जुलै ते नोव्हेंबर २०१७ या काळात विदर्भाच्या कापूस पिकवणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, खासकरून यवतमाळमध्ये अस्वस्थ वाटणे, गरगरणे, दिसायला त्रास होणे आणि पोटदुखी अशा तक्रारी घेऊन दवाखान्यात येणाऱ्यांची संख्या अचानक वाढली. हे सगळे कापूस शेतकरी किंवा शेतमजूर होते आणि सगळ्यांना रानात कीटकनाशक फवारताना विषारी घटकांशी संपर्क आल्याने विषबाधा झाली होती. किमान ५० जण दगावले, हजाराहून अधिक आजारी पडले, आणि काही तर पुढचे कित्येक महिने आजारी होते.
तीन लेखांच्या मालिकेतल्या या दुसऱ्या लेखात या भागात नक्की काय घडलं आणि महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विशेष तपास पथकाला नक्की काय सापडलं याचा मागोवा घेतला आहे.
त्यानंतर आपण एका मोठ्या कथानकाकडे जाणार आहोत – विदर्भात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर नक्की होतो तरी का? आणि जे बीटी कापसाचं वाण बोंडअळीला प्रतिकारक म्हणून विकसित करण्यात आलं होतं ते या जुन्या अळीच्या हल्ल्यात निष्प्रभ कसं काय ठरलं तेही आपण पाहणार आहोत. गुलाबी बोंडअळीने फारच जोरदार हल्ला चढवला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असं दिसून येतंय.






