“गावातलं आरडतात, आमच्या दारात यायचं नाय सांगतात. ते म्हनले कुटली बीमारी आलीय. काय बीमारी कोन नाय सांगत. मला काय आजार नाय. का म्हनून अडवतात मग?”
फासे पारधी समाजातल्या गीताबाई काळेंच्या पोटात अन्नाचा कण गेला त्याला आता आठवडा उलटलाय. एरवीही ७८ वर्षांच्या गीताबाईंचं पोट भिकेवरच भरतं. लॉकडाऊनमध्ये तो मार्गही आता बंद झालाय. त्यांना कोव्हिड-१९ हा काय आजार आहे याची काहीच कल्पना नाही, त्यांना आणि इतर पारध्यांना त्याची झळ मात्र भासत आहे –तेही उपाशी पोटी.
२५ मार्चला बाजरीच्या शिळ्या भाकरी आणून दिल्या होत्या ते त्यांचं शेवटचं खाणं. “त्ये कोनी मुलं आली व्हती– नवीन व्हती – इतवारला आलेली [रविवारी मार्च २२], चार भाकऱ्या देउन गेली. चार दिस खाल्ली तीच.” तेव्हापासून त्या त्यांची भूक मारत आहेत. “नंतर कोन आलं नाय. गावातले पन घेत नायत मला.”
गीताबाई महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधल्या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एका पत्र्याच्या झोपडीत राहतात. दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चव्हाणवाडी गावात त्या भीक मागायला जातात. “लोकं काय शिळ-उरलंसुरलं देतात. तेच खातो आमी लोक,” त्या सांगतात. “कोन तरी म्हनलं सरकार फुकट धान्य देतंय पन राशन कार्ड पायजे. माझ्याकडे तर नाय.”
अनुसूचीत जमात म्हणून नोंद असलेल्या फासे पारधींची परिस्थिती, पारधी जमातीतल्या इतर गरीब आणि वंचित पोट-जमातींपेक्षाही अत्यंत वाईट आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही, ब्रिटीशकालीन अन्नाय्य आणि क्रूर कायद्याचं ओझं ते आजही वाहतायत. ब्रिटिशांनी त्यांच्या वर्चस्वाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि त्यांना आव्हान देणाऱ्या अनेक आदिवासी आणि भटक्या विमुक्तांना शिक्षा करण्यासाठी, जवळपास २०० जमातींना जन्मत: गुन्हेगार घोषित करत, १८७१ साली गुन्हेगार जमात कायदा लागू केला. या जमातींवर याचा घोर परिणाम होऊन त्या उद्ध्वस्त झाल्या आणि उर्वरित समाजापासूनही त्या तुटल्या.
स्वतंत्र भारतात १९५२ साली सरकारनं हा कायदा रद्द केला आणि ‘गुन्हेगार जमातींची’ यादी ‘विमुक्त’ केली. पण आजतगायत लोकांमध्ये या जमातींविषयी गैरसमज, पूर्वग्रह, जाचक वागणूक कायम आहे. या समाजातल्या अनेकांना आजही गावात प्रवेश करणं किंवा विहिरीतून पाणी घेणं अगदी अशक्य आहे. बहुतेक वेळा ते गावापासून २-३ किलोमीटर दूर वेगळ्या वस्त्यांमध्ये राहतात. त्यांना नोकरी मिळणं कठीण असतं, शिक्षणाचं प्रमाण नगण्य आहे, तर अनेकांना क्षुल्लक गुन्ह्यांच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं गेलंय. त्यामुळे उपजिविकेसाठी बहुतेकांना भीक मागण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही राहत.





