‘‘केसांना रंग लावला की ते आणखी पांढरे होतात,’’ पुष्पवेणी पिल्लई म्हणते. ‘‘हे बघ, याच्यासारखे,’’ बोलता बोलता ती जमिनीवरच्या पांढर्या लाद्यांकडे बोट दाखवते. पांढर्या आणि फिकट निळ्या रंगसंगतीच्या लाद्या आहेत तिच्या घरात. साठी कधीच उलटली आहे पुष्पवेणीची, पण डोक्यावर एखाद दुसराच पांढरा केस दिसतोय. ‘‘खोबरेल तेल आणि लाइफबॉय साबण ओन्ली...’’ ‘ओन्ली’ या इंग्रजी शब्दावर जोर देत ती सांगते. तिला तस्संच म्हणायचं असतं!
दुपारच्या वेळेला चकचकीत टाइल्सच्या जमिनीवर ती बसलेली असते, ‘जाने कहां’ गेलेल्या ‘वो दिन’च्या आठवणी काढत आणि आताच्या जमान्याविषयी, वर्तमानाविषयी बोलत. ‘‘माझ्या आईच्या वेळी...’’ ती आठवणींत रमते. ‘‘तिची सासू तिला ओल्या खोबर्याचा तुकडा द्यायची. माझी आई तो चावायची आणि मग अंघोळ करताना तो डोक्याला चोळायची. त्यांचं खोबरेल तेल होतं ते.’’
पुष्पवेणीच्या शेजारी बसलेली वासंती पिल्लई तिला दुजोरा देते. दोघी लांबच्या नात्यातल्या आहेत. धारावीच्या एकाच गल्लीतल्या एका खोलीच्या घरांमध्ये दोघी पन्नास वर्षं राहातायत. इथल्या जगण्यानं आयुष्यात मिळालेलं समाधान, दोघी जवळच राहात असल्यामुळे त्यांच्यात गेली अनेक वर्षं असलेलं नातं आणि इथल्या बदललेल्या जगाच्या भरपूर आठवणी... दोघी बोलत राहातात.
पुष्पवेणी नवरी म्हणून धारावीत आली तेव्हा जेमतेम चौदा-पंधरा वर्षांची होती. त्याच गल्लीतल्या मैदानात उभारलेल्या मंडपात तिचं लग्न झालं होतं. मुलगा धारावीतच राहाणारा होता. ‘‘चाळीस वर्षांचा होता तो,’’ ती सांगते. इतका मोठा...? ‘‘हो. बुटका होता ना... कळलंच नाही आम्हाला! आणि त्यावेळी या अशा गोष्टी कोणी पाहातही नव्हतं ना! लग्नाचं जेवण होतं, सांबार-भात. व्हेज फक्त!’’
लग्नानंतर पुष्पवेणी आणि तिचा नवरा चिनासामी इथल्या एका खोलीत राहायला आले. चिनासामीने त्यावेळी चिक्कार असलेले पाचशे रुपये मोजून ही खोली घेतली होती. धारावीतच एका छोट्याशा कारखान्यात तो नोकरी करत होता. शस्त्रक्रियांसाठी लागणारे दोरे आणि वायर बनवण्याचं वर्कशॉप होतं ते. सुरुवातीला ६० रुपये पगार होता. १९९५ च्या आगेमागे निवृत्त झाला तेव्हा त्याचा पगार होता २५ हजार रुपये.







