गेल्या आठवड्यात सूर्य कलला आणि गणपती बाळा यादवांच्या सायकलचं चाक शांत झालं. भूमीगत क्रांतीकारकांसाठी निरोप्या म्हणून काम केलेल्या गणपा दादांनी नुकतीच वयाची शंभरी पार केली होती. १०१ नॉट आउट खेळणाऱ्या दादांनी अगदी शेवटच्या काही महिन्यांपर्यंत सायकल चालवणं काही सोडलं नव्हतं. एका दिवसात ५ ते २० किलोमीटर अंतर ते सहज पार करत. पण अखेर छोटंसं आजारपण आलं आणि १०१ वर्षांचा हा म्हातारा सायकलवर पाय मारत दिगंतात गेला.
२०१८ साली आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांचं वय होतं ९७ वर्षं. आम्हाला शोधत शोधत ते ३० किलोमीटर सायकल मारत आले होते. आम्हाला म्हणजे पारीच्या आमच्या गटाला पोचायला उशीर झाला होता, पण कसंही करून आम्हाला त्यांची झपाटून टाकणारी कहाणी ऐकायचीच होती. मे महिन्याच्या मध्यावर उन्हाच्या कारात चार तास ते सायकल चालवत होते आणि त्यांची सायकलही एखाद्या वस्तू संग्रहालयात शोभावी अशीच होती. पण या कशाचाही त्यांना काडीमात्र फरक पडत नव्हता. आता ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आयुष्याची गोष्ट मात्र चिरंतन आहेः गणपती यादवांची झपाटून टाकणारी जीवनकहाणी.
गणपती बाळ यादवांचा जन्म १९२० साली झाला. १९४३ साली इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा करणाऱ्या सातारा संस्थानातल्या भूमीगत प्रति सरकारची सशस्त्र सेना म्हणजे तूफान सेना. त्या सेनेचे स्वातंत्र्य सेनानी होते गणपती यादव. इंग्रज राजवटीविरोधात तुफान सेनेने केलेल्या चढायांमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली जून महिन्यात साताऱ्याच्या शेणोलीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांचे पगार घेऊन जाणारी रेल्वे लुटण्याची रोमांचक कामगिरी फत्ते करणाऱ्या क्रांतीकारी गटातही गणपा दादा होतेच. ही चढाई जी. डी. बापू लाड आणि कॅप्टन भाऊंच्या नेतृत्वात करण्यात आली होती.
ते आम्हाला म्हणाले होते, किती तरी वर्षं “मी (रानानी लपलेल्या) आमच्या पुढाऱ्यांना जेवण पोचवायचो. रातीच्या वेळी मी त्यांना भेटाया जायाचो. त्यांच्यासोबत १०-२० मानसं असायची.” त्यांचा पत्ता लागला असता, तर त्यांना आणि बाकी सगळ्या २० जणांनाही इंग्रजांनी देहदंड केला असता. त्या काळात सायकल चालवणारे यादव म्हणजे घरपोच अन्न पुरवणारी आधुनिक सेवाच होते म्हणा ना. वेगवेगळ्या क्रांतीकारक गटांमध्ये आपापसात कळीचे निरोप पोचवण्याचं काम देखील गणपा दादा करत.






