हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.
“कुनाला सांगितलं तर लोक मला येडा म्हणतील,” आपल्या दगड मातीच्या घरात सारवलेल्या जमिनीवर बसलेले ५३ वर्षांचे ज्ञानू खरात सांगतात. “३०-४० वर्षांपूर्वी पावसाळ्यात पाणी इतकं व्हायचं की [जवळच्या ओढ्यातून] आमच्या रानानी निस्ते माशे यायचे. माझ्या हातानं माशे धरलेत मी.”
जून महिन्याचा दुसरा आठवडा आहे. आम्ही पोचलो त्याच्या थोडंच आधी खरात वस्तीत खरातांच्या घरी ५,००० लिटरचा टँकर आलाय. ज्ञानूभाऊ, त्यांच्या पत्नी फुलाबाई आणि १२ जणांच्या एकत्र कुटुंबातले बरेच जण घरातल्या सगळ्या टाक्या, भांडी, हंडे भरतायत.
“काय सांगू, ५०-६० वर्षांखाली असा पाऊस व्हायचा, अशी झड लागायची, डोळा उघडू द्यायचा नाही,” गौडवाडीच्या ७५ वर्षांच्या गंगुबाई गुळीग सांगतात. सांगोल्यातल्या ६०९ उंबरा असलेल्या गौडवाडीच्या मळ्यातल्या आपल्या घरात जिवापाड जपलेल्या चार लिंबांच्या सावलीत गंगुबाई विसाव्याला बसल्या आहेत. “तुमी येताना त्या बाभळी लागल्या का, ती सगळी रानं मटक्यांची आहेत. एक नंबर मटक्या व्हायच्या. मुरमाड जमीन, जमिनीतून पाझर फुटून पाणी वाहायला लागायचं, असला पाऊसकाळ होता. निसते एकरात चार तास काढले तर पाच पोती बाजरी होत होती. असल्या जमिनी होत्या,” गंगुबाई सांगतात.
आणि ऐंशी वय पार केलेल्या हौसाबाई अलदरांना अलदर वस्तीवरच्या त्यांच्या सासऱ्याच्या रानातल्या जोड विहिरी आठवतात. “पूर्वीचा पाऊसकाळ काय सांगायचा? दोन्ही विहिरींवर दोन-दोन मोटा. चारी मोटा एका वेळी चालायच्या एवढं पाणी होतं विहिरींना. कोणत्याही वेळी माणूस येऊ द्या, त्याला सासरा मोट चालवून पाणी द्यायचा. आता कुणाला हंडाभर पाणी मागायची देखील मुश्किल झाली आहे. पान फिरलं, उपारतं झालं.”













