सकाळचे ११ वाजलेत. किल्लाबंदर गावात शिरता शिरताच जी विहीर आहे तिथे सुमारे २० मुली आणि बाया जमल्या आहेत. “विहिरीच्या तळाला कोपऱ्यात थोडंफार पाणी आहे [उन्हाळा आहे]. एक कळशी भरायला अर्धा तास लागतो,” किल्लाबंदरची रहिवासी असणारी नीलम मानभात सांगते. मुंबई शहराच्या उत्तरेला वसईच्या किल्ल्याला लागून असणारं किल्लाबंदर मच्छिमारांचं गाव आहे.
विहिरीपाशी गोळा झालेल्या मुली आणि बायांसाठी तास न् तास पाण्याच्या रांगेत घालवणं नित्याचंच झालं आहे. काही तर अगदी चार वर्षाच्या चिमुकल्या आहेत. सार्वजनिक जागेवरची विहीर हाच काय तो गावाच्या जवळ असणारा पाण्याचा स्रोत. बायांच्या सांगण्याप्रमाणे, नगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा पुरेसाही नाही आणि भरवशाचा तर नाहीच. किल्लाबंदरची बरीच कुटुंबं याच विहीरीवर अवलंबून असल्यामुळे तिचं पाणीही पुरेनासं झालंय, खास करून उन्हाळ्यात. या मुली आणि बायांना विहिरीचा तळ अक्षरशः खरवडून पाणी भरावं लागतं.
पालघर जिल्ह्यातला वसई तालुका ६०० चौ.कि.मी च्या क्षेत्रावर पसरला आहे आणि या वसई शहराची लोकसंख्या सुमारे १३ लाख आहे (जनगणना, २०१३). खरं तर वसई विरार नगरपालिकेने या दोन्ही शहरांना आणि शंभरहून अधिक गाव-पाड्यांना पुरेसा पाणी पुरवठा केला पाहिजे. पण तसं होत नाही.
ते अजूनही पाण्यासाठी विहिरी आणि टँकरवर अवलंबून आहेत, आणि पालघरचं पाणी मात्र मुंबई महानगराला वळवण्यात आलं आहे ही बाब किल्लाबंदरवासीयांना काही रुचलेली नाही. “तिला काही हे असं सगळं करावं लागत नाय,” प्रिया घाट्या माझ्याकडे बोट दाखवत दुसऱ्या एका बाईला म्हणते. मग माझ्याकडे होरा वळवत ती मला विचारते, “तुझ्याकडे मशीन असणार (कपडे धुवायला). तुला हे सगळं कशाला करायला लागेल? पाणी आम्हाला नाय, तुम्हाला मिळतं.”
१०९ एकरावर पसरलेल्या वसई किल्ल्यात आणि आसपासच्या परिसरात ७५ हून अधिक विहिरी आहेत. “यातल्या बहुतेक सगळ्या बंद आहेत,” भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संवर्धन सहाय्यक म्हणून काम करणारे कैलाश शिंदे सांगतात. “फक्त ५-६ विहिरी चालू आहेत.”







