ते इथवर आले. त्यांनी मोर्चा काढला. त्यांनी घोषणाही दिल्या. देशाच्या संसदेच्या अगदी उंबऱ्यावर. राजकीय नेत्यांना येऊन त्यांचं म्हणणं ऐकायला त्यांनी भाग पाडलं. आणि मग, ते परतले. ताठ मानेने.
पण हे सोपं नव्हतं. ३० नोव्हेंबरच्या सकाळी तारा देवी जाग्या झाल्या तेव्हा त्यांची हाडं कुरकुरत होती. “खुल्या मैदानात [रामलीला मैदान] जमिनीवर झोपल्यामुळे माझं सगळं अंग ताठरलंय,” त्या म्हणतात. आणि त्या आधी त्यांनी वाराणसी ते दिल्ली असा १४ तासांचा प्रवास केलाय. “माझे गरम कपडे फाटलेत. आणि माझ्यापाशी जाड कांबळदेखील नाही,” त्या म्हणतात. सकाळी ८ वाजता स्वयंसेवकांनी नाश्त्यासाठी दिलेली खिचडी खाल्ल्यानंतर त्यांनी सर्वात जास्त मागणी असलेला स्टॉल गाठला – डॉक्टरांचा. सेवाभावी डॉक्टरांचा हा गट येणाऱ्या प्रत्येकाच्या दुखण्यावर इलाज करतोय.
मध्य दिल्लीतल्या रामलीला मैदानातल्या हजारो शेतकऱ्यांपैकी अनेकांनी डॉक्टरांकडून तपासून गोळ्या औषधं घेतली आहेत. २८ नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा तिथे उभारलेल्या मंडपात वीज नव्हती, काही शेतकऱ्यांनी दोन मोटरसायकल तिथे उभ्या केल्या आणि त्याचे दिवे सुरू ठेवून उजेड केला. “यातल्या बहुतेकांना सर्दी, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होतोय,” समोरच्या शेतकऱ्यावरून नजरही न हटवता डॉ. के के मित्तल सांगतात. “त्यांच्या खुल्या रानांमधून ते दिल्लीच्या या प्रदूषित हवेमध्ये आलेत.”










