एक वर्ष झालं, कोल्लती नारायण दररोज सहा किलोमीटर पायपीट करत त्याच्या जक्कमपुडी गावाहून विजयवाडा शहरातल्या कृष्णाकाठच्या पुन्नामी घाटावर पोचतो. सकाळी १० ते संध्या ५ पर्यंत तो इतर काही जणांसोबत मासे धरतो आणि नदीकाठीच विकतो.
२७ वर्षांचा नारायण अंशतः अंध आहे. काम संपवून तो परत सहा किलोमीटर अंतर पार करत गावी परततो. “मी चालत जातो कारण मला रिक्षाचे चाळीस रुपये परवडत नाहीत,” तो सांगतो. “मला कसेबसे दिवसाला ५० ते १०० रुपये मिळतात.” त्याच्या दोघी मुली, एक चार वर्षांची आणि दुसरी दोन, त्याही अंशतः अंध आहेत.
घर ते पुन्नामी घाट ही १२ किलोमीटरची वारी करण्याची वेळ नारायणवर आलीये कारण जन्मापासून तो ज्या घरात राहिला ते त्याचं गावचं घर २०१६ च्या मध्यावर पाडण्यात आलं. हे साधंसं घर नारायणच्या भावाचं होतं आणि तो त्याला अधून मधून भाडं म्हणून काही रक्कम द्यायचा. आता मात्र त्याला जक्कमपुडीच्या वायएसआर कॉलनीत १००० रुपये घरभाडं भरतोय. (घर पाडल्यानंतर त्याचा भाऊ देखील तिथेच रहायला आलाय, पण जागा छोटी असल्यामुळे नारायणची सोय होऊ शकली नाही.)











