ब्रह्मपुत्रेमध्ये अशी अनेक बेटं आहेत ज्यांची सतत धूप होत असते आणि ती पाण्याखाली जाण्याचा धोका असतो. त्यांना चार असं म्हणतात. रोज सकाळी अशा बेटांवरून मजुरांना घेऊन नावा आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या धुबरी शहरात येऊन पोचतात. शेजारच्या मेघालय राज्यातून बांबूनी बनवलेले तात्पुरते तराफे वाहत वाहत धुबरीमध्ये गदाधर आणि ब्रह्मपुत्रेच्या संगमापर्यंत येऊन पोचतात.
मात्र या संगमावर आता उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दशकात बांबूच्या पट्ट्यांची मागणी कमी झाली आहे. बांबूंपासून कुंपण, चौकटी बनवतात, भिंती आणि लाकडी प्लाय बनवायलादेखील बांबूचा काही भाग वापरतात. पण आता चार बेटांवर राहणाऱ्यांनी पूर्वापार चालत आलेली बांबूची गवताने शाकारलेली घरं बांधणं थांबवलं आहे. त्याऐवजी ते आता इकडून तिकडे हलवता येतील अशी घडी घालता येण्यासारखी पत्र्याच्या भिंती आणि छत असणारी घरं उभारत आहेत. पश्चिम बंगाल आणि बिहारमधूनही बांबूच्या पट्ट्यांची मागणी घटली आहे. तिथे स्वस्तात घरं बांधण्यासाठी विटा किंवा पत्र्याचा वापर वाढला आहे.











