“आंदोलनाने मला शिकवलं की पुढे कसं जायचं आणि आपली लढाई कशी लढायची. आम्हाला आता मान मिळालाय.” यातल्या 'आम्ही' म्हणजे सप्टेंबर २०२० मध्ये पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात लढा पुकारलेल्या ४९ वर्षीय राजिंदर कौर यांच्यासारख्या असंख्य महिला. पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातल्या राजिंदर २२० किलोमीटर अंतर पार करून किती तरी वेळा सिंघु सीमेवर गेल्या आणि तिथे त्यांनी भाषणंही केली.
दौन कलां या त्यांच्या गावी शेजारीच राहणाऱ्या ५० वर्षीय हरजीत कौर २०५ दिवस दिल्ली-हरयाणा सीमेवरच्या सिंघुमध्ये राहिल्या. “पोटासाठी मी काही पिकवलं नाही असं कधी म्हणजे कधीही झालं नाहीये. एकेक पीक घेत हे केस पांढरे झालेत,” गेली ३६ वर्षं शेती करत असलेल्या हरजीत म्हणतात. “पण अशा प्रकारचं आंदोलन मी पहिल्यांदाच पाहिलं आणि त्यात भाग घेण्याची वेळही पहिलीच,” त्या सांगतात. “लहान लहान मुलं आणि म्हाताऱ्या बाया आंदोलनासाठी येत होत्या तेही पाहिलं.”
केंद्रातील सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत ही मागणी घेऊन दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी गोळा झाले होते. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी नोव्हेंबर २०२० पासून तिथे तळच ठोकला होता, तो थेट नोव्हेंबर २०२१ मध्ये कायदे रद्द केले, तोपर्यंत. हे शेतकरी आंदोलन ऐतिहासिक ठरलंच पण अलिकडच्या काळात झालेल्या जनआंदोलनांपैकी कदाचित सर्वात मोठंही.
पंजाबातल्या असंख्य स्त्रिया आंदोलनाच्या अगदी अग्रस्थानी होत्या. तिथे जाणवेलली एकजूट आजही तशीच असल्याचं त्या सांगतात. आणि आंदोलनात सहभाग घेतल्याने हाती लागलेलं धाडस आणि स्वातंत्र्याची भावना बळकट झाली असल्याचं त्यांना वाटतं. “मी तिथे [आंदोलनस्थळी] होते ना, मला घराची आठवणही यायची नाही. आता आंदोलनाचीच सतत याद येते,” मन्सा जिल्ह्याच्या ५८ वर्षीय कुलदीप कौर सांगतात.
आधी कसं बुलधाला तहसिलातल्या आपल्या राली गावी घरकामाच्या बोज्यामुळे त्यांचं मन कशात लागायचंच नाही. “इथे एका पाठोपाठ एक कामाचा रगाडा सुरुच असतो. किंवा घरी पाहुणे येतात, मग त्यांच्यासमोर सगळं आवरून सावरून करावं लागतं. तिथे कशी मी मनमुक्त होते,” कुलदीप सांगतात. आंदोलनस्थळी त्या लंगरमध्ये सेवा करायच्या. गरज पडली तर आयुष्यभर तिथेच काम करायला त्या तयार आहेत. “म्हातारी कोतारी पाहिली ना की वाटायचं मी माझ्या आई-वडलांसाठीच स्वयंपाक करतीये.”












