पवारांनी कापूस अद्याप विकला नाही त्याला कारण आहे. गेल्या जानेवारी-फेब्रुवारीत कापसाचे दर पडले होते. अगदी ५,५०० रु. क्विंटल या किमान आधारभूत किमतीपेक्षाही कमी किंमत मिळत होती. तरीही फेब्रुवारीच्या शेवटी त्यांनी ४०-५० क्विंटल कापूस ४,५०० रु. क्विंटल एवढ्या दराला विकला, कारण शेतमजुरांची मजुरी द्यायची होती.
गेली काही वर्षं कापसाचे दर जानेवारी-फेब्रुवारीत पडतात आणि मार्च-एप्रिलमध्ये पुन्हा उठतात, असा किसन पवारांचा अनुभव आहे. त्यामुळे सगळा कापूस लगेचच न विकता एप्रिलपर्यंत थांबायचं त्यांनी ठरवलं.
पण मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाला.
आता कोविड १९ चं संकट गंभीरच होतं आहे, टाळेबंदीचा हा सलग तिसरा महिना सुरू आहे. कापसाला खरेदीदार नाही, शेतमाल पुरवठ्याची साखळीच तुटली आहे.
महाराष्ट्रभरातल्या, खरं तर देशभरातल्या असंख्य शेतकऱ्यांसारखे एक आहेत पवार, ज्यांची कापूस विकला न गेल्यामुळे (आणि इतर रब्बी पिकं, विशेषतः नगदी पिकंही) कोंडी झाली आहे.
‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) – भारतीय कापूस महामंडळ’ ही केंद्र सरकारची सर्वोच्च विपणन संस्था आहे. हे महामंडळ आणि राज्य पातळीवरच्या कापूस विपणन संस्थांनी महाराष्ट्रात जवळपास १५० कापूस खरेदी केंद्रं लॉकडाऊनच्या काळातही सुरू ठेवली होती. पण इथे कापूस विकायचा तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागत होतं, लांबच लांब ई-रांगा असायच्या. कापूस विकला जात नाहीये म्हणून हताश झालेल्या पवारांसारख्या शेतकऱ्यांच्या सहनशक्तीची ही परीक्षाच होती!
आतापर्यंत महामंडळाने देशभरातून कापसाच्या ९३ लाख गासड्या (साधारण ४६५ लाख क्विंटल कापूस) खरेदी केल्या आहेत... २००८ मध्ये ९० लाख गासड्या खरेदी केल्या होत्या, त्यापेक्षा जास्त... आणि गेल्या दशकभरात देशभरातली जी सरासरी खरेदी आहे, त्याच्या जवळजवळ नऊ पट! एवढ्या मोठ्या प्रमाणावर सीसीआयने खरेदी केली, कारण देशभरात लागू होत असलेल्या लॉकडाऊनमुळे मार्चच्या मध्यानंतर खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी थांबवली.
शिवाय, कोविड १९ च्या आधी या व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव ५,००० रु. क्विंटलपर्यंत खाली आणले. शेतकऱ्यांना मग ५,५०० रु. क्विंटल या भावाने महामंडळाला कापूस विकण्याशिवाय काही पर्यायच राहिला नाही. आधीच आर्थिक स्थिती बिकट ती अधिक ताणायची नसल्यामुळे महामंडळ आणि राज्य सरकारही अधिक कापूस खरेदी करण्याच्या मनस्थितीत नव्हतंच.