादन वाढवण्याचे सगळे उपाय त्या शिकल्या आहेत. पण गेल्या दोन पुरांमध्ये त्यांचा किमान ८८० टन ऊस पाण्यात गेलाय. “काही तरी बिघडलंय.” वातावरणातले बदल त्यांच्या ध्यानात येतायत अजून.
“तेव्हापासून [२०१९ च्या पुरापासून] पावसाचं सगळं ताळतंत्रच बदलून गेलंय,” त्या सांगतात. २०१९ सालापर्यंत त्यांचं सगळं वेळापत्रक ठरलेलं होतं. रानातला ऊस निघाला की ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या आसपास त्या दुसरी पिकं घ्यायच्या – सोयाबीन, भुईमूग, साळी, शाळू किंवा बाजरी. यामुळे मातीचा कस टिकून रहायचा. त्यांचं आयुष्याचं चक्र असं नीट ठरलेलं होतं. नेमाने सगळ्या गोष्टी होत होत्या. पण आता मात्र तसं काहीच होत नाही.
“यंदा [२०२२] पाऊस एक महिना उशीराने सुरू झाला. बरं सुरू झाला, तर एका महिन्यात शेतात पुराचं पाणी भरलं.” ऑगस्ट महिन्यात इतका जोराचा पाऊस झाला की जवळपास दोन आठवडे शेतं पाण्याखाली होती. ज्यांनी नुकताच ऊस लावला होता त्यांचं प्रचंड नुकसान झालं. पाणी आणखी वाढलं तर गाव सोडून जावं लागेल आणि यासाठी तयार राहण्याचं आवाहन पंचायतीला करावं लागलं होतं.



















