यावर्षी पाऊस चांगला होता, हवामान उत्तम होते आणि उत्पादनही उदंड झाले. संदीप थावकर, वय २८, यांचा विचार होता की त्यांचे टोमॅटो त्यांना चांगली किंमत मिळवून देतील.
नागपूरहून ६५ किलोमीटर अंतरावर, विरखंडी गावात राहणारे संदीप शेतीत पारंपारिक सोयाबीन किंवा कापूस यांचं पीक घेतात, पण गेल्या वर्षी त्यांच्या शेजार्यांनी घेतलेल्या टोमॅटोच्या पिकाने दिलेलं उत्तम उत्पन्न पाहून, संदीप यांनी देखील स्वत:च्या चार एकर शेतजमीनीपैकी दीड एकरावर टोमॅटो लावण्याची जोखीम घेण्याचे ठरविले.
पण डिसेंबरच्या मध्यावर, त्यांनी स्वत:च्या स्थानिक जातीच्या टोमॅटोंची कापणी सुरू करण्याआधीच किंमती घसरल्या. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात, त्यांनी विकलेल्या टोमॅटोचे २५ क्रेट (प्रत्येक क्रेटमध्ये २५ किलोंच्या भाज्या) त्यांना किलोमागे केवळ रू. १.२० देऊन गेले.
ते म्हणतात, या दराने तर मी मजूरांची रोजंदारी पण वसूल करू शकत नाही, वाहतूकीचा आणि गाडीचा खर्च तर सोडाच, आणि बाजारातल्या दलालाला द्यावी लागते ती दलाली सुद्धा. असं असल्यावर संदीप यांनी गुंतवलेले भांडवल आणि कुटुंबाचे कष्ट तरी कसे वसूल होणार?
२७ डिसेंबरला घरी परतल्यावर, संदीप यांनी त्यांचा चुलत भाऊ सचिन यांच्याकडून ट्रॅक्टर आणला. तो ट्रॅक्टर त्यांनी टोमॅटोच्या शेतात उभ्या पिकांवर चालवला. ज्या शेतात त्यांनी, त्यांच्या पत्नी, त्यांच्या मोठ्या भगिनी आणि काकू यांच्यासह चार महीने दिवसरात्र कष्ट करून टोमॅटोची लागवड करून, तण काढून, पाणी घालून, कीटकांपासून संरक्षण करून पिकं उभी केली, त्याच शेतात!
संदीप थावकर त्यांच्या कुटुंबाच्या शेतावर, (डावीकडून उजवीकडे) मोठ्या भगिनी पुष्पा तिजारे, काकू हेमलता थावकर आणि त्यांच्या पत्नी मंजुषा यांच्यासह
टोमॅटोची उभी पिकं कापण्यामागे जशी निराशा कारणीभूत होती तशीच अजून नुकसान टाळणे हा हेतू देखील होता. "टोमॅटोची कापणी मार्च पर्यंत चालू असते. मी आधीच रू. ५०,००० खर्च केले आहेत. कीटकनाशके आणि उरलेल्या शेताच्या निगराणीसाठी मजुरांना द्यावे लागणारे पैसे असे अजून रू. २०,००० खर्च करणे आवश्यक होते," संदीप म्हणाले.
"याचा अर्थ अजून नुकसान होणार. मला दिसतंय की टोमॅटोच्या किंमती तर काही वाढणार नाहीत. मग मी आज दुसरं पिक लावून मार्च-एप्रिल पर्यंत त्याची कापणी करून माझं काही नुकसान भरून येईल का ते पाहीन," ते म्हणतात.
किलोमागे रू. १० मुळे जेमतेम खर्च आणि उत्पन्नाचा सम समान ताळेबंद लागला असता, असं म्हणणारे संदीप आवर्जून सांगतात की, ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर किंमती कोसळायला सुरुवात झाली.
परंतु, विरखंडी गावाच्या दोन्ही बाजूस, २० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर आणि उमरेड शहरातील स्थानिक व्यापारी, निश्चलनीकरणाला पूर्णपणे जबाबदार धरत नाहीत.
"उदंड उत्पादनामुळे किंमती घसरल्या आहेत," उमरेड बाजारातील बंटी चाकोले, वय ३८, सांगतात. "दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी मध्ये भाज्यांच्या किंमती घसरतात, आणि यावर्षी टोमॅटोचे उत्पादन गरजेपेक्षा भरपूर प्रमाणात झालेलं आहे."
पण ८ नोव्हेंबर नंतर किंमती थेट कोसळल्याचे त्यांनी कबुल केले. "मी सांगतो ना, माझ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी कधीही एवढी वाईट परिस्थिती पाहिली नाही."
"भाज्यांचे दर हंगामानुसार वर्षाच्या या सुमारास कमी होतात, पण कदाचित चलन कमतरतेमुळे त्यात अजून भर पडली आहे," असं भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार, डॉ. अशोक कुमार लाहिरी, निश्चलनीकरणाच्या संदर्भातील अलीकडच्या निबंधात लिहितात. निबंधाचे काही भाग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स पॉलिसी द्वारे प्रकाशित केले गेले आहेत.
नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा, निश्चलनीकरण पूर्व आणि नंतरचा डेटा किंमतींमधील फरक स्पष्टपणे दर्शवितो.
८ नोव्हेंबरपूर्वी, नागपूरपासून ५० किलोमीटर अंतरावरील, चिंचोलीच्या बंडु घोरमडे यांनी स्वत:चे टोमॅटो रू. ८ प्रति किलो दराने विकले होते. माल गरजेपेक्षा जास्त असल्याने कदाचित किंमत कमी होती. आज किलोला रू. १ असा दर आहे.
पंडित थावकर, विरखंडी गावातले अजून एक टोमॅटो उत्पादक, त्यांच्या पत्नी शांताबाई आणि त्यांच्या शेतातील नुकतीच कापणी करून पॅक केलेल्या ताज्या टोमॅटोंसह. पंडित म्हणतात की या वर्षी पिकातून त्यांचे काहीही पैसे वसूल होणार नाहीत कारण जवळच्या भिवापुर शहराच्या बाजारात घाऊक भाव किलोमागे रू. १ पेक्षाही खाली घसरले आहेत
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये, डिसेंबर-जानेवारीत देशी टोमॅटोंचा सरासरी भाव रू. १५ प्रति किलो तर निर्यातीच्या (संकरीत) टोमॅटोंचा सरासरी भाव रू. ३७.५ प्रति किलो होता. पण गेल्या वर्षी, १ नोव्हेंबर आणि २५ डिसेंबर दरम्यान, भारतातील २९ मोठ्या बाजारांमध्ये संकरीत टोमॅटोंचे सरासरी भाव रू. २९ प्रति किलो ते रू. ५.५० प्रति किलो असे पडले.
रायपूरमध्ये, संकरीत टोमॅटोंच्या किंमती रू. ४ प्रति किलोवर घसरल्या. छत्तीसगडच्या जशपुर जिल्ह्यात, देशी जातीचे टोमॅटो ५० पैसे प्रति किलोला विकले गेले, हताश शेतकर्यांनी महामार्गावर अनेक टन टोमॅटो फेकून दिले.
नागपूरपासून, ८० किलोमीटर अंतरावरील, वर्धा शहरात, प्रमोन रणित या शेतकर्याने २७ डिसेंबरला भरचौकात त्यांचा टोमॅटोंचा टेम्पो उभा करून, चार तासांमध्ये ४०० किलो टोमॅटो विनामूल्य वाटून टाकले.
त्यांच्या नऊ एकर शेतातील तीन एकरात, रू. १ लाखाची गुंतवणूक द्विगुणित होऊन मिळेल या आशेने त्यांनी टोमॅटोंची लागवड केली होती. पण व्यापार्यांनी जेव्हा किलोला रू. १ चा दर सांगितला, तेव्हा रणित यांनी व्यापार्यांना विकण्याऐवजी टोमॅटोंचे दान करून पुण्य कमवायचा निर्णय घेतला.
२ जानेवारीला, ANI वृत्तसंस्थेच्या बातमीप्रमाणे, निश्चलनीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी रायपूरमधील शेतकर्यांच्या एका समूहाने, युवा प्रगतीशील किसान संघाच्या सदस्यांनी टोमॅटोंसह १ लाख किलोंच्या भाज्या लोकांना विनामूल्य वाटून दिल्या.
विरखंडीमध्ये, ट्रॅक्टरने नुकत्याच सपाट केलेल्या आपल्या दुर्दैवी जमिनीत आता कशाची लागवड करायची याचा संदीप विचार करत आहेत. गवार की देशी गोल भोपळा (चक्की, हिंदीत टींडे) की भेंडी लावायची? पण जे काही लावू त्यातून नफा मिळेल याची हमी आहे का?
"मला बाजारातील भाव आधी तपासून मगच जुगार खेळला पाहिजे," ते खिन्नपणे हसतात.
छायांकन : जयदीप हर्डीकर
हा लेख ( येथे थोडे बदल केलेले आहेत ) सर्वप्रथम कोलकाताच्या द टेलीग्राफ मध्ये ७ जानेवारी , २०१७ ला प्रकाशित केला गेला .