हातण्याच्या सरकारी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशदारासमोर एक रिक्षा उभी आहे. आतमध्ये एक बाई शुद्धीवर असते, मध्येच तिची शुद्ध हरपते. दुसरी एक जण ऊर बडवून घेत ओरडतीयेः माझा सोन्या, माझ्या सोन्या, कुठे गेला रे माझा सोन्या? चारी दिशांमधून रडण्याचे आवाज येतायत. काही कुटुंबातली लोक एकत्र येऊन कागदपत्रांची कामं करतायत. काही जण जण दुसऱ्या दवाखान्यात खाटा मिळतायत का याच्या खटपटीत आहेत.
मेची सुरुवात आहे. सोमवारची तप्त दुपारची वेळ. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातल्या हातणे गावात रवेरा हॉस्पिटलच्या बाहेर नुसता गोंधळ उडालाय.
गुरू चौधरी हॉस्पिटलच्या आवाराबाहेर एका झाडाखाली सिमेंटच्या पारावर बसले आहेत आणि एका पाठोपाठ एक फोन करतायत. त्यांचे मेहुणे वारले त्याची बातमी देतायत. “देवाला प्रिय झाला काल रात्री,” एकच वाक्य ते फोनवर सांगत राहतात. “मला भावासारखा होता,” दुःखी, उद्विग्न गुरू मला सांगतात. “हा व्हिडिओ पहा. चांगला होता. माझी बहीण आत दवाखान्यातच होती. त्यांचा ऑक्सिजन त्या बाटलीतून गळत होता... ती सारखी डॉक्टरांना सांगत होती की येऊन बघा म्हणून...”
गुरूंचे मेहुणे, ३५ वर्षीय वामन दिघांना २३ एप्रिल रोजी त्यांच्या गावाजवळ असलेल्या दोन छोट्या दवाखान्यात नेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना इथे रवेरा मध्ये आणलं. “त्यांना नीट श्वास घेता येत नव्हता. काही दिवस खूप ताप पण होता, म्हणून आम्ही घाबरून गेलो आणि तपासून आणलं,” गुरू सांगतात. “डॉक्टर म्हणाले की त्यांना न्यूमोनिया झालाय आणि कदाचित कोविड पण असेल आणि त्यांना लगेच ॲडमिट करायला पाहिजे. जवळच्या हॉस्पिटलमध्ये बेड पण नव्हते आणि ऑक्सिजन पण.”
मोखाडा तालुक्यातल्या आपल्या गावाहून, ताकपाड्यावरून रुग्णवाहिकेतून त्यांना विक्रमगड तालुक्यातल्या शासकीय रवेरा रुग्णालयात आणलं. या तालुक्यातलं २०० खाटा असलेलं हे एकमेव डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे. (यातल्या निम्म्या खाटा विलगीकरणासाठी आहेत. उरलेल्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागात आहेत. जिल्हा प्रशानाच्या वेबसाइटवर याबद्दलची माहिती स्पष्ट नाही).
“कोविडची तपासणी तीनदा निगेटिव्ह आली तरी त्याला कोविड वॉर्डात ठेवलं होतं. गाद्यांवर चादरी नाहीत, उशा नाहीत. गरम पाणी देखील नव्हतं. तो १० दिवस त्या वॉर्डात होता. तो गेला त्याच्या आदल्या दिवशी त्याची लघवी थांबली होती. अचानक तब्येत खराब झाली. माझी बहीण डॉक्टरांना सांगायचा प्रयत्न करत होती, पण सगळे घाईत होते आणि त्यांनी काय ऐकलं नाय,” गुरू सांगतात.
वामन ताकपाड्याच्या पंचायतीच्या कचेरीत कामाला होते. ठाकूर आदिवासी असणाऱ्या दिघांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, ३१ वर्षीय मालती दिघा आणि ८ आणि ६ वर्षांची दोघं मुलं आहेत. मालती आपल्या सासू-सासऱ्यांसोबत त्यांच्या दोन एकर शेतात भाजीपाला, नाचणी आणि भात पिकवतात. “मी डॉक्टरांना बोलवून थकून गेले. ऑक्सिजन लावला होता, तरी त्यांना श्वास घेता येत नव्हता. आत इतकी घाण होती. त्यांना चांगले उपचार मिळाले असते तर ते वाचले असते, पण आमचा माणूस गेला,” मालती रडत रडत सांगतात.
पण हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक मला सांगतातः “पेशंटचे नातेवाईक काही पण सांगतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आत काय घडतं ते त्यांना माहित नसतं.”
हॉस्पिटलच्या बाहेर एका कोपऱ्यात मीना पागींनी जमिनीवर अंग लोटून दिलंय. काही जण त्यांना उठवायचा प्रयत्न करतायत. त्या उठायचा प्रयत्न करतात, पण उठू शकत नाहीत. काही वेळाने त्या उठून बसतात, स्तब्ध. “आज सकाळपासून ती हललीच नाहीये. तिचा नवरा वारला आणि आता चार मुलींचं बघायला ती एकटीच मागे राहिलीये,” शेतकरी असणारे आणि त्यांच्या कुटुंबाचे जवळचे मित्र असलेले शिवराम मुकणे सांगतात.
१ मे रोजी ४८ वर्षीय मंगेश आणि ४५ वर्षांच्या मीना रवेरा हॉस्पिटलला आल्या. मंगेश यांच्या छातीत खूप दुखायला लागलं म्हणून त्यांना रुग्णवाहिकेतून इथे आणण्यात आलं. शिवराम सांगतात की त्याच दिवशी विक्रमगड तालुक्यातल्या आपल्या खोस्ते गावाहून १५ किलोमीटर गाडी चालवत मंगेश आणि त्यांच्या सोबत मीना विक्रमगड शहरातल्या एका दवाखान्यात पोचले होते. तोपर्यंत त्यांना ताप चढला होता आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. दोन दिवसांनी, ३ मे रोजी मंगेश यांचा जीव गेला.
“दवाखान्यातल्या डॉक्टरांनी त्यांना रवेरा मध्ये ॲडमिट करायला सांगितलं. त्यांनी पत्र दिलं आणि अँब्युलन्सची सोय केली. त्यानंतर किती तरी तास उलटल्यावर त्यांना रवेरात एक बेड मिळाला,” शिवराम सांगतात. “त्याच्या बायकोने मला कळवलं की त्यांना ऑक्सिजन लावला आणि त्यानंतर त्याला बरं वाटलं. मग डॉक्टरांनी त्याची एक तपासणी केली आणि त्याला कोविड सेंटरमध्ये हलवलं. तिथे त्यांनी त्याला दोन दिवसात १०-१२ इंजेक्शन दिले. दर वेळी इंजेक्शन दिलं की त्याची तब्येत जास्तच खराब व्हायची. आम्ही त्याला दुसरीकडे हलवायचं बघत होतो. पण [३ मेच्या] मध्यरात्रीनंतर त्याची तब्येत जास्तच बिघडली आणि त्यांनी त्याला आयसीयूत हलवलं. दोन तासातच डॉक्टरांनी त्याच्या बायकोला सांगितलं की तो गेला म्हणून.”
मी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.
मंगेश पागींच्या मागे त्यांचं सात जणांचं कुटुंब आहे – त्यांचे आई-वडील, मीना, अनुक्रमे १९, १७, ११ आणि ७ वर्षे वय असणाऱ्या चौघी मुली. आपल्या एक एकर शेतात भात, गहू आणि बाजरीचं पीक घेऊन ते घर चालवत होते. हे कातकरी कुटुंब आहे आणि आता सगळी भिस्त मीनांच्या कमाईवर आहे. त्या आसपासच्या रानात १५०-२०० रुपये रोजाने मजुरी करतात. “आमच्या गावात [महामारीच्या निर्बंधांमुळे] गेली दोन महिने कामंच मिळत नाहीयेत. आधीसुद्धा पैशाची चणचण असायचीच. आता तर ते कसं भागवतील कळत नाही,” शिवराम म्हणतात.
वामन आणि मंगेश यांना किमान दवाखान्यात खाट तरी मिळाली. श्याम माडीला वेळेत तीही मिळाली नाही. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रमगड तालुक्यातल्या यशवंतनगर गावच्या २८ वर्षीय श्याम याला ताप चढला. “आम्ही त्याला गावातल्या दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे त्याला औषधं दिली आणि त्याला बरं वाटायला लागलं. डॉक्टरांनी काही तपासण्या करायला सांगितल्या. पण गावात एकच पॅथॉलॉजी आहे ती बंद होती. एक दोन दिवस गेले आणि रात्री वाजता त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला,” २६ एप्रिलच्या रात्री आपल्या मेव्हण्याला काय झालं ते महेश मोरगा सांगतात.
“सुरुवातीला आम्ही त्याला [विक्रमगडमधल्या] दुसऱ्या सरकारी दवाखान्यात नेलं. तिथे त्यांनी आम्हाला त्याला कोविड सेंटरला न्या असं सांगितलं. त्याला श्वास घेता येत नव्हता. आम्ही खाजगी दवाखान्याची अँब्युलन्स बोलावली. गाडीत ऑक्सिजनची थोडी सोय होती. पण आम्हाला रवेरामध्ये बेड मिळाला नाही. आम्ही त्यांना किती विनंत्या केल्या, पण डॉक्टर म्हणाले की जागाच नाहीये,” महेश सांगतात. सकाळी आठ वाजल्यापासून ते रवेरामध्ये बेड मिळावा म्हणून धडपड करत होते.
पालघर जिल्ह्याचे आठ तालुके आहेत – डहाणू, जव्हार, मोखाडा, पालघर, तलासरी, वसई, विक्रमगड आणि वाडा. जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखाच्या आसपास असून हातण्यातलं रवेरा धरून इथे १२ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहेत. या सगळ्यांमध्ये मिळून २,२८४ विलगीकरण बेड, ५९९ प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची सोय असलेल्या खाटा, ४२ अतिदक्षता आणि ७५ व्हेंटिलेटर असलेल्या खाटा आहेत. १२ मे रोजी विलगीकरणाच्या खाटांपैकी जवळपास निम्म्या आणि ७३ प्राणवायू खाटा रिकाम्या होत्या असं जिल्ह्याच्या वेबसाइटवरून लक्षात येतं. अतिदक्षता विभागात एक आणि व्हेंटिलेटरची सोय असणाऱ्या तीन खाटा त्या दिवशी उपलब्ध असल्याचं दिसतं.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख (९९,५३९) कोविडरुग्णांची नोंद झाली असून १,७९२ मृत्यू झाले आहेत.
श्यामसाठी बेड मिळवण्याच्या धडपडीत श्यामचे दुसरे मेहुणे, पंकज पाटकर यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वाडा शहरातून ऑक्सिजनचा सिलेंडर मिळवला. “अँब्युलन्समधला ऑक्सिजन संपतच आला होता, तेवढ्यात आम्ही दुसरा सिलिंडर घेऊन तिथे पोचलो,” पंकज मला फोनवर सांगतात. “आम्ही त्याला [४० किलोमीटरवरच्या] बोइसरच्या कोविड सेंटरला घेऊन गेलो. तिथे त्यांनी सीटी स्कॅन पण केला, पण तिथेही त्याला बेड मिळाला नाही. आम्ही भिवंडी, ठाण्यात जिथे मिळेल तिथे बेड शोधण्याचा प्रयत्न केला.” विक्रमगडपासून ही शहरं १०० किलोमीटरच्या परीघात आहेत.
“आम्हाला काही यश आलं नाही आणि आम्ही परत त्याला रवेराला घेऊन गेलो,” पंकज सांगतात. परत एकदा रवेरामध्ये बेड मिळतो का पहायला ते आले तोवर दुपारचे ३ वाजले होते. बेडसाठी पहिल्यांदा त्यांचा शोध सुरू झाला त्याला सात तास उलटले होते. अँब्युलन्सचा ८,००० रुपये खर्च भागवण्यासाठी त्यांनी नातेवाइकांकडून पैसे उसने घेतले आहेत. हे कुटुंब ठाकूर आदिवासी आहे.
“आम्ही त्याला ॲडमिट करून घ्या म्हणून विनवत होतो, तेव्हाच त्याने दम तोडला,” पंकज सांगतात.
“त्याला श्वास घेता येत नव्हता,” श्यामची बहीण सुमित्रा सांगतात. “त्याला हॉस्पिटलपर्यंत नेलं पण कुठेच त्याला बेड मिळाला नाही. त्याला कुणी ऑक्सिजन दिला नाही. माझ्या भावाला श्वास घेता आला नाही. त्याच्या बायकोने किती तरी दिवस अन्नाला स्पर्श केला नाहीये. जा, तिच्याकडे बघा. ती धक्क्यातून बाहेरच आली नाहीये.”
श्याम गावातल्याच एका ऑटोमोटिव्ह कंपनीत कामाला होता आणि दोनच महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. यशवंतनगरमध्येच आपल्या माहेरी परत आलेली २४ वर्षीय रुपाली घराच्या ओसरीत एका गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या खुर्चीत बसून राहिलीये. तिची बहीण तिची काळजी घेतीये आणि ती घेरी येऊन पडणार नाही ना ते पाहतीये. तिचा नवरा गेला तेव्हापासून तिने काहीच खाल्लेलं नाही. ती म्हणते, “आम्ही ऑक्सिजनसाठी त्यांच्या पाया पडलो, विनवण्या केल्या. त्याला दुसरं काही नाही, ऑक्सिजन पाहिजे होता. तुम्हाला काही झालं तर तुमच्या मुंबईत शहरात मोठी हॉस्पिटल आहेत. पण इथे खेड्यात लोकांना ऑक्सिजन कोण पुरवणार?”
अनुवादः मेधा काळे