"काही वर्षांपूर्वी सारं काही वेगळं होतं," नियाझ अहमद म्हणतात. ते श्रीनगर मधील लाल चौकात त्यांच्या दुकानात बसले आहेत. पश्मिना शालीला प्रचंड मागणी होती, आणि नियाझ व इतर दुकानदार भारतभर आणि विदेशातही शाली विकून नफा कमावत होते.
ही फेब्रुवारी २०१६ मधील गोष्ट आहे, जेंव्हा मी चांगथांगी शेळ्यांपासून येथील विक्रेत्यांपर्यंतचा पश्मिना शालीचा प्रवास पाहायला सुरुवात केली होती; मला भारत आणि मध्य आशियाला जोडणाऱ्या प्राचीन भारतीय व्यापारी मार्गांच्या इतिहासात रस आहे. या मार्गे पश्मिना आणि रेशीम या मौल्यवान मालाची वाहतूक होत असे.
पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेलगत तिबेटी पठाराच्या पश्चिम विस्तारावर चांगथांग भागात राहणारे चांगपा गुराखी चांगथांगी शेळ्या पाळतात. ४,००० ते ५,००० मीटर उंचीवर वसलेल्या या भागात राहणं कठीण आहे. आपल्या जितराबासाठी - मेंढ्या, पश्मिना शेळ्या आणि काही याक - कुरण शोधणं आणि सप्टेंबर ते मे दरम्यान पडणारी कडाक्याची थंडी यांमुळे इथे राहणं अवघड होऊन बसतं. दिवसभरात इंधन गोळा करणं, मुलांचं संगोपन, स्वयंपाक, पश्मिना धागा कातणं, अशी कामं करावी लागतात.
प्रत्येक चांगपा कुटुंबाकडे किमान ८०-१०० जितराब असतं. बहुतांश लोकांकडे १००-१५० असतात, काहींकडे तर ३०० च्याही वर असतात; सहसा शेळ्या आणि मेंढ्या सम प्रमाणात. दरवर्षी एका चांगथांगी शेळीपासून त्यांना २००-३०० ग्राम पश्मिना लोकर मिळू शकते.
मार्च २०१६ मध्ये एका थंडगार सकाळी मला बेन्सन त्सेरिंग भेटले. ते आपला कळप चांगथांगच्या आग्नेय भागात - हानले आणि चुमूर या नगरांच्या मध्ये - घेऊन चालले होते. त्यांनी मला सांगितलं की लेहमधील एक सहकारी पतसंस्था - अखिल चांगथांग पश्मिना उत्पादक सहकारी व्यापार पतसंस्था, जी शासकीय लडाख पर्वतीय विकास परिषदेला संलग्न आहे, थेट गुराख्यांकडून कच्ची पश्मिना विकत घेते, याने मध्यस्थ लोकांचा - जे योग्य भाव लावत नसत - पूर्वीचा कारभार संपुष्टात आला. पतसंस्था आता किलोभर कच्च्या पश्मिनाकरिता रु. २,५०० ते रू. २,७०० देते. मागणी रोडावल्यामुळे गेल्या ४-५ वर्षांत या दरात वाढ झाली नाहीये. पंजाब आणि आसपासच्या राज्यांतील बाजारात बिगर-पश्मिना शाली आणि लोकरी कपड्यांना उधाण आल्याने या व्यापाराला फटका बसला आहे.
हानले पासून सुमारे ४० किमी दूर मी पेमा चोकेत यांना देखील भेटलो. पेमा यांच्या ६ मुलांपैकी फक्त त्यांची थोरली मुलगी, २३ वर्षीय देचेन हिलाच याप्रकारचं आयुष्य जगायचं आहे. "तीच आमची वसा पुढे नेईल," पेमा म्हणाल्या, पुढे त्या असंही म्हणाल्या की तिचं जनावरांवर आणि पशुपालकाच्या आयुष्यावरच फार प्रेम आहे.






















